मान्सून सुरू होण्याआधी महाराष्ट्रात भीषण दुष्काळाचे चटके बसत असताना, राज्याचे अवघे मंत्रिमंडळ दुष्काळावरील कायमच्या उपाययोजनांच्या बाजूने बोलत होते, त्याच वेळी तात्पुरत्या उपाययोजनांसाठी केंद्र सरकारकडे मदतीची याचनाही करत होते. भविष्यात अशा संकटांना तोंड देण्यासाठी कायमच्या उपाययोजना आखण्याचे शहाणपण सरकारला सुचले असेल, अशी जनतेची भावना होती. मान्सूनच्या पावसाचे दमदार आगमन होताच, पंढरपुरात विठ्ठलासमोर समाधान व्यक्त करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील दुष्काळाच्या चिंतेच्या साऱ्या रेषा पुसल्या गेल्या होत्या आणि दुष्काळाच्या कचाटय़ातून मुक्त झाल्याचा आनंद अवघ्या राज्यावर पसरला होता. विदर्भात तर पावसाने एवढा कहर केला की तेथे ओला दुष्काळ जाहीर करावा लागेल अशी वेळ आली. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ओसंडून वाहू लागताच, मुंबईकरांचा आनंदही ओसंडून वाहू लागला.
कोकणात आनंदाचे धबधबे कोसळू लागले, तर पश्चिम महाराष्ट्रावरही समाधानाची सावली पडली. मग दुष्काळाच्या त्या चटक्यांच्या जखमा इतक्या पुसल्या गेल्या की कायमस्वरूपी उपायांच्या त्या आणाभाकाही त्यामध्ये विस्मरणाच्या कप्प्यात जाऊन बसल्या. बरोबर पाच आठवडय़ांपूर्वी, जुलच्या अखेरीस, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलनीतीज्ञ राजेंद्र सिंह यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी स्थितीचे नेमके विश्लेषण करताना राज्यकर्त्यांवरच ठपका ठेवला आणि नियोजनाचा अभाव, सामान्य माणूस हा केंद्रिबदू न मानता कंत्राटदारधार्जण्यि  धोरणांची चटक व मृतवत नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांची अनास्था यांवर बोट ठेवत सरकारचेच कान उपटले.  त्या वेळी तरी सरकारला आपल्या विस्मृतीची जाणीव होईल आणि दुष्काळावरील कायमस्वरूपी उपाययोजनांच्या आखणीवर भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, पावसाच्या सरींसोबत कोसळणाऱ्या आनंदलहरींत न्हाऊन निघताना या समस्येचे गांभीर्यच समजले नाही. पावसाळ्याचा जोर ओसरताच आता पुन्हा दुष्काळाच्या चिंतेने डोके वर काढले आहे आणि पुन्हा जुन्याच सवयीप्रमाणे राज्य सरकारने केंद्राकडे मदतीसाठी हातदेखील पसरले आहेत. विक्रमी पावसाची स्वप्ने पडत असतानाच, ऑगस्टच्या अखेरीअखेरीस पावसाने सरासरीलाही बगल देण्यास सुरुवात केली आहे. आता येत्या काही दिवसांत या परिस्थितीत बदल होण्याचीही चिन्हे नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. हवामान खात्याचे अंदाज हा चेष्टेचा विषय होऊ लागल्याने, हे खाते अधिक गांभीर्याने अंदाज वर्तवू लागले आहे. त्यामुळे आणि सध्या आकाशात दिसणाऱ्या ढगांच्या तुरळक अस्तित्वाकडे पाहता, उर्वरित पावसाचा हवामान खात्याचा अंदाज गांभीर्याने घेणे भाग आहे. राज्याच्या अध्र्या भागातील पावसाने सरासरीलाही चकवा दिला आहे. मराठवाडय़ात तर मान्सूनपूर्व दुष्काळाच्या परिस्थितीने पुन्हा उचल खाल्ल्याची चिन्हे आहेत. तेथे पावसाने सुरुवात चांगली केल्याने पिकांना उभारी मिळाली असली, तरी भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होण्यासाठी आवश्यक असलेले पाणी जमिनीत मुरलेलेच नाही. ऑगस्ट संपत आल्यानंतरही जनावरांच्या छावण्या आणि पाण्याचे टँकर यांपासून मराठवाडय़ाला मुक्ती मिळालेलीच नाही. दुष्काळापासून धडा घेण्याची साधी इच्छाशक्तीदेखील दाखविली गेली नाही, एवढाच अर्थ यातून काढला जाऊ शकतो. मराठवाडय़ातील शेतकऱ्यांनी आपापल्या परीने काही उपाययोजना सुरू केल्या. त्याला सरकारी पाठबळ मिळाले असते, तरी या उपाययोजनांना उभारी आली असती. भूजलाची पातळी राखणे हाच दुष्काळावरील कायमस्वरूपी उपाय आहे, एवढा समंजसपणा शासनाकडे असेल, असा राज्यातील जनतेचा अजूनही विश्वास आहे. तो  जपला नाही, तर पुढे काय हे ओळखण्याची क्षमता तरी राजकारण्यांमध्ये असायला हवी.