(भाग तिसरा)!
स्वातंत्र्याचे (दुसरे) सेनानी प. पू. अण्णाजी हजारे यांच्यामुळे यंदा प्रसारमाध्यमांची दिन दिन दिवाळी खूप खूप टीआरपीची जाणार आहे. तशी दिवाळी नोव्हेंबरमध्ये आहे. पण ती ऑक्टोबरमध्येच होणार आहे. फरक एवढाच असेल की, त्यावेळी लोक दीपोत्सव करणार नाहीत, तर मेणबत्त्योत्सव करतील! खुद्द प. पू. अण्णाजींनीच त्याचे सूतोवाच करून ठेवलेले आहे. परवा अण्णाजींचा ७५वा वाढदिवस मौजे राळेगणसिद्धी येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी संपूर्ण राष्ट्राच्या नावे संदेश देताना अण्णाजींनी, निवडणूक जाहीर होताच, येत्या ऑक्टोबरमध्ये आपण राजधानी दिल्लीमध्ये उपोषणास बसणार आहोत, असे जाहीर केले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अण्णाजींचे उपोषण आंदोलन असे काही झाले नव्हते. मध्यंतरी अरविंदभाई केजरीवाल यांनी दिल्लीत शीलाआजी दीक्षित यांच्या विरोधात उपोषण केले. पण त्यात ती गंमत नव्हती! वृत्तवाहिन्यांवरून अहर्निश प्रक्षेपण नाही, त्यास काय उपोषण आंदोलन म्हणायचे? पण आता पुन्हा एकदा स्वातंत्र्याची ती दुसरी लढाई सुरू होणार आहे. आणि अण्णांनी गेल्या काही महिन्यांत देशभरात केलेल्या ‘रॅल्यां’ना जो उदंड प्रतिसाद मिळाला, (हो, मिळाला! ज्यांचे डोळे भ्रष्ट नाहीत त्यांना तो दिसला!) ते पाहता स्वातंत्र्याच्या या दुसऱ्या लढाईमध्ये स्वातंत्र्याच्या त्या पहिल्या ‘दुसऱ्या लढाई’सारखीच मौज येणार ही राळेगणच्या काळ्या कातळावरची रेघ आहे. या मौजेस गेल्या वेळी नसलेले आणखी एक परिमाण असणार आहे. यावेळी अण्णाजींचे आमअर्जुन अरविंदभाई केजरीवाल हे दुर्योधन पक्षात असणार आहेत. याबाबतीत अण्णाजींची अवस्था भाजपचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखीच आहे. दोघांनाही त्यांच्याच अर्जुनांनी शरपंजरी धाडले आहे! अरविंदभाईंनी पक्ष काढून अण्णांना राळेगणला धाडले. पण त्यामुळे नव्हे, तर एकूणच अण्णाजींचा या पक्षपाटर्य़ावर भलताच राग असल्याने ते अरविंदभाईंच्या विरोधात आहेत. त्यांच्या मते पक्षपार्टी म्हणजे भ्रष्टाचाराचे आगार आहे. म्हणून तर त्यांच्यादृष्टीने नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे सारखेच भ्रष्ट आहेत. आजवर भ्रष्ट कोणास म्हणायचे, हा एक गहनच प्रश्न सर्वसामान्यांसमोर होता. अण्णाजींनी जो पक्षपार्टीचा सदस्य तो भ्रष्ट, अशी सुलभ राज्यशास्त्रीय व्याख्या करून तो प्रश्न कायमचा निकाली काढला आहे. त्याबद्दल त्यांना पुन्हा पद्मश्री देणे क्रमप्राप्तच आहे. लोकांनी पक्षपाटर्य़ाऐवजी स्वतंत्र, अपक्ष उमेदवारांस मतदान करावे, असा त्यांचा आदेश आहे. गंमत म्हणजे पुढची लोकसभा त्रिशंकू असण्याची  शक्यता असल्याने अण्णांच्या या आदेशाने अपक्ष मंडळी मात्र भलतीच खूश आहेत. कधी नव्हे ते त्यांना या वेळी मोजून किंमत वसूल करता येणार आहे. वस्तुत: त्यांनी अशी गाजरे खाण्याचे कारण नाही. कां की, लोकसभेत अण्णाजींच्या आदेशामुळे सगळेच अपक्ष निवडून आले, तर कोण विरोधक आणि कोण सत्ताधारी अशी सगळी पंचाईतच होईल. अशा वेळी राज्यघटना बदलण्याशिवाय अन्य पर्यायच राहणार नाही. पण अण्णाजींना त्याची फिकीर करण्याचे कारण नाही. त्यांच्यासाठी दिल्ली अजून खूप खूप दूर आहे. तूर्तास अण्णाजींचे सगळे लक्ष आगामी उपोषणाकडे आहे. हे उपोषण तरी त्यांना गमावलेला टीआरपी परत मिळवून देते की काय, हे ‘मैं हूँ अण्णाजी’नामक ‘बोल’पटाच्या आगामी तिसऱ्या भागात पाहायचे.