30 September 2020

News Flash

कादंबरीमय मोगलकाळ

भारतीय उपखंडाच्या इतिहासात १५व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते १९व्या शतकाच्या मध्यापर्यंतचा काळ मोगल साम्राज्याच्या वादळी उदयास्तानं व्यापलेला आहे.

| February 8, 2014 03:50 am

भारतीय उपखंडाच्या इतिहासात १५व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते १९व्या शतकाच्या मध्यापर्यंतचा काळ मोगल साम्राज्याच्या वादळी उदयास्तानं व्यापलेला आहे. वडिलांकडून तैमूरलंगाचा व आईकडून चंगेझ खानाचा वंशज असलेल्या जहिरुद्दीन मुहम्मद बाबरनं मोगल साम्राज्याचा पाया भारतात घातला. बाबरपासून ते शहाजहानपर्यंत- औरंगजेबाच्या गादीवर येण्याच्या कालखंडापर्यंतचा इतिहास ‘एम्पाअर ऑफ द मोगल’ या पाच खंडांच्या ऐतिहासिक कादंबरी-मालिकेत अतिशय नाटय़मयतेनं आला आहे. डायना आणि मायकल प्रेस्टन या लेखकद्वयीनं अ‍ॅलेक्स रुदरफोर्ड या टोपणनावानं ही कादंबरी-मालिका लिहिली आहे. बाबरच्या कारकिर्दीवरचा पहिला खंड- ‘रायडर्स ऑफ द नॉर्थ’; हुमायूनच्या कालखंडावरचा दुसरा खंड- ‘ब्रदर्स अ‍ॅट वॉर’; पाच खंडांमधला तुलनेनं काहीसा मोठा तिसरा खंड सम्राट अकबरच्या वैभवशाली कारकिर्दीचा- ‘रुलर ऑफ द वर्ल्ड’; नंतर जहाँगीराच्या साम्राज्याचा चौथा खंड- ‘द टेंटेड थ्रोन’; आणि शेवटचा खंड शहाजहान-औरंगजेब यांच्यावरचा- ‘द र्सपटस् टूथ’ अशी ही मालिका आहे.
डायना आणि मायकल प्रेस्टन हे अनुक्रमे ऑक्सफर्ड विद्यापीठातले इतिहास आणि इंग्रजीचे विद्यार्थी. ताजमहालाच्या स्थापत्य आणि बांधकामावरच्या आपल्या संशोधन प्रकल्पाच्या निमित्तानं ही दोघं भारतात काही काळ होती. या संशोधनाचं ‘अ टिअरड्रॉप ऑन द चीफ ऑफ टाइम’ असं पुस्तक करायचं त्यांच्या मनात होतं. याच संशोधनामुळे त्यांची जिज्ञासा तीव्र झाली आणि त्यांनी एकूण मोगल राजवंशाचाच सुरुवातीपासून अभ्यास सुरू केला. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनचे त्यांनी कालानुक्रमे इतिवृत्त मिळवून वाचले. ज्या ज्या इतिहासकारांनी या साम्राज्याच्या समकालीन नोंदी लिहून ठेवल्या त्या सगळ्याच त्यांनी अभ्यासलेल्या दिसतात. या कादंबऱ्यांमधून या इतिहासकारांची पात्रं आहेतच आणि या विविध नोंदी विशिष्ट पद्धतीनेच लिहिण्यामागची त्यांची आणि तत्कालीन सम्राटाची भूमिकाही लेखक अत्यंत कल्पकतेनं समोर आणतात. उदाहरणार्थ, ‘रुलर ऑफ द वर्ल्ड’ या अकबरावरच्या कादंबरीत ‘ऐन-ए-अकबरी’ लिहिणाऱ्या अबुल फजलचे पात्र आहे आणि त्याचे अकबराशी तसेच जहाँगीराशी संबंध कसे होते याचेही इतिहासाच्या निर्दोष अभ्यासातून आणि स्वतंत्र दृष्टिकोनातून चित्रण आले आहे. अशा अभ्यासाशिवाय हे लेखकद्वय मोगल साम्राज्याच्या ज्या ज्या प्रांतात स्पष्टास्पष्ट खुणा उमटलेल्या आहेत त्या सगळ्याच प्रांतांत प्रवास करते झाले. अशा व्यासंग, फिरस्ती, अभ्यासाच्या पाश्र्वभूमीवर जवळजवळ दोनशे वर्षांच्या कालखंडाचं, त्यात होऊन गेलेल्या सहा सम्राटांचं, अभूतपूर्व युद्धांचं, अंतर्गत बंडाळ्यांचं, कुशल प्रशासनाचं, क्रूर विश्वासघातांचं, पराभव-विजयांचं धैर्य आणि आशेचं हे जिवंत चित्रण आहे. इतिहासाशी प्रतारणा न करता डायना आणि मायकल प्रेस्टननं आपल्या अप्रतिम कल्पनाशक्तीचा वापर करत प्रपाती शैलीत हा इतिहास कादंबऱ्यांच्या रूपानं मांडला आहे.
