२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन..
त्या निमित्तानं हे दोन लेख. एक अगदी नव्या आणि ‘संगणकयुगातल्या’ पुस्तकप्रेमाचा जागतिक धांडोळा घेणाऱ्या पुस्तकाबद्दल; तर दुसरा अगदी ओळखीच्या- जुनी पुस्तकं विकणाऱ्या दुकानाशीही जडलेल्या नात्याबद्दलचा..
 
एखाद्या कंटाळवाण्या दुपारी मी घराजवळच्या जुन्या पुस्तकांच्या दुकानात काही पुस्तक मिळेल या आशेने जातो. गेल्या अनेक महिन्यांत त्याच्याकडे नवीन असे जुने काहीच आलेले नाही हे सहज जाता-येता पाहिले तरी लक्षात येते. त्याने लावलेल्या पुस्तकांच्या ढिगाऱ्याचा आकारदेखील बदललेला नसतो. बरेच दिवस काहीच मिळालेले नसते म्हणून काही तरी मिळेल असे वाटते. या दुकानाचा दुकानदार कमी वेळा बाहेर असा दिसतो. गाइडे आणि पाठय़पुस्तकांच्या ढिगाऱ्यामागे जाऊन तो स्वत:देखील एक पुस्तक होऊन निवांत पडून राहत असावा.
मी पुस्तकांच्या चळती नजरेनेच चाळू लागतो. नजर अनेक वर्षे हा उद्योग करीत असल्याने सरावलेली असते. काळ्या कव्हराचे शिव खेराचे रंगीत चित्र असलेले ‘यू कॅन विन’ या पुस्तकाच्या कण्यावर फक्त निळ्या रेषा दिसताहेत ते आर्थर हॅलेचे व्हील्स आहे. ‘हाउ टू विन फ्रेंड्स’ या पुस्तकाच्या कण्यावरचे अख्खे नाव वाचता येते, पण ही कॉपी पायरटेड आहे हे बायंडिंगवरून सहज लक्षात येते. ‘हाऊ टू बिकम रिच’ हे पुस्तकही आसपास कोठे तरी असावे. पुस्तक लिहून श्रीमंत झालेली माणसे मला माहीत आहेत.. पण वाचून श्रीमंत झालेला आजपर्यंत तरी पाहण्यात/ वाचण्यातही नाही. रीडर्स डायजेस्टच्या जुन्या अंकांचा एके काळी मोह असे. ते रद्दीच्या दुकानातून दिसेनासे होऊन तर अनेक वर्षे झाली, पण त्याचे आता काही वाटत नाही. खुशवंत सिंगांचे विनोदांचे पुस्तक सगळ्या रद्दीच्या दुकानात असतेच, तसे ते येथेही आहे. पावलो कोएलो हे एक नाव सध्या सगळीकडे दिसते. मी ते वाचलेले नाही म्हटल्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
 ‘मेड इन जपान’ व ली आयोकाकाचे आत्मचरित्र मधूनमधून येथे मुक्कामाला येतात व आपल्या वाटेने निघून जातात. काही दिवसांपूर्वी माधुरी पुरंदऱ्यांचे ‘व्हॉन गॉग’ येथे पाहिले होते. माझ्या घरी ते अनेक वर्षे आहे. तरी परत या दुकानातली प्रत घ्यायचा मोह झाला होता. हे असे नेहमी होते. कोणी तरी कुणाला तरी भेट दिलेले ‘.. काव्‍‌र्हर’ मध्ये येथे दिसायचे, आता दिसत नाही. आज-काल ते कोणी वाचते की नाही? स्थानिक कवीचे कवितासंग्रह, निरनिराळ्या आकारांचे शब्दकोश, आर्य चाणक्याचे भयाण चित्र असलेले हिंदीतले त्याचे चरित्र, आपल्या मजकुराशी संबंध नसलेले उत्तान मुखपृष्ठ छापलेले रजनीशांचे पुस्तक, मुलांचे ज्ञानकोश हे सगळे कोठे छापले जाते व कोण वाचते, असे प्रश्न मला पडू लागले, की तेथून निघायची वेळ झाली हे माझ्या लक्षात येते. पण तोवर आतल्या दुकानदाराला माझी चाहूल लागते. तो बाहेर येतो. ‘मुझे लगा ही आप रहेंगे’ असे म्हणतो. त्याला प्रतिसाद म्हणून मी हसतो. थोडा वेळ थांबून तो म्हणतो, ‘आप तो कुछ खरीदते नहीं. सिर्फ देखने आते हो’ अशी सौम्य तक्रार करतो.
