विक्रीमूल्यापेक्षा कमी किमतीला वस्तू विकत घेणे हा पृथ्वीवरील सर्वच माणसांसाठी आनंदाचा भाग असतो आणि साहजिकच जगातील सगळ्या भागात ‘सेल’ची बाजारपेठही मोठी असते. पृथ्वीवरल्या माणसांनीच घडवलेले सायबरविश्वही त्याला अपवाद नाही. त्यात फ्लिपकार्ट हे इंटरनेटवरील विक्रीस्थळ तर जन्मापासून भारतीय. या विक्रीस्थळाने ‘एका दिवसात अब्जांची उलाढाल’ करण्याच्या इराद्याने सवलत घोषित केली. दसरा-दिवाळीच्या मोसमात आणि ईदच्याच दिवशी, सोमवारी ही अब्जविक्री पार पडली आणि लक्ष्य गाठलेच असे त्या विक्रीस्थळाने जाहीर केले; परंतु सारेच काही आलबेल नव्हते, हेही स्पष्ट झाले. अनेक ग्राहकांनी या विक्रीबद्दल कुरबुरी, तक्रारी जाहीरपणे सांगण्यासाठी पुन्हा इंटरनेटवरच्याच फेसबुक, ट्विटर आदी समाजमाध्यमांचा आसरा घेतला. वास्तविक भारतात सायबरविश्वातील बाजारपेठेची वाटचाल गेल्या किमान दशकभराची आहे. पण स्पर्धा गेल्या दोन-तीन वर्षांतच वाढू लागली. गेल्या वर्षभरात तर मोठय़ा प्रमाणात जाहिराती करून ही बाजारपेठ फुगवली गेली. दुकानात न जाता, वस्तू न हाताळता ती घरपोच येणे, ही नव्याने सशक्त होऊ लागलेल्या मध्यमवर्गासाठी पर्वणीच होती. त्यातून हाती पडलेली वस्तू न आवडल्यास परत करण्याची सुविधा तर त्यांच्या पथ्यावरच पडणारी होती. फ्लिपकार्टने सेल जाहीर करताना वस्तू परत घेतल्या जाणार नाहीत हे स्पष्ट केले नाही, त्यामुळे अनेक ग्राहकांची फसवणूक झाल्याची तक्रार आहे. अनेक वस्तूंच्या किमती अवाच्या सव्वा वाढवून त्यावर सवलत देत असल्याचे उघडकीस आल्याने समाजमाध्यमांत टीकाटिप्पणीला ऊत आला. या नाराज ग्राहकांची संख्या पाहून याच वस्तू आपल्याकडे अधिक स्वस्तात उपलब्ध आहेत, असे अन्य विक्रीस्थळांनी समाजमाध्यमांतूनच जाहीर करून आपलेही हात धुवून घेतले. बाजाराला कवेत घेण्याचा हा उद्योग विश्वासार्हतेला तडा जाणारा ठरू शकतो, हे फ्लिपकार्टच्या लक्षात आले नाही. घरबसल्या खरेदी करण्याची सोय अडचण ठरता कामा नये, याचे भान वितरक कंपनीने न ठेवल्यास काय अभूतपूर्व घोटाळा होतो, याचा अनुभव यानिमित्ताने आला आहे. विश्वासार्हता हा या बाजाराचा कणा असतो. तोच नष्ट होत गेला, तर या बाजाराकडेही अनेक जण पाठ फिरवतील आणि तेथेही बेपारी फसवणूक करण्याची भारतीय मानसिकता मूळ धरेल. फ्लिपकार्टच्या सवलतविक्रीचे संकेतस्थळ ग्राहकांच्या गर्दीपुढे कोलमडून पडले. अनेक वस्तूंना मागणी असूनही त्या संपल्या या तांत्रिक त्रुटींवरही ग्राहकांचा त्रागा व्यक्त झाला आहे. अखेर हा टिंगलटवाळीचा विषय ठरला. हे अधिक गंभीर व दूरगामी परिणाम करणारे ठरण्याचा धोका ओळखायला हवा. भारतातील अनेक वस्तू परदेशी बाजारात पाठवताना अनेक भारतीय व्यापाऱ्यांनी यापूर्वी फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारांमुळे भारतीय वस्तू परदेशात खरेदी करताना मोठी काळजी घेतली जाते. सायबरविश्वातही हीच परिस्थिती उद्भवू नये, सर्वात मोठय़ा सवलतविक्रीची टवाळी सर्वाधिक फसवणूक अशी होऊ नये, असे जर वाटत असेल, तर या बाजारपेठेत कार्यरत असणाऱ्या सर्वानी दक्ष राहणे अत्यावश्यक आहे. एका दिवसात फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या दोन कंपन्यांनी मिळून सुमारे बाराशे कोटी रुपयांचा व्यवसाय केला हा दावा खरा मानल्यास, या नव्या बाजारपेठेचे आकारमान सहज लक्षात येऊ शकेल.  वितरकांचे उत्पादकांशी थेट संधान, अतिरिक्त उत्पादन आणि बाजारपेठेची क्रयशक्ती वाढवण्यासाठी अनेक मार्गानी केलेले प्रयत्न या त्रिसूत्रीपेक्षा वेगळे मार्ग वापरल्यास सवलत फसवीच ठरते. मात्र सायबरविश्वातील नवग्राहक आक्रमक आहेत, असंतोष तातडीने जाहीर करण्याची साधने त्यांच्याकडे आहेत, हे लक्षात असलेले बरे.