‘प्रचारसभांत पदांचा उल्लेख टाळा’ हे गार्गी बनहट्टी यांचे पत्र वाचले. ( ७ एप्रिल) ‘मतदारांवर त्याचा प्रभाव पडू शकतो’ हे त्यांचे म्हणणे खरे आहे. परंतु केवळ वृत्तपत्रांनी उल्लेख टाळण्यापेक्षा वस्तुत: राज्य आणि केंद्र शासनातील मंत्री, महामंडळाचे अध्यक्ष जे जे म्हणून खासदारकीच्या निवडणुकीला उभे आहेत त्यांनी आपल्या विद्यमान पदाचा राजीनामा देऊनच निवडणूक लढविली पाहिजे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात केवळ पंतप्रधान काळजