‘तीन पै- एक पैसा, चार पैसे- एक आणा, सोळा आणे- एक रुपया’ हे कोष्टक लहानपणी पाठ केलेले ७० ते ९०-९५ या वयोगटातले अनेक वृद्ध अजूनही आहेत. त्या काळच्या नाण्यांना त्यांचे रूप, आब आणि वजन होते. इवलीशी पै, तांब्याचा भोकाचा पैसा, कंगोरे असलेला एक आणा, चौकोनी दोन आणे (चवली म्हणत तिला), पावली, अधेली आणि शुद्ध चांदीचा भक्कम रुपया. पुढे ही नाणी बनविणारे व वापरात आणणारे ब्रिटिशही गेले. त्यांच्यापाठोपाठ ती नाणीही गेली. एखादी अंध व्यक्तीही स्पर्शाने नाणे कोणते आहे ते ओळखू शकत असे. आता दृष्टी असलेल्या माणसालाही ५० पैसे, रुपया, दोन रुपये व पाच रुपये ही नाणी ओळखता येणे कठीण. सगळ्यांचा एकच आकार.
 ब्रिटिश गेले, आपले सरकार आले. त्यांनी नवी दशमान पद्धत प्रचारात आणून नवी नाणी बनवली. त्यातले १ पैसा, २ पैसे, ३ तीन पैसे, ५ व १० पैसे ही नाणी कधी इतिहासजमा झाली ते कळलंही नाही. २५ पैशांचे नाणे, त्याला काही किंमत नव्हती तरी आता आतापर्यंत जीव धरून होते. व्यवहारात बस कंडक्टरशिवाय कोणीही ते घेत नव्हते. हा! दानधर्माला मात्र ते उपयोगी पडायचे. अखेरीस सरकारनेच अधिकृतरीत्या त्याच्यावर बंदी आणली, चलनातून त्याला बाद केले. ५० पैशांच्या नाण्यांची तीच गत होणार आहे. कारण कोणत्याही वस्तूची किंमत ‘क्ष’ रुपये ५० पैसे अशी नसते.
मला तर वाटते रुपया, दोन रुपये ही नाणीसुद्धा चलनातून लवकरच बाद होतील. आठ रुपये पाव किलो असा जर भाजीचा भाव असेल तर भाजीवाला दहा रुपयांची ३०० ग्रॅम घ्या म्हणून गळ्यात मारतो. हा अनुभव सर्रास सगळ्यांनाच येतो. दोन रुपये सुटे देण्याची भानगड नाही आणि आता तर रुपया-दोन रुपयांची नाणी चलनातून बाद करण्याचा सरकारनेच चंग बांधलेला दिसतो. रेल्वेची भाडेवाढ करताना सरकारने भाडेआकारणी पाच रुपयांच्या पटीत केली आहे. रुपया, दोन रुपये यांचे नावच काढू नका.माझी सरकारला सूचना आहे सरकारने कायदा करून सर्व वस्तूंच्या सेवांच्या किमती दहा रुपयांच्या पटीत बसवाव्या. आता पेट्रोल, गॅस, मोबाइल फोन, वीज यांची बिले काही रुपये, काही पैसे अशी असतात. उदाहरणार्थ १२९ रु. ५६ पैसे किंवा ११५ रु. ३४ पैसे हे वरचे सुटे पैसे इच्छा असूनही देणारा देऊ शकत नाही. हे आकडे रु. १३० किंवा रु. १२० असे कायद्याने केले तर हिशेबालाही अगदी सोपे. लोक बोंबलतील काही दिवस, पण मग होईल सवय. यात किती लोकांचा फायदा असेल ते पण लक्षात घ्या ना!

यापुढे निराशावादाशीच सामना आहे!
राजीव साने यांच्या ‘गल्लत, गफलत गहजब’ या सदरातील ‘निराशावाद : फक्त त्रागा करण्यापुरता’ हा लेख (२६ जानेवारी) वाचला. आजचे जग प्रचंड निराशावादाने भारलेले (भरलेले नव्हे) दिसून येते. पूर्वी विस्तीर्ण असलेले जग आज मुठीत आल्याने एखाद्या देशातली वाईट बातमी तात्काळ दुसऱ्या देशातील जनतेपर्यंत विनासायास पोहोचताना दिसतेय आणि मग जग हळूहळू खेडे झाल्याचा आभास (भास नव्हे) निर्माण होऊ लागला आहे. जगातल्या तमाम दूरचित्रवाणी वाहिन्या वा अन्य माध्यमे पुन:पुन्हा निराशावाद प्रेक्षकांच्या माथी मारण्याचे सत्कार्य करताना दिसताहेत, सतत हॅमिरग करताना दिसताहेत.
मग सारे जगच तसे असल्याचा आभास व्हायला लागतो. बलात्कार म्हटले की सारीकडे बलात्कारच दिसायला लागतात. मग कुणी सारासार विचार न करता प्रत्येक बलात्काऱ्याला फाशीच द्यायची मागणी करू लागला की सारे तेच बरळू लागतात. अशा प्रकारे लोकांच्या मनात खोलवर निराशावाद रुजविण्याचे कार्य प्रसारमाध्यमे अहमहमिकेने करू लागतात. जोरदार तक्रारी मांडल्या जातात, पुन्हा काही दिवसांनी सारे काही शांत होते.
राजीव साने यांनी सदर लेखात सुरुवातीलाच नमूद केल्याप्रमाणे, ‘जबाबदारीने पत्रकारिता करणाऱ्यांना जणू एक शापच आहे.’ कारण वाईट बातमीची छाप जितक्या लवकर जनमानसावर पडते, तेवढी चांगल्या बातमीची पडत नाही. त्यामुळे यापुढील काळात आपणांस नतिक मूल्ये जपणाऱ्या प्रसारमाध्यमांकडूनदेखील फक्त बलात्कार, खून, मारामाऱ्या यांच्याच ढीगभर बातम्या वाचून, हळहळ व्यक्त करून, निराशावादच जोपासायचा आहे हेही तितकेच खरे.
धनराज खरटमल, कांजूरमार्ग

संमेलनाची ‘समृद्ध अडगळ’ तीन वर्षांनी व्हावी
कोकणातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सालाबादप्रमाणेच वाक्युद्धाच्या दुंदुभीने संपन्न झालं. त्यातून कुणाला काय मिळालं ते चाणाक्ष वाचक, लोक समजून आहेत, वाचकांच्या पदरात मात्र अध्यक्षीय भाषण आणि काही परिसंवाद सोडले तर मराठी भाषेच्या संवर्धनासाठीचं फारसं काही गवसत नाही.
एक वर्षांच्या खूप कमी कालावधीसाठी निवडलेल्या अध्यक्षांना फारसं काही करता येत नाही. गेल्या वर्षी डहाके यांनी सूत्रं हाती घेतल्यानंतर चारच महिन्यांत पुढल्या वर्षीच्या अध्यक्षांच्या निवडीची चर्चा सुरू झाली. त्यामुळे नव्या अध्यक्षांच्या निवडणुकीचंच ग्लॅमर ‘गाजलं’. या साऱ्या गाजेत डहाके यांनी केलेल्या कार्याचा झोत, अपवाद असलाच आणि तो सोडला तर कुठंच दिसून आला नाही.
म्हणूनच संमेलनाची ही ‘समृद्ध अडगळ’ तीन वर्षांतून एकदा व्हायला हवी, जेणेकरून अध्यक्षांनाही थोडा वेळ घेऊन काही ठोस काम करता येईल, विचारांना प्रत्यक्षात उतरवता येईल. शिवाय सध्याच्या वीज, पाणी अशा टंचाईकाळात दरवर्षीचे हे अक्षरकुंभमेळे भरवणं इतकंही अत्यावश्यक नाही. साहित्य परिषदे/महामंडळाच्या घटनेमध्ये दरवर्षी संमेलन भरवावं हे अनिवार्य नसल्याचं उषाताई तांबे यांनीही दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात म्हटले आहेच, वाचक इच्छा असेल तर ग्रंथखरेदी कुठंही करतो. साहित्यिकांना कुठंही भेटू शकतो आणि त्यातून संमेलनाच्या ठिकाणच्या दिवंगत प्रसिद्ध व्यक्तींच्या नावावरून होणारे वाद, चर्चा मनालाही क्लेश देतात, त्यापेक्षा मराठी भाषेच्या जपणुकीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था, ग्रंथालयं, यांना प्रोत्साहन मिळेल असे काही उपक्रम आणखी जोमाने राबवावे असं नम्रपणे साहित्य महामंडळ तसेच संबंधितांना सुचवावंसं वाटतं.
– संदीप राऊत,
 कोमसाप, वसई शाखा, कोषाध्यक्ष.

ही अवहेलना   की अनभिज्ञता?
मी गेली अनेक र्वष ‘लोकसत्ता’चा नियमित वाचक आहे. पृष्ठसजावटीच्या दृष्टीनं आपल्या पुरवण्या अत्यंत सुधारल्या आहेत. विविध विषयांची निवड हा त्यातला एक भाग आहेच, तसंच या लेखांसाठी, त्या त्या विषयांना समर्पक, अर्थपूर्ण चित्रं काढणाऱ्या नीलेश जाधव या अष्टपैलू चित्रकाराचंही मोठं योगदान आहे. काही चित्रकारांची एक ठराविक खासियत असते. तिच्यापलीकडचं काम त्यांना जमतंच असं नाही. कथा चित्रकाराला व्यंगचित्रं- विशेषत: राजकीय व्यक्तींची- काढणं जमतंच असं नाही, तसंच व्यंगचित्रकाराला वास्तववादी चित्रं काढणं जमतंच असं नाही. पण नीलेश मात्र दोन्ही प्रकारांत सारख्याच सहजतेनं वावरतात. जितक्या सहजतेनं ते गंभीर चित्रं काढतात तितक्याच सहजतेनं बालमैफलही रंगवतात. अर्कचित्रातही त्यांचा हातखंडा आहेच, पण वास्तववादी ‘व्यक्तिचित्रं’ काढण्यात- तीही निरनिराळ्या शैलीत- ते जाम भारी आहेत.
सांगायचं काय, तर इतकं वैविध्यपूर्ण काम करूनही, जेव्हा वाचक लेखांवर प्रतिक्रिया देतात, त्यात चित्रांविषयी काहीही लिहिलं जाऊ नये. (कौतुक सोडाच!) याचं आश्चर्य वाटतं. ही कलेविषयी अनभिज्ञता समजावी की अवहेलना समजावी?
असं का व्हावं! कोणी सांगेल का?
जाता जाता, चिपळूणच्या साहित्य संमेलनातील ‘आमच्या रेषा बोलतात’ या चित्रकारांच्या परिसंवादात खरं तर नीलेशनाही आमंत्रण मिळायला हवं होतं. असो.
– कमल शेडगे, मुलुंड, मुंबई.