08 April 2020

News Flash

शेअर बाजाराची विदेशी चरबी

आपल्या शेअर बाजाराची ताजी तऱ्हा म्हणजे एक कोडेच आहे. देशाचा आर्थिक विकास दर दशकाच्या नीचांकाला पोहोचला आहे; निवारणाशिवाय उत्तरोत्तर

| November 12, 2013 01:11 am

आपल्या शेअर बाजाराची ताजी तऱ्हा म्हणजे एक कोडेच आहे. देशाचा आर्थिक विकास दर दशकाच्या नीचांकाला पोहोचला आहे; निवारणाशिवाय उत्तरोत्तर चालढकल होत आलेल्या आणि महाभयानक रूप धारण केलेल्या देशांतर्गत अर्थचिंतांची मालिकाच आपल्यापुढे आ वासून उभी आहे. केंद्रातील सरकारचा या संबंधाने एकूणच नाकर्तेपणा; त्यातच तोंडावर आलेल्या निवडणुका आणि त्यांच्या संभाव्य कौलाच्या खोलात दडलेली अनिश्चितता.. या सर्व निराशामय वातावरणाबाबत सर्वाधिक संवेदनशील असलेल्या शेअर बाजाराने नकारार्थी प्रतिक्रिया देणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने २१ हजाराला भोज्या केला. इतकेच नव्हे तर सेन्सेक्ससह निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सार्वकालिक उच्चांकी झेप घेत दिवाळी साजरी केली. कारणे स्पष्ट आहेत. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी आणि त्यांच्याकडून होणाऱ्या डॉलर, पौंड, येनच्या गुंतवणुकीने आपल्या बाजारावर घट्ट पकड बसविली आहे. शेअर बाजारात उत्साहाचे भरते येईल असे काही देशांतर्गत घडत नसतानाही, जानेवारी २०१२ पासून झालेली २,२०,००० कोटींची विदेशी गुंतवणूक ही बाब स्पष्ट करते. पण कोडय़ात टाकणारी गोष्ट ही की, बाजार सध्या अत्युच्च उंचीवर असताना, दलाल-स्ट्रीटवर फटाक्यांची आतषबाजी सोडाच (दिवाळी असतानाही!), हर्ष-हास्याची लकेर असलेले गुंतवणूकदारांचे चेहरेही गायब आहेत. सेन्सेक्स अत्युच्च उंचीवर असताना तो ज्या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतो त्या ३० पैकी निम्म्याहून अधिक समभागांनी सार्वकालिक सोडा, वर्षांतील उच्चांकही दाखविलेला नाही. म्हणजे शेअर बाजारातील सध्याचा फुगवटा हा केवळ विदेशी गुंतवणुकीने चढलेली अतिरिक्त चरबी आहे काय? तर हे बव्हंशी खरे आहे. विदेशी गुंतवणूकदारांच्या पसंतीस पडले त्या बोटावर मोजता येतील तेवढय़ाच समभागांनी सध्या अस्मान गाठले आहे, तर अन्य समभागांची स्थिती यथातथाच आहे. आकडय़ांमध्येच बोलायचे झाल्यास आघाडीच्या कंपन्यांचे व्यापक प्रतिनिधित्व असलेल्या बीएसई-५०० निर्देशांकातील प्रत्येकी दोनपैकी एक म्हणजे निम्म्या समभागांनी चार वर्षांपूर्वीचा तळ गाठला आहे. जुलै २००९ म्हणजे चार वर्षांपूर्वीच्या नीचांकपदाला पोहोचलेल्या ‘बीएसई’च्या ‘ए’ आणि ‘बी’ वायदा गटातील समभागांची संख्या १२६ इतकी आहे, तर वरील सूचीतील सार्वकालिक नीचांक गाठणाऱ्या समभागांची संख्या ३३ अशी आहे. एकीकडे फिरंगी पैशाने मदमस्त झालेले समभाग तर दुसरीकडे बहुवार्षिक नीचांकाला पोहोचलेले समभाग अशी कडेकोट द्विध्रुवीय वाटचाल यापूर्वी बाजाराने खचितच अनुभवली असेल. थोडक्यांसाठी गलेलठ्ठ परताव्याचा आत्मानंद तर बहुतांशांच्या बाबतीत पश्चात्तापदग्धता असा संमिश्र भाव बाजारासाठी न भूतोच ठरणारा आहे. दिवाळीत निर्देशांक सार्वकालिक उच्चांकावर असताना रोखीत होणारा किरकोळ गुंतवणूकदारांचा दैनंदिन व्यवहार घटक मात्र २००३ नंतरच्या सर्वात निम्न स्तरावर होता. आपल्याकडील गुंतवणुकीचा पूर्वेतिहास पाहता सध्याची बाजाराची अवस्था ही सामान्य गुंतवणूकदारांच्या अंगाने चांगलीच म्हणायला    हवी. २००८ मध्ये सेन्सेक्स २१ हजारांवर असताना खरेदी करणाऱ्यांना त्यानंतरच्या बाजारातील वध-घटींनी इतक्या जबरदस्त खस्ता दिल्या की,  त्यांनी शेअर्समधील गुंतवणुकीकडे कायमची पाठ फिरविली असण्याची शक्यताच अधिक दिसून   येते. यंदाची तेजी याला अपवाद ठरली हे एका परीने बरेच झाले. विदेशातील विशेषत: अमेरिकेच्या  सध्या डळमळलेल्या अर्थव्यवस्थेत जराशी  स्थिरता जरी आली तरी बाजारात खुळखुळणारा फिरंगी   पैसा परतीला लागेल. ही स्थिती फार  दूरही नाही. यातून आपल्या बाजाराचा ढळलेला अक्षही ताळ्यावर येईल. त्या वेळची निर्देशांकाची पातळी ही तिचे अस्सल मूल्य असेल आणि सामान्यांना बाजारात प्रवेशाचीही ती खरी संधी असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2013 1:11 am

Web Title: foreign speculation in indian of share market
टॅग Share Market
Next Stories
1 लोभी ‘इंडिया’
2 कायदेशीर खुसपटखोरी
3 चिखलातले पद्म
Just Now!
X