इथे तर घात करणारे कुणी परके नाही. ज्याच्याकडे कायम डोळे लागलेले असतात, ज्या आभाळाचा आधार असतो माणसांना, गुराढोरांना, चिमण्यापाखरांना.. त्या आभाळानेच हा घात केला आहे. सावरायला वेळ लागेल, पुन्हा िहमत गोळा करून पाय रोवायला काही दिवस जावे लागतील.
आज सर्वत्र सप्तरंगांची उधळण केली जाईल. एकमेकांच्या चेहऱ्यावर अगदी धसमुसळेपणाने रंग लावला जाईल. अनेक ठिकाणी रंगीत पाण्याचे  फवारे उडवले जातील. एकमेकांना आकंठ भिजवले, बुडवले जाईल. ‘ओ रंग बरसे..’ पासून ते ‘बलम पिचकारी..’ पर्यंत गाण्यांच्या तालावर बेभान होऊन पावले थिरकतील. रंगीत पाण्याने रस्ते अक्षरश न्हाऊन निघतील. ओलेचिंब होऊन निथळणाऱ्यांना काही काळ जगाचाच विसर पडेल. या धुंद-फुंद जगाच्या पलीकडे आणखी एक जग आहे, जिथे जगण्यातले सगळेच रंग उडाले आहेत. अवकाळी कोसळलेल्या आपत्तीने जगणेच बेरंगी करून टाकले आहे.
..गहू, हरभरा, ज्वारी ही पिके काढणीला आलेली. अवघ्या काही दिवसातच सुगीची तयारी होणार पण तसे झाले नाही. जी पिके काही दिवसात घरी येणार, त्यांचे नवेपण मोडले जाणार ती पिके हाताशी आलीच नाहीत. काढणीच्या आधीच ती मातीत मिसळली. ज्वारीच्या कणसांना कोंब फुटले, गहू ओंब्यातून बाहेर पडलाच नाही, हरभरा जसाच्या तसाच मातीत मिसळून गेला, आंब्याचा मोहर झडून गेला, डाळींब, चिकू, संत्रा, मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. वेलींवरची द्राक्षे, टरबूज गारपिटीच्या माऱ्यानेच तडकून गेली, फुटली. काहींची घरे शेतात, त्यावर कसे बसे छप्पर, अशांच्या डोक्यावरचे छप्परच उडाले. काहींना आधार दुभत्या जनावरांचा, शेळ्या-मेंढय़ा, गाई-म्हशींचा. त्यांच्या दावणीतला हा आधारच तुटला. आत्ता-आत्ता डोळ्यासमोर जे दिसत होते ते पाहता पाहता नष्ट होणे ही किती भयंकर गोष्ट. जे डोळ्यांसमोर आहे ते मनाचे धागे पार उसवून टाकणारे पण जे पुढचे दिसते आहे ते मात्र अक्षरश डोळ्यांना अंधारी आणणारे. उघडय़ा डोळ्यासमोर मिट्ट काळोख उभा करणारे. या अंधारात कुठे शोधावी जगण्याची दिशा ? गटांगळ्या खाणाऱ्या हातापायांनी कुठे शोधावा आधार? ज्यांच्यावर आघात झाला आहे त्यांची वेदना तोंडातल्या तोंडातच अडखळताना दिसत आहे, तिला वाचा फुटत नाही. पाझरलेले डोळे आणि काही सांगण्यासाठी उसवणारे ओठ जेव्हा आधारासाठी आसुसतात तेव्हा दाही दिशांमधून कुठूनच ओळखीची ओल सापडत नाही. या सगळ्यांच्या भोवती पोरकेपण दाटले आहे. आजच पावले अडखळत आहेत आणि गाठायचा तर लांबचा पल्ला! येणारे वर्ष काढायचे कसे? हंगामाच्या सुरुवातीला बँकांकडून कर्ज काढलेले. हाताने लावलेल्या झाडाच्या पानावर जर साधा डाग जरी दिसला तरी बेचन व्हावे इतकी त्यांच्याशी जवळीक. भर उन्हाळ्यात कुठून कुठून पाणी आणून झाडांच्या मुळाशी ओल ठेवण्यासाठी केलेला आटापिटा आणि आता त्याच शिवारावर फिरलेला हा नांगर. डोक्यावरचे कर्ज कशाच्या आधारे फेडायचे? जी मुले बाहेरगावी शिकण्यासाठी धाडली त्यांचा खर्च कसा भागवायचा? घरातल्या लेकी बाळींची लग्ने कशी पार पाडायची?.. देण्या घेण्याचे व्यवहार मुदतीत पार पडले नाहीत तर या माणसांच्या भाषेत ‘जबानीलाच बट्टा लागतो’. आता पुढचे वर्षभर काय खायचे? जनावरांना काय खाऊ घालायचे? फक्त पिकेच नष्ट झाली असे नाही. भरमसाट खर्च करून जे नवे तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवले आहे त्यालाही फटका बसला. ज्या बागा बहरायला तीन-चार वष्रे लागली त्या नष्ट झाल्यानंतर आता पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार.
