News Flash

वरदहस्त: कोणाचा? कोणाला?

महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले आणि जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीच्या काळात देशाला दुसरे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले,

| May 20, 2014 01:05 am

महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले आणि जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीच्या काळात देशाला दुसरे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले, या यादीत आता बाबा रामदेव हेही नाव आदराने समाविष्ट होते आहे. लवकरच देशातील सरकारी कार्यालयांमध्ये या बाबांचे छायाचित्र भिंतींवर लटकले, तरी आश्चर्य वाटू नये, अशा शब्दांत खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि होणाऱ्या पंतप्रधानांचे विश्वासू सल्लागार अरुण जेटली यांनी त्यांची भलामण केली आहे. आचरटपणाची सगळी हद्द ओलांडणाऱ्या बाबा रामदेव यांना भाजपने काहीच दिवसांपूर्वी ‘संतपद’ बहाल केले होते. ते कमी म्हणून की काय, आता याच पक्षाच्या नेत्यांनी त्यांना एकदम गांधी आणि जेपींच्या रांगेत नेऊन बसवण्याचे ठरवले आहे. देशातील जनता सुदृढ व्हावी, या हेतूने सुरू झालेले बाबा रामदेवांचे अभियान गेल्या काही वर्षांत इतके भरकटले की, योगाऐवजी या देशात काँग्रेसविरहित सरकार यावे, असा एककलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. भाजपचाही हाच कार्यक्रम होता आणि त्या प्रयत्नांना देशातील मतदारांनी नव्हे, तर रामदेव यांनीच खरा हातभार लावला आहे, असे आता भाजपलाही वाटू लागले आहे. सत्ता भ्रष्ट कशी करते याचा याहून वेगळा नमुना पाहायला मिळणार नाही. बाबांच्या आचरटपणाला भाजपच्या बावळट विधानांनी मदत करण्याची खरे तर काहीही आवश्यकता नव्हती. या रामदेवाची जी लोकप्रियता वाढली, ती त्यांच्या योगकौशल्यामुळे. राजकीय विधानांमुळे नाही. राहुल गांधी यांच्याबद्दलच्या या बाबांच्या विधानाने जो गदारोळ उडाला, त्यानंतरही भाजपने त्यांना आपल्या कंपूत सहभागी करून घेण्याच्या हेतूने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवले. परदेशी बँकांमध्ये असलेला काळा पैसा परत आणणे हा या बाबांचा आणखी एक कार्यक्रम. तो प्रत्यक्षात येणे कठीण. या बाबांच्या मागे लागून सारा देश मतदानाला प्रचंड प्रमाणात सहभागी झाला, यावर सहसा कुणाचाही विश्वास बसणार नाही, असे म्हणणे हा लोकशाहीचाही अपमान होईल. परंतु भाजप नेत्यांचा त्यावरही विश्वास बसला आहे. एखाद्याचा बाबा करणे हे आजकालच्या सामाजिक परिस्थितीत सहजसोपे झाले आहे, याचे हे एक उदाहरण. रामदेव हे आधीपासूनच बाबा होते. हे ‘बाबापण’त्यांनी भाजपच्या दावणीला बांधले. त्यामुळे मागे लागलेला ससेमिरा नष्ट होईल, एवढीच त्यांची माफक अपेक्षा. त्यांच्या आश्रमात झालेल्या अनेक प्रकारच्या घोटाळ्यांबद्दल आज जे तुरुंगात आहेत, त्यांना बाहेर काढून हा आश्रम या बाबांना पुन्हा एकदा सजवायचा आहे. कधीकाळी आपण रामलीला मैदानातून स्त्रीवेशात पळून गेलो होतो, ही आठवणही त्यांना पुसायची आहे. गेल्या दशकभरात देशातील सगळ्याच बाबा आणि बापूंनी राजकारणात उरतण्याचे ठरवलेले दिसते. सत्ताधाऱ्यांना त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा हवा  असतो आणि त्यासाठी त्यांचा वरदहस्त हवा असतो. पण  नेमके उलटे घडत आहे. सत्ताधारी पक्षच अशा लोकांवर राजकीय वरदहस्त ठेवत आहेत. असे घडणे हे लोकशाहीला मारक  असते. सत्तेत येत असलेल्या भाजपने त्याचे भान ठेवणे आवश्यक आहे. भाजपच्या वतीने निवडणूक प्रचारादरम्यान अशा अनेक बाबा-बापूंनी जे तारे तोडले, ते भाजपच्या प्रतिमा उजळण्यासाठी मुळीच फायद्याचे नाहीत. असे करण्याने आपण सत्ताधाऱ्यांना खूश करू शकतो, असा समज होऊ देणे तर अधिकच गंभीर आहे. नव्या सरकारपुढील हे अंतर्गत आव्हान अधिक जोखमीचे आहे. त्याला राजनाथ किंवा जेटली यांच्यासारख्यांनी अगोचरपणा करून टाचणी लावता कामा नये. असला मूर्खपणा सत्तेला महागात पडू शकतो, हे वेळीच समजणे त्यासाठी आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2014 1:05 am

Web Title: jaitley compares ramdev to mahatma gandhi
Next Stories
1 विहंगमनाचा माणूस..
2 मनमौजी
3 एसटीची चाके पंक्चर!
Just Now!
X