काही वर्षांपूर्वीपर्यंत खूप खोल, शांत, नितळ, प्यायला वापरता येईल अशा पाण्याचा स्रोत असलेली, उत्तम दगडी बांधकाम असलेली ही जुनी विहीर, आता गणपती विसर्जनासाठी वापरली जाते. भर पावसाळ्यात आणि यावर्षी भरपूर पाऊस झालेला असूनही, सकाळी टँकरने पाणी भरून ती विसर्जनासाठी तयार करावी लागते. पाण्याचे झरे आटले, की प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे बंद झाले, की काय झालं? एरवी वर्षभर दुर्लक्षित असते, म्हणून पाण्याचा उपसाही नाही. खूप वर्षांपूर्वी बाजूच्या कारखान्याला भीषण आग लागली असताना अग्निशमन दलाने याच विहिरीतून पाणी उपसून आग विझवली होती. आता उरलीय फक्त विसर्जनापुरती. 
गणपती विसर्जन टँकरमध्येच का करू नये ?
या कामासाठी वेगळे टँकर बनवावेत का? विसर्जनासाठी आत सहज उतरता येईल, गाळ साफ करण्यासाठी उघडता येईल असे. टँकर एका ठरलेल्या ठिकाणी येईल, तिथे जाऊन विसर्जन करायचं. असे वापरलेले टँकर काही दिवस तसेच ठेवून नंतर आतील गाळाची शहराच्या बाहेर नेऊन टाकण्याची योग्य व्यवस्था करायची. पाण्याचे नैसर्गिक स्रोत प्रदुषित होऊ नयेत म्हणून हे करता येईल का?
– विनील भुर्के