देश पातळीवरील फक्त ११ खेळाडूंच्या संघात ज्यांना स्थान मिळू शकत नाही अशा अनेकांचे भले या आयपीएलमुळे झाले आहे. परंतु सगळ्यांचे डोळे आहेत ते त्या खेळामागील पैशावर. त्यामुळे आयपीएल हे भानगडबाजांचे अनौरस अपत्य ठरले आणि या धुडगुसातील काही प्रकार न्या. मुदगल यांच्या समितीने उघड केले..
आयपीएल हे जन्मापासूनच भानगडबाजांचे अनौरस अपत्य आहे. न्या. मुकुल मुदगल यांच्या समितीने या अनौरसामागील भानगडबाजांवर शिक्कामोर्तब केल्याने आयपीएल नावाने क्रिकेटमध्ये जो काही धुडगूस सुरू आहे त्यात खेळ म्हणावे असे काही शिल्लक राहिलेले नाही, हे पुन्हा स्पष्ट झाले. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पैसे घेऊन निकालनिश्चिती सर्रास होत असल्याचा आरोप झाल्यानंतर गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने न्या. मुदगल यांना या प्रकरणी चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले होते. न्या. मुदगल यांनी या प्रकरणात चार महिने कसून प्रयत्न केले. त्यांच्या समितीने देशभर माग काढला, पत्रकार ते खेळाडू अशा अनेकांशी ते बोलले आणि त्यावर आधारित आपला अहवाल त्यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयास सादर केला. या समितीने केलेले महत्त्वाचे काम असे की न्या. मुदगल यांनी सचिन तेंडुलकर ते राहुल द्रविड अशा अनेकांच्या मुलाखती घेतल्या. हे महत्त्वाचे अशासाठी की भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि संघातील अन्य ज्येष्ठ खेळाडूंनी या विषयावर एरवी मौन पाळले असून त्या मौनाचा अर्थ प्रस्थापितांनी त्यांच्यासाठी सारे काही आलबेल असल्याचे सांगण्यासाठीच लावला. अशा वेळी न्या. मुदगल यांच्या अहवालाने या सर्वाचेच पितळ उघडे पडणार आहे. सचिन वा द्रविड यांनी नवख्या खेळाडूंना या प्रकरणात धोक्याचा इशारा द्यायला हवा होता, अशी अपेक्षा मुदगल यांनी व्यक्त केली आहे. तसे करावयाचे तर मुदलात निकालनिश्चितीसारखे गैरप्रकार घडतात हे भारतरत्नांनी मान्य करावयास हवे. तसे केल्यास काही भूमिका घेतली जाईल आणि मग संबंधित दुखावले जातील. हितसंबंधीयांना असे दुखावणे भारतरत्नाच्या प्रवासात आड येणारे ठरले असते. तेव्हा काही बोलण्यापेक्षा मौन सर्वार्थ साधक असते. या प्रकरणातही तेच झाल्याचे न्या. मुदगल यांच्यामुळे समोर आले. भारतीय क्रिकेट व्यवस्थापनाचे सर्वेसर्वा एन श्रीनिवासन यांचे जामात गुरुनाथ मय्यपन हेच निकालनिश्चिती प्रकरणात केंद्रस्थानी आहेत असा स्पष्ट ठपका न्या. मुदगल यांनी आपल्या अहवालात ठेवला असून त्यामुळे भस्मविलेपित श्रीनिवासन हेच उघडे पडणार आहेत. खेरीज बॉलीवूडमधील किरकोळ अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा नावाचा तिचा नवरा यांचीही या प्रकरणात भूमिका संशयास्पद असून त्यांची अधिक चौकशी व्हायला हवी असे न्या. मुदगल यांना वाटते. यातील मय्यपन हे चेन्नई सुपर किंग्ज नावाच्या संघाचे मालक आहेत. वास्तविक आपला सासरा भारतीय क्रिकेट संघटनेचा प्रमुख असताना आपण एखाद्या संघाचे मालक होऊन स्पर्धेत उतरणे योग्य नाही, हे या गुरुनाथास कळावयास हवे होते. परंतु त्यास ते समजले नाही. परंतु आपल्या जामातास आवश्यक ती समज नाही हे लक्षात आल्यावर खुद्द श्रीनिवासन यांनी यात लक्ष घालून हा परस्परसंबंधांचा आरोप टाळणे गरजेचे होते. त्यांनीही ते केले नाही.