नुकसान फक्त शेतकऱ्यांचेच नाही, शेतमजुरांचेही आहे. या दिवसातच पीक काढणीच्या काळात मजुरांच्या हाताला काम असते. आता पिकेच नष्ट झाली तर हाताला कोणते काम मिळणार? या नुकसानीत काही गोष्टी अजूनही बेदखल आहेत. शेतकरी-शेतमजूर या परिचित घटकांबरोबरच वाटेकरी नावाचा एक घटक असतो. ज्याला स्वतचे शेत नाही आणि जो कुठे सालदार म्हणून कामालाही नाही. एखाद्याचे शेत वर्षभर कसायचे, जो खर्च होईल त्यातला काही वाटा उचलायचा आणि जे उत्पादन होईल त्यात भागीदार व्हायचे. कोणी चौथ्या तर कोणी तिसऱ्या हिश्श्याने यात सहभागी होतो. काहींचा हिस्सा थेट निम्मा असतो त्याला बटई म्हणतात. उत्पादन खर्चही निम्मा आणि उत्पादनही निम्मे.. अशा वाटेकऱ्यांची संख्या खूप आहे. आपत्तीच्या काळात जी थोडीफार नुकसानभरपाई येते ती ज्याच्या नावाचा सातबारा आहे त्याला मिळते. वाटेकरी वर्षभर जमीन कसतो पण त्याचे नाव सातबाऱ्यावर नसल्याने त्याला कोणतीच नुकसानभरपाई मिळत नाही. महाराष्ट्राच्या शेतीधंद्यात अशा वाटेकऱ्यांची संख्या बरीच आहे. पीक लागवडीपासून मशागतीपर्यंत त्याचा खर्चात वाटा राहिलेला आहे आणि आता पिके काढणीला आल्यानंतर त्याचा पदर फाटकाच. ना कुठे दाद ना फिर्याद. गारपिटीने असे अनेकांचे आयुष्य बेदखल करून टाकले आहे.
एकीकडे गावोगाव अशा उद्ध्वस्तीकरणाच्या कहाण्या आणि दुसरीकडे सरकारदरबारी पंचनाम्यांचा घोळ. गारपीट होऊन पंधरा दिवस लोटले तरी अजूनही ज्यांचे नुकसान झाले त्यांच्या पदरी काहीच नाही. आधी गाव पातळीवरच्याच महसूल कर्मचाऱ्यांकडून पंचनामे, पुन्हा सर्वपक्षीय पुढाऱ्यांचे पाहणी-पर्यटन, त्यांच्या गाडय़ांचे ताफे, कार्यकर्त्यांचे लोंढे, ‘आम्ही तुमच्या पाठीशी’ ही शेवटची नेहमीची सराईत भाषा. पुन्हा केंद्राचे पथक, या पथकाची पाहणी प्रत्येक ठिकाणी पाच-सात मिनिटांची. गेल्या वर्षी जे दुष्काळाचे झाले तेच या वर्षी गारपिटीचे. आपत्तीत फरक, नेपथ्यरचना तीच. जे ही दृश्ये फक्त      किनाऱ्यावरूनच पाहतात त्यांना वाटते आता शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार. सरकार शेतकऱ्यांना भरभरून मदत देणार. प्रत्यक्षात जी नुकसानभरपाई असते ती अत्यंत तोकडी. नुकसान भरपाईचे निकषही सगळे कालबाह्य़. शेतकऱ्यांना चार पसे मिळायचे तर दूरच पण किमान त्याने केलेला खर्च तरी निघावा एवढेसुद्धा या नुकसानभरपाईत पाहिले जात नाही. हाताशी काहीच नाही आणि पुढची तीन-चार महिने काढायची, सगळा उन्हाळा सोसायचा या भयाण वस्तुस्थितीनेच अनेकांना घेरले आहे.
..ध्यानीमनी नसताना अचानक काहीतरी अंगावर येऊन धाडकन कोसळावे, जीव वाचविण्यासाठी अवसान गोळा करण्याइतकीही उसंत मिळू नये. बेसावध क्षणी घात व्हावा असे जेव्हा होते तेव्हा त्याला झोपेत धोंडा घालणे म्हणतात. धोक्याचा जराही मागमूस नाही, पुसटशी गंधवार्ताही नाही. इथे तर घात करणारे कुणी परके नाही. ज्याच्याकडे कायम डोळे लागलेले असतात, ज्या आभाळाचा आधार असतो माणसांना, गुराढोरांना, चिमण्यापाखरांना.. त्या आभाळानेच हा घात केला आहे. झोपेत धोंडा घातला आहे. सावरायला वेळ लागेल, पुन्हा िहमत गोळा करून पाय रोवायला काही दिवस जावे लागतील. गव्हाच्या काडासारखे आयुष्य मोडून पडले आहे, जगण्याचीच गत पालापाचोळ्यासारखी झाली आहे. फळे, पाने झडून गेलेल्या झाडात आणि आयुष्यात कोणताच फरक उरलेला नाही. ‘ओस झाल्या दिशा, मज िभगुळवाणे’ अशी गत प्रत्येकाचीच.. पण असे हात-पाय गाळून कसे चालेल, धीराने उठावे लागेल, जे नष्ट झाले त्यावर जडावलेल्या मनाने माती लोटावी लागेल, मोडून पडलेल्या शिवारात चारा-पाणी शोधणाऱ्या पाखरांप्रमाणे पंखात बळ गोळा करावे लागेल आणि बेरंगी झालेल्या आयुष्यात पुन्हा नव्याने रंगही भरावे लागतील.