एक तर सिंहासन किंवा थेट थडगं अशा काहीशा खुनशी महत्त्वाकांक्षेनं सत्ता बळकावणाऱ्या या राजवंशाच्या दयनीय पतनाची बीजं ही निव्वळ अंतर्गतच होती, ही खरोखर मोठी शोकांतिका आहे असं तंतोतंत निरीक्षण या दोन लेखकांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं. कारण या राजवंशातल्या एकाही सम्राटाला सरळथेट सत्ता मिळाली नव्हती. प्रत्येकाला ती हिसकावूनच घ्यावी लागली आणि त्यासाठी त्यांनी आप्तस्वकीयांची आयुष्यं उद्ध्वस्त करून टाकली.
‘रायडर्स फ्रॉम द नॉर्थ’ या पहिल्या खंडात बाबरच्या संघर्षमय कारकिर्दीचा आलेख आहे. या कादंबरीसाठी मूळ आधार ‘बाबरनामा’ हे बाबरचं आत्मचरित्र जरी असलं तरी ऐतिहासिक कादंबरीकारानं घ्यावं तेवढं स्वातंत्र्य लेखकांनी घेतले आहे. म्हणून बाबरच्या आयुष्यात आलेली किंवा नोंदवली गेलेली सगळीच माणसं इथं आपल्यासमोर येतात असं नाही. लेखकांच्या कल्पनाशक्तीतून किती तरी पात्रांचं मिळून एकच पात्र नव्यानं तयार होणे ही गोष्ट या कादंबरीतच नव्हे, तर संपूर्ण मालिकेतच आपल्याला अनुभवता येते. ‘रायडर्स ऑफ द नॉर्थ’मध्ये, उदाहरणार्थ, बाबरी, बैत्यांघर, वझिर खाँ ही पात्रं अशा स्वरूपाची आहेत. बाबरच्या बहिणीचं- खानझादा- चित्रण मात्र अप्रतिम कौशल्यानं केलेलं आहे. खानझादा दुसऱ्या- हुमायूनवरच्या ‘ब्रदर्स अ‍ॅट वॉर’ या कादंबरीतही धीरोदात्ततेचं, खंबीरपणाचं, सदसद््विवेकबुद्धीचं आणि पालकत्वाच्या विलक्षण आधाराचं प्रतीक म्हणून येते. एक सम्राट, त्याचे आप्तस्वकीय, शत्रू, त्याच्या काळात होणाऱ्या कालानुक्रमे घटना यांच्या कल्पक चित्रणात फारसं यश नाही, तर ते आहे त्या विशिष्ट कालखंडातली अरबी संस्कृती सगळ्या वैशिष्टय़ांसकट उभी करण्यामध्ये आणि ते या लेखकांना प्रत्येक कादंबरीत साध्य झालेलं आहे.
‘ब्रदर्स अ‍ॅट वॉर’ या पूर्ण कादंबरीभर पराभवाचं आणि वरचेवर वाटय़ाला येणाऱ्या असहायतेचं सावट पसरलेलं असलं तरी, अगदी हुमायूनच्या मानसिकतेसारखाच, आशेचा अव्याहत अंत:स्रोत तेवत असलेला दिसतो. ऐतिहासिक कादंबरीचा म्हणून एक स्वतंत्र स्वभाव या कादंबरीला निश्चित आहे. संधीचा अचूक फायदा घेत आपल्या बेहद्द धीटपणाच्या आणि अंगभूत शहाणपणाच्या जोरावर शेरशाह सूरीने मोगलांकडून सत्ता काबीज केली, हुमायूनचा दोनदा पराभव केला. त्यानंतर आपल्या पारंपरिक मित्र-सत्तांचा आधार घेत परावलंबी आयुष्य जगण्याची नामुष्की हुमायूनवर ओढवली. या परिस्थितीत त्याची पत्नी हमिदा, आत्या खानझादा आणि बहीण गुलबदन, शिवाय केवळ नशिबानेच बरोबर असलेले बैराम खानासारखे अतिशय विश्वासू सहकारी यांच्यामुळेच त्याच्यातल्या धैर्यानं आणि आशेनं तग धरला. पण तरीही कामरान, हिंदाल आणि अस्करी या सावत्र भावांच्या अमानुष वर्तणुकीनं त्याचं सतत खच्चीकरण झालं. यादवी, व्यसनं आणि दुर्दैव यांनी त्याची कारकीर्द झाकोळून टाकली. हुमायूनच्या काळाचं हे वैशिष्टय़ कलात्मकतेनं ही कादंबरी समोर आणते. ‘ब्रदर्स अ‍ॅट वॉर’ची भाषा इतर कादंबऱ्यांइतकी वैभवशाली, प्रवाही नाही, ती कदाचित यामुळेच. आपलं गमावलेलं साम्राज्य पुन्हा काबीज करायला हुमायूनला बरीच र्वष जावी लागली आणि ते प्राप्त केल्यानंतर केवळ सहा महिन्यांतच साध्या अपघातानं त्याचं निधन झालं. हा मूळ गाभा केंद्रीभूत ठेवून हुमायूनची आणि पर्यायानं त्याच्या काळाची जी गुणवैशिष्टय़ं कादंबरीत ज्या प्रखरतेनं आणि कौशल्यानं आपल्यासमोर येतात ते निश्चितच वाखाणण्यासारखं असं आहे. कितीही अस्वस्थ आणि असहाय असला तरी माणसाच्या आतला सत्तेचा मोह, अहंभाव, अमानुष क्रौर्य, वासना, छद्मीपण नाहीसं होऊ शकत नाही, असंच ही कादंबरी विधान करते.
‘ब्रदर्स अ‍ॅट वॉर’मधल्या दुर्दैवी मध्यांतराच्या अनुभवानंतर ‘कलर ऑफ द वर्ल्ड’ ही अकबराच्या साम्राज्याची आणि जहाँगीरच्या सत्तेवर येण्यापर्यंतची कादंबरी आहे. या कादंबरीतली भाषा पुन्हा अत्यंत गतिमान आणि सतत उत्कंठा वाढविणारी आहे. या मालिकेतल्या सगळ्याच कादंबऱ्यांमध्ये तैमूरलंगाची ‘आलमगीर’ ही तलवार आणि व्याघ्रमुखी अंगठी यांचा सत्ता, पराक्रम आणि निष्ठेचं प्रतीक म्हणून वापर केलेला दिसतो. ही दोन्ही प्रतीकं ‘कलर ऑफ द वर्ल्ड’मध्ये अधिक ठळकपणे येतात. या कादंबरीतलं अवघं वातावरणच प्रचंड आत्मविश्वासानं भारलेलं असल्याचं दिसतं. आपल्या पूर्वजांच्या नि स्वत:च्या चुकांमधून अकबर वेगानं शिकत जाऊन सत्ता बळकावण्यापेक्षाही ती वाढवणं आणि टिकवून ठेवणं जास्त अवघड असल्याचा धडा आपल्या पुढच्या पिढीसमोर ठेवतो. अकबराच्या व्यक्तिमत्त्वातला बहुश्रुतपणा या लेखकांनी विशेष आस्थेनं चित्रित केलेला आहे. अगदी लहान वयात सत्तेवर आल्यापासून शेवटपर्यंत अकबर प्रत्येक युद्धात विजयी झाला. या महत्त्वाच्या लढायांची वर्णनं, त्यामागची ध्येयधोरणं, अकबराचं अत्यंत कुशल, काटेकोर प्रशासन, आपल्या समकालीन राजपूत राजांबरोबर त्यानं वृद्धिंगत केलेली नाती यांचा आलेख तर अतिशय प्रवाही भाषेत रेखीवपणे उभा राहतोच, शिवाय अकबराचा धर्मविषयक दृष्टिकोनही अत्यंत संवेदनशीलतेनं आणि अभ्यासपूर्ण संतुलनानं चित्रित होतो. अकबराच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वानं जहाँगीर लहानपणापासून स्वाभाविकपणेच दडपून गेलेला होता. पित्याविषयी प्रचंड आदर, धाक, दडपण, प्रसंगी राग, द्वेष अशी विचित्र अनिश्चित मानसिकता जहाँगीराची होती. आपल्या मरणाच्या वेळी मात्र अकबरानं आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केल्यानंतरच जहाँगीराला त्याच्या आत्मविश्वासाची जाणीव झाली आणि त्याला सतत बोचणारी अस्वस्थता संपली. जहाँगीराची ही मानसिकता अत्यंत सामंजस्यानं या कादंबरीत आली आहे.
यानंतरचे दोन खंड- ‘द टेंटेड थ्रोन’ आणि ‘द र्सपट्स टूथ’ हे अनुक्रमे जहाँगीर आणि शहाजहान यांचा काळ चित्रित करणारे आहेत. जहाँगीरानं स्वत: लिहिलेलं ‘तुझुक-ए-जहाँगिरी’, त्याच्या दरबारातल्या इतिहासकारानं- मुतमिद खान- लिहिलेलं ‘इकबाल-नामा’, फरिश्ताचं ‘गुलशन-ए-इब्राहिमी’ ही पुस्तकं, तसंच त्यांच्या काळात भारतात आलेले सर टॉमस रो, विल्यम हॉकिन्स, विल्यम फिंच, एडवर्ड टेरी, टॉमस कॉर्यट अशी परदेशी वेळोवेळी तत्परतेनं लिहिलेली बोलकी इतिवृत्तं ही या दोन्ही कादंबऱ्यांचे स्रोत आहेत. जवळजवळ सगळ्याच परदेशी वृत्तांतांमध्ये मोगल दरबाराचं ऐश्वर्य, वैभव, संपन्नता ठळकपणे आलेली असली, तरी या कादंबऱ्यांमध्ये मात्र ‘आपल्या सर्वनाशाची, ऱ्हासाची बीजं आपल्या आतच असतात’ हे तत्त्वच केंद्रीभूत आहे. पित्याविरुद्ध, भावंडांविरुद्ध बंड करून शक्य त्या मार्गानं सत्ता हस्तगत करण्याची परंपरा मोगल राज्यकर्त्यांमध्ये दिसतेच. ही परंपरा अत्यंत नाटय़मयतेनं या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये येते. विशेषत: ‘द र्सपट्स टूथ’ ही कादंबरी तर सत्य पण अविश्वसनीय घटनांची मालिकाच आहे. दारा शुकोहचा करुण अंत, औरंगजेब आणि रोशनआरा यांची कुटिल कारस्थानं, जहाँआराची धीरोदात्त, संयत, समंजस वृत्ती या कादंबरीत अप्रतिम भाषाशैलीत व्यक्त केली आहे. शाहजहानचा कालखंड हा सुखसंपन्नतेचा, कलेच्या- विशेषत: स्थापत्यकलेच्या उत्कर्षांचा होता. ताजमहालच्या उभारणीसंबंधी लिहिताना या लेखकांनी आपलं कौशल्यच पणाला लावल्याचं दिसतं. काव्यात्म भाषेत, शक्य ते सगळेच बारकावे विचारात घेत शहाजहानच्या मनातली ताजमहालची नेमकी संकल्पनाच आपल्याला दृगोच्चर होते. ‘कलर ऑफ द वर्ल्ड’ या कादंबरीतही फतेहपूर सिक्री हे शहर वसवतानाची अकबराची मानसिकताही अशीच ठळकपणे आपल्याला दिसते. यावरून डायना आणि मायकल प्रेस्टन यांचा इतिहासातल्या पात्रांची मानसिकता हेरण्यासंबंधीचा एक नवाच दृष्टिकोन आपल्याला जाणवतो.
ही   कादंबरी-मालिका एका प्रदीर्घ चित्रपटासारखाच केवळ अनुभव देत नाही, तर प्रत्येक वाचकाला आपल्या मनात आपला स्वतंत्र ऐतिहासिक चित्रपट उभा करण्याची दृष्टीच बहाल करते. ऐतिहासिक दस्तऐवजाचं, इतिहासाच्या अभ्यासाचं, व्यासंगाचं भाषाशैली आणि कल्पनाशक्तीच्या साहाय्यानं नेमकं काय करावं याचं उत्कृष्ट उदाहरण या मालिकेतल्या पाच कादंबऱ्या वाचकांसमोर ठेवतात. मोगल राज्यकर्त्यांच्या आयुष्यातल्या नाटय़ाचा, जवळजवळ दोनशे वर्षांच्या  भीषण सांस्कृतिक चढ-उताराचा प्रेस्टन जोडप्यानं रेखलेला हा अप्रतिम आलेख आहे.
‘एम्पाअर ऑफ द मोगल’ मालिका : रायडर्स फ्रॉम द नॉर्थ २००९;
 ब्रदर्स अ‍ॅट वॉर २०१०;  कलर ऑफ द वर्ल्ड २०११;
 द टेंटेड थ्रोन २०१२; द र्सपट्स टूथ २०१३
लेखक : अ‍ॅलेक्स रुदरफोर्ड;  हेडलाइन रिव्ह्य़ू प्रकाशन, लंडन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 3:50 am

Web Title: novel recites mughal dynasties
Next Stories
1 वेदनेचं गाणं
2 सुरक्षाविषयक त्रुटींवर बोट
3 बुकबातमी : भारत नावाचं डम्पिंग ग्राउंड
Just Now!
X