याचे कारण यातील कोणालाही क्रिकेटचे मोल फक्त क्रीडा प्रकार म्हणून नाही. या सगळ्यांचे डोळे आहेत ते त्या खेळामागील पैशावर. अन्यथा दीडदमडीच्या शिल्पा शेट्टी वा तत्सम मंडळींना क्रिकेटमध्ये रस निर्माण होण्याचे काहीही कारण नव्हते आणि नाही. क्रिकेट असो वा राजकारण वा इमारत बांधणी, अलीकडच्या काळात झटपट श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग म्हणून या क्षेत्रांकडे पाहिले जाते. त्यातूनच राजीव शुक्ल वा ललित मोदी यांच्यासारखे बोगस लोक झपाटय़ाने मोठे होतात आणि आपल्या विकत घेतलेल्या मोठेपणातून सामाजिक मान्यता मिरवू पाहतात. क्रीडा क्षेत्रात का यावयाचे तर, त्यात पैसा आहे म्हणून. तो पैसा का हवा, तर व्यवस्था हातात ठेवायची म्हणून. आणि हे दोन्ही हवे आहे म्हणून राजकारण हवे असे हे त्रांगडे आहे. अन्यथा प्रफुल्ल पटेल किंवा अरुण जेटली किंवा प्रियरंजन दासमुन्शी आदी मंडळींना वेगवेगळ्या क्रीडा संघटनांचे प्रमुख म्हणून राहण्याची इच्छाच होती ना. वास्तविक क्रिकेट नियामक मंडळाचे प्रमुख श्रीनिवासन हे इंडिया सिमेंट्स या कंपनीचे मालक. खरे तर समस्त आयपीएल नावाच्या डोंबाऱ्याच्या खेळात चेन्नई सुपर किंग्ज हा एकच संघ असा आहे की जो भांडवली बाजारात नोंदलेल्या कंपनीच्या मालकीचा आहे. याचा अर्थ त्या संघावर किती खर्च केले याचा हिशेब इंडिया सिमेंट्स या कंपनीस द्यावा लागतो. अन्य बरेच संघ हे खासगी पैशातून स्थापन झालेले आहेत आणि त्या पैशाचा काहीही आगापिछा नाही. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता यांच्या महनीय औद्योगिक कार्याबाबत आपण सगळेच अज्ञ आहोत. पण तरीही मुंबई इंडियन्स या अतिश्रीमंत संघाच्या त्या मालकीणबाई आहेत आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर हे त्यांच्या पदरी सेवेत आहेत. थोर अभिनयातून कमावलेल्या कोटय़वधींतून शाहरुख खान यांनीदेखील एक संघ आपल्या अंगणात बांधलेला आहे. राज कुंद्रा हे ब्रिटनमध्ये फुटकळ उद्योग करून मोठे झालेले उद्योगराव. ब्रिटनसारख्या देशात जाऊन आपल्या कुडमुडय़ा उद्योगांनी धनाढय़ झालेल्या भारतीय पिढीचे ते प्रतिनिधी. काश्मिरातून हजारोंनी पश्मिना शाली घ्यावयाच्या आणि ब्रिटनमधल्या दुकानांना विकायच्या हे त्यांचे औद्योगिक कौशल्य. याच्या आणि शिल्पा शेट्टी यांच्या संघाचे नाव राजस्थान रॉयल्स. हा संघ सामनानिश्चितीत अडकल्याचे निष्पन्न झाल्याने हे राजस्थानी रॉयल्स किती दरिद्री आहेत, याचे दर्शन झाले. आपल्या खटपटय़ालटपटय़ा स्वभावामुळे चार पैसे हाती आले की या आणि अशा अर्धवटरावांना आपण खरोखरीचे उद्योगपती आहोत असे वाटू लागते आणि माध्यमांच्या प्रकाशझोतामुळे आपणच तेजस्वी असल्याचे ते मानू लागतात. यातील या सर्वाचे हे असे झाले आहे. मुदगल यांच्या चौकशीमुळे यातील काही उघडकीस आले. अन्य नाही, इतकेच.
वस्तुत: हा सगळा प्रकारच किडक्या व्यवस्थेचा निदर्शक असून आपल्या देशात कोणत्याही क्षेत्राच्या नियमनाबाबत किती उदासीनता आहे, याचा प्रत्यय यावा. गतवर्षी श्रीशांत या जलदगती गोलंदाजास निकालनिश्चिती प्रकरणात अटक झाल्यापासून या प्रकरणाची व्याप्ती जनसामान्यांना कळून आली. आपल्या वागण्यातली आक्रमकता श्रीशांत याने काही प्रमाणात गोलंदाजीत उतरवली असती तर त्याचे आणि संघाचेही भले झाले असते. त्याच्याबरोबरीने अनेक खेळाडू यात गुंतल्याचे आढळल्याने जनतेस क्रिकेटच्या धावपट्टीखालील सडकेपणाचा आता तरी अंदाज आला असेल. गेल्या आठवडय़ात दिल्लीत एका मोटारीतून आठ कोटींची रोकड लंपास करण्यात आल्याचे प्रकरण घडले. ही रोख रक्कम सामनानिश्चिती उद्योगातल्या दलालांची होती असे आढळून आले. यामुळे क्रिकेट या खेळाचा किती बट्टय़ाबोळ झाला आहे, हे लक्षात यावे.
अर्थात, आयपीएल या प्रकारामुळे क्रिकेट खेळाडूंना प्रचंड प्रमाणावर ऊर्जितावस्था आली आहे, हे नाकारता येणार नाही. देश पातळीवरील फक्त ११ खेळाडूंच्या संघात ज्यांना स्थान मिळू शकत नाही अशा अनेकांचे भले या आयपीएलमुळे झाले आहे. त्याचबरोबर गावोगाव मैदाने वा तत्सम सुविधा उभ्या राहण्यासदेखील या सामन्यांमुळे मदतच झाली आहे. अशा वेळी त्याचे निरोगी नियमन करणे आवश्यक होते. ते झाले नाही. परिणामी नुकसान झाले ते क्रिकेट या खेळाचेच. ते करणाऱ्या क्रिकेटकरंटय़ांना कठोर शिक्षा करून ते भरून काढण्याचा प्रयत्न तरी सरकारने करावा.