रात्रंदिन युद्धाचा प्रसंग झेलून विवेक शाबूत ठेवणाऱ्या तुकोबारायांनी दाखवलेला कठोर आत्मपरीक्षणाचा मार्ग आपल्याला  आठवत कसा नाही? भक्तीचा अतिकठीण मार्ग विवेकाच्या प्रकाशात प्रकाशाने उजळावा, हा संतांचा सल्ला आपण कसा काय विसरलो?
संतांच्या विचारधनाचा वारसा सांगणे आणि तोच संतबोध आचरणात आणणे, या दोन अत्यंत वेगळय़ा बाबी आहेत. संतपरंपरेचा गुणगौरव आपण सततच करत असतो. परंतु, त्याच संतांचे जे विचारधन आहे त्याचे उपयोजन आपल्या रोजच्या जीवनात अभावानेच घडते. या विरोधाभासामागील कारणही सोपे आहे.
पारायण सोपे असते तर आचरण महाकठीण. तुकोबांच्या शब्दांत सांगायचे तर ‘विष खावें ग्रासोग्रासीं’, इतके आचरण अवघड. संतांच्या वचनांची प्रचिती आपण आपल्या अनुभवाच्या सहाणेवर घासून बघण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली तर दोन गोष्टी होतात. एक म्हणजे, संतांच्या शब्दसाहित्याचे यथार्थ आकलन करून घेण्याच्या वाटा त्यामुळे रुंदावतात. दुसरे म्हणजे, ‘संतत्व’ प्राप्त करून घेण्यासाठी त्या सगळय़ाच अचाट कर्तृत्वाच्या व्यक्तिमत्त्वांनी जीवनभर किती उदंड संघर्ष अविरत केला, याची साक्ष आपल्याला नीट पटते. त्या संघर्षांत संतांनी वापरलेल्या साधनांचाही आपल्याला परिचय होतो. संतांच्या वचनांचा अर्थ त्या त्या संतांच्या जीवनचरित्राच्या प्रकाशात समजावून घेण्याचा प्रयत्न केल्याने होणारा सर्वात मोठा लाभ म्हणजे परमार्थ, अध्यात्म, भक्ती, गुरू यांसारख्या संज्ञांचे संतांना अभिप्रेत असलेले अर्थ आपल्याला यथार्थपणे उमगण्यास मदत होते.
आज गरज आहे ती संतांच्या विचारांचे परिशीलन या भूमिकेतून आणि या पद्धतीने होण्याची. भक्ती, परमार्थ यांच्या नावाखाली आपल्या समाजजीवनात जो प्रचंड दंभाचार पदोपदी आपल्या नजरेला पडतो त्याचे निराकरण अन्यथा होणारच नाही. तुकोबांना अभिप्रेत असलेली भक्ती आणि भक्तीच्या ‘लेबल’खाली आपण जे काही सर्व करतो ते, या दोहोंत महदंतर आहे, हे आपण कधीतरी जाणून घेणार की नाही?
गणपती उत्सव, नवरात्र यादरम्यान दणक्यात साजरे होणारे कार्यक्रम, गर्दी गोंगाट, कानठळय़ा बसवणारे लाऊडस्पीकर्स, सहनशक्तीचा अंत पाहणाऱ्या गणेश विसर्जन आणि देवीच्या तोरणांच्या मिरवणुका यांचा आणि ‘शुळावरील पोळी’ अशा शब्दांत तुकोबांनी जिच्या काठिण्याचा महिमा गायलेला आहे ती भक्ती या सगळय़ाचा खरोखरच काही संबंध आहे का? भक्तीची परिणती विवेकामध्ये व्हावी, अशीच तुकोबांची अपेक्षा आहे. विवेकाच्या रोखलेल्या अंकुशाखाली आपला प्रत्येक दिवस जागृतीचा असावा अशी तुकोबांची अपेक्षा आहे. ‘तुका म्हणे मना पाहिजे अंकुश। नित्य नवा दिस जागृतीचा।।’ असे तुकोबा म्हणतात ते याच भूमिकेतून. संतप्रणीत भक्ती ही अशी आहे! एकीकडून तिला नीतिमत्तेचे अस्तर जोडलेले आहे आणि तिची परिणती विवेकामध्ये घडून येणे अपेक्षित आहे. ‘भक्तीचिया पोटी बोध कांकडा ज्योती’, अशा शब्दांत भक्ती आणि विवेक अथवा बोध यांचा सहसंबंध तुकोबांनी मांडून दाखवलेला आहे. भक्तीच्या पोटातून बोधाचा जन्म व्हावा, ही अपेक्षा आहे. त्याच विवेकाच्या प्रकाशात भक्तीचा प्रांत उजळून निघावा, हेच संतांना अभिप्रेत आहे. भक्तीच्या विश्वात ‘गुरू’ या अधिष्ठानाची जरुरी का भासते याचे रहस्य आता सहज उलगडेल. ‘विवेक’ म्हणजेच गुरू!