 त्याचे म्हणणे खरे आहे. गेल्या काही वर्षांत त्याच्याकडून फार तर दोन-चार पुस्तके घेतली असतील. तो पुढे विचारतो, ‘आपकी वाइफ तो कहती है आपके पास बहुत किताबे है, कहाँ से लेते हो?’ माझ्या पत्नीची आणि त्याची ओळख आहे. मुलीची पाठय़पुस्तके, गाइडे ती त्याच्याकडून आणते. माझ्याकडे कोणती पुस्तके आहेत यापेक्षा मी ती कोठून आणतो या प्रश्नाच्या उत्तरात त्याला रस आहे. पुस्तके विकणे हा त्याचा धंदा आहे. मी त्याच्या प्रश्नाला काही तरी वेळ मारून नेणारे उत्तर देतो.
दुकानदार माणूस आहे. त्याला कुतूहलही आहे. ‘क्या पढते हो आप?’ या वेळेला मी त्याला ‘वॉर’ असे म्हणतो. ‘वो तो मैं लास्ट टाइम लेके आया था, पर आपने लिया नहीं.’ मागच्या वेळेला त्याने युद्धाबद्दल काही पुस्तके आणलेली होती हे माझ्याही स्मरणात असते, पण ती रॉबर्ट लुडलम वगैरे लेखकांची होती. पॉप्युलर फिक्शन्स मी फार क्वचित वाचतो हे त्याला कसे सांगावे मला कळत नाही.
 पुस्तकाच्या शीर्षकाने आपल्याकडे एखाद्या लहान मुलासारखी झेप घेतली पाहिजे. शीर्षक काही गंभीर, काव्यमय असले पाहिजे असे नाही. एकदा एक पार पिवळी पडलेली पुस्तिका मला त्याच्याकडे मिळाली होती. गुप्तधनाचा शोध कसा घ्यावा हे त्यात लिहिले होते. १९२७ सालात रत्नागिरीच्या कोण्या माणसाने ती लिहिली होती. उलटे पंख असलेल्या घुबडाचे अंडे अमावास्येच्या रात्री काढून त्याचे काजळ पौर्णिमेच्या चांदण्यात बनवून डोळ्यात घालावे. हे काजळ बनवताना लागणाऱ्या दिव्याचे तेल वटवाघळाचे असावे अशी अट होती. हे सगळे फारच आकर्षक होते, अगदी अंटाक्र्टिका खंडाच्या शोधाइतके. या लेखकाला भेटायला मला आवडले असते. गणित आणि भौतिकशास्त्रात विश्वरचनेच्या क्रांतिकारी संकल्पना मांडणाऱ्या आयझ्ॉक न्यूटनचे अध्र्यापेक्षा अधिक आयुष्य असले गूढ प्रयोग करण्यात गेले. मन न्यूटनचे असले तरी मानवी आहे. त्याच्यासारखे आकर्षक काही नाही. चेहरा आणि मनदेखील ‘वाचता’ येते. शेक्सपिअरची लेडी मॅकबेथ आपल्या नवऱ्याला म्हणते, ‘माझ्या परमेश्वरा, तुझा चेहरा म्हणजे एक पुस्तक आहे. ज्या वरच्या अनेक विचित्र गोष्टी माणसांना वाचता येतात.’
रात्री ग्रंथालयात कोणी नसताना ग्रंथ एकमेकांशी बोलतात असे सर्व पुस्तकप्रेमींना वाटते. याही पुढे जाऊन एका ग्रंथप्रेमीने ‘ग्रंथ वितात’ असेही लिहिले. हे सगळे मला आठवते. या दुकानाचे शटर बंद केल्यावर ही असली पुस्तके एकमेकांशी काय बोलत असतील? बंद शटराच्या आड पुस्तकाच्या कव्हरांचे राज्य संपते व आतल्या मजकुराचे राज्य त्या पुस्तकावर सुरू होते. शालेय व्याकरणाच्या पुस्तकाशी कुठलेच पुस्तक बोलत नसावे. शब्दकोशाला अखंड वाक्य बोलता येत नसावे, तर स्थानिक कवीचे पुस्तक बाकीच्या पुस्तकांचे लक्ष नसताना रजनीशांच्या पुस्तकाबरोबर कुजबुजत असावे आणि ‘दासबोधा’ची प्रत सगळ्यांना शहाणपणा शिकवत असेल, तर रंगीत व गुळगुळीत मुखपृष्ठ लाभलेल्या ‘गीता जशी आहे तशी’ या तरण्याबांड पुस्तकाला मजकुराची गंमत कव्हरात नाही  हे या दुकानात स्वत: वर्षभर मुक्काम ठोकणारे जुनाट कापडी बांधणीचे गीतारहस्य सांगत असेल.. पण त्याला स्वत:ला आपले आतले मॅटर तेच ठेवून कव्हर तरी बदलावे वाटले तर ते कोणापुढे बोलत असेल? एखाद्या तरी पुस्तकाने आपला जन्म फुकट गेल्याचे कोणापुढे तरी बोलल्याचे मला ऐकायचे आहे.