आमच्या सगळय़ाच संतांनी अपार गुरुमहिमा गायलेला आहे तो याच भूमिकेतून. ‘गुरू’ ही व्यक्ती नाही तर ते अधिष्ठान आहे, हे मर्म ठसवत आमच्या संतांनी गुरुबाजीचा पायाच उखडून टाकला! गंमत म्हणजे त्याच संतांचा नामघोष सतत चालू ठेवत दुसरीकडे समाजातील गुरुबाजीलाही सदोदित खतपाणी घातले जाते. ‘गुरू शोधावा लागत नाही’, अशी जी आपली एक पारंपरिक धारणा आहे तिचे सार हेच. सारासार विचार म्हणजेच विवेक. प्रत्येक माणसाच्या ठिकाणी सारासार विचार करण्याची क्षमता असतेच. त्या विचारशक्तीची डोळसपणे जोपासना करणे म्हणजेच गुरुभक्ती अथवा गुरुसेवा. हा विवेकरूपी गुरू कोठेही बाहेर शोधावा लागत नाही. तो प्रत्येकाच्या अंत:करणात विराजमान असतोच. ‘मज हृदयीं सद्गुरू’ असे ज्ञानदेव जे म्हणतात त्याचा इत्यर्थ हाच. या विवेकरूपी गुरूला अनुसरून जीवनातील वाटचाल केली की सुभग मार्गावरून आपण ढळत नाही, अशा श्रद्धेपायीच ‘अति आदरू विवेकावरी’ अशा भावनेने ज्ञानदेव विवेकासमोर नतमस्तक होतात. या सारासार विवेकाची जोपासना जाणीवपूर्वक करावी लागते. ‘तरी जाणतेन गुरू भाडीजे’, अशा शब्दांत ज्ञानदेव सारासार विचार करण्याच्या संस्कृतीची जोपासना व्यक्तिगत तसेच सार्वजनिक जीवनात जाणीवपूर्वक करण्याचे अगत्य व्यक्त करतात.
परमार्थाच्या प्रांतात साधकाचे पाऊलही गुरूवाचून पुढे पडत नाही, असे म्हटले जाते. मात्र, विवेकाचे अधिष्ठान असणारे गुरुतत्त्व मानवी आकारात एखाद्याला भेटलेच नाही, तर काय करायचे? या प्रश्नाचे उत्तर शोधायचे तर पुन्हा एकवार तुकोबांचे जीवनचरित्र डोळसपणे न्याहाळायला हवे. इ. स. १६२९ ते १६३१ या दोन ते तीन वर्षांदरम्यान दख्खन प्रांतात घडलेल्या भीषण दुष्काळाने इतरांच्याप्रमाणेच तुकोबांच्याही लौकिक संसाराची अपार हानी केली. तुकोबांच्या आयुष्याला निर्णायक वळण मिळाले ते त्या दुष्काळामुळे. ‘विठो तुझें माजे राज्य। नाहीं दुसऱ्याचें काज’।। हा निश्चय त्यांच्या अंत:करणात स्थिर झाला. अनासक्तीने अंत:करण व्यापून गेले. अविनाशी धनाच्या शोधार्थ सिद्ध झालेले तुकोबा मग मानवी गुरूंची वाट पाहात थांबले नाहीत. ‘माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव। आपणचिं देव होय गुरू’।। या त्यांच्याच कथनानुसार विठ्ठलाकडे गुरुपद सोपवून तुकोबांनी आत्मशोधनाला प्रारंभ केला. ही त्यांची सारी वाटचाल एकाकी होती. बाबाजी चैतन्यांची आणि तुकोबांची स्वप्नभेट इ. स. १६४०च्या आसपास झाली असावी, असा काही अभ्यासकांचा कयास आहे. मग, इ. स. १६३० ते १६४० या दरम्यानचा आध्यात्मिक प्रवास तुकोबांनी कोणाच्या आधारे केला असावा?
या रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न विनोबांनी फार मार्मिकपणे केलेला आहे. तुकोबांच्या एकाकी साधनेचा अर्थ विशद करताना विनोबा म्हणतात, ‘‘गुरुभक्तीच्या आधाराची उणीव तुकारामांनी वेगळय़ा रीतीने भरून काढली आहे. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग समजून त्यांनी कठोर आत्मपरीक्षण केले. चित्ताची अक्षरश: चिरफाड केली. त्याचे एकूण एक पापुद्रे सोलून काढले.. तुकारामांची ती रीत साधकांना साधली तर ज्याला त्याला गुरू आपल्याच ठिकाणी उपलब्ध होईल.’’ आता प्रश्न उरतो तो असा की हा गुरू कोणता? या प्रश्नाचे उत्तर विनोबा देतात ते एकनाथांचे नातू महाकवी मुक्तेश्वर यांचा आधार घेऊन. विनोबा लिहितात- ‘‘विवेकासारिखा नाहीं गुरू। चित्तासारखा शिष्य चतुरू।।’’ ही ती रीत आहे. तुकारामांनी ती रीत खूपच चालविली. आपल्या प्रत्येकाच्याच अंत:करणात विराजमान असणाऱ्या विवेकाकडे गुरुपद सोपवायचे आणि आपल्या चित्ताला त्याचे शिष्यत्व पत्करायला लावायचे, अशी ही सोपी हातोटी आहे. तुकोबांनी त्यांच्या जीवनचरित्राद्वारे ती आपल्या पुढय़ात केव्हाच मांडलेली आहे.
मग, गुरूच्या शोधात आपण का भटकतो? गुरुबाजीमधील ढोंग आपल्याला का उमगत नाही?

Jupiter transits in Taurus sign
वृषभ राशीत गुरुचा प्रवेश होताच निर्माण होईल कुबेर योग! ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळेल अमाप पैसा!
trees, Eastern Expressway,
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग, पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!