‘एक बार आपने बोला था आपको हिस्ट्री बहुत पसंद है.’ दुकानदार मला फँटसी लँडमधून बाहेर आणतो. आता त्याला नीट उत्तर द्यावे लागते. मी म्हणतो, ‘वॉर भी तो हिस्ट्री है.’ त्यालाही ते माहीत नसते असे नाही, पण तो माझ्या मनाचा अंदाज घेत असतो. ‘लेकीन तभी आपने मंदिरों के बारे में कुछ लिया था.’ फारच थोडय़ा वेळा त्याच्याकडून काही विकत घेतल्याने मी काय घेतले होते ते त्याच्या चांगले लक्षात असते. ‘टेम्पल आर्किटेक्चर ऑफ इंडिया’ हे आर्किऑलॉजिकल डिपार्टमेंटने १९४५ साली काढलेले चामडी बांधणीतले ते दोन खंड होते. ते त्याच्याकडे कसे आले याचे मला वाटलेले आश्चर्य त्याला दिसू न देता मी ते घेतले होते. हे दुकान कसेही असले तरी त्याच्याबद्दल मला सहानुभूती आहे. थॉमस फ्रीडमन या पत्रकार लेखकाची ओळख याच दुकानात झाली होती हे मी कसे विसरेन?
असले दुकान म्हणजे आसपासच्या साधारण एक स्क्वेअर किलोमीटर परिसराच्या संस्कृतीचा व जीवनक्रमाचा आरसा असते. जगाच्या पाठीवर सर्व ठिकाणी असेच आहे.
जॉर्ज ऑरवेलचा ‘वर्किंग इन ओल्ड बुक शॉप’ असा एक निबंध आहे. १९३५ व १९३६ ही दोन वर्षे तो लंडनच्या बऱ्यापैकी गजबजलेल्या भागातल्या एका जुन्या पुस्तकाच्या दुकानात अर्धवेळ विक्रेत्याचे काम करे. बुक लव्हर्स कॉर्नर असे त्या दुकानाचे नाव होते. तो लिहितो, वाढदिवसाला भेट देण्याजोगे एखादे पुस्तक द्या. आजारी माणसाला वाचण्यासाठी एखादे पुस्तक आहे का? लाल कव्हराचे मी एक पुस्तक इथे पाहिले होते ते आहे का? असे विचारणारी गिऱ्हाईके तेथे येत.
‘अ‍ॅनिमल फार्म’ हे त्याने लिहिलेल्या पुस्तकाचे शीर्षक त्याला या दुकानात येणारी गिऱ्हाईके पाहून सुचले असावे असे माझे मत आहे. तो म्हणतो, पाच-सहा हजार पुस्तके एकदम व रोज बघून त्याचे पुस्तकांवरचे प्रेम संपुष्टात येऊ लागले तशी त्याने नोकरी सोडली. आज ते दुकान तिथे नाही. त्याऐवजी पिझ्झा शॉप आहे, पण जॉर्ज ऑरवेलचे मोठे म्युरल तेथे लावले आहे.
जुन्या पुस्तकांचे दुकान काढेन असे काही रोमँटिक पुस्तकप्रेमी उच्चरवाने सांगत असतात त्या सर्वानी ऑरवेलच्या अनुभवाने शहाणे व्हावे म्हणून त्याचे म्युरल तेथे मी त्या दुकानात अधेमधे जातो. दुकानदाराबरोबर नेहमीचे संवाद होतात. विसंवादी पुस्तकांच्या ढिगातील काही पुस्तके कारण नसताना चाळतो. ती पुस्तके मानवी जीवनाकडे जसे बघतात तसे मला बघता येत नाही. त्यातल्या अनेक पुस्तकांचे मुखपृष्ठच नव्हे तर लेखकाचे नावदेखील फाटून गेलेले असते. फाटलेल्या पुस्तकांचे काही सुटे झालेले कागद मान फिरवत असणाऱ्या पंख्याच्या वाऱ्याने मध्येच इतस्तत: उडतात. ते स्थिर होतात तेव्हा त्याच्यावरली संदर्भहीन वाक्येदेखील वाचतो. क्वचित कधी कवीचे नाव-गाव काही नसलेले एखादे कडवे मनात थोडा वेळ घर करते. एखादे वाक्य हलकेसे पेटते आणि विझून जाते. ख्रिस्तपूर्व पाचशे वर्षांपूर्वीचा ग्रीक नाटककार सोफोक्लीजचे ‘लव्हज् ऑफ अ‍ॅचलिस’ हे नाटक हरवून गेले आहे, लुप्त झाले आहे. मात्र त्यातले एकच वाक्य सापडले आहे. स्वत:च्या मुलासाठी जुन्या पुस्तकातील मोजकी काही वाक्ये टिपून ठेवणाऱ्या माणसाने ते शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहे. सोफोक्लीजने लिहिले, ‘प्रेम हे लहान मुलाने मुठीत धरलेल्या बर्फाच्या खडय़ासारखे असते.’ कंटाळवाण्या भरदुपारी असे एखादे वाक्य पुरेसे असते.

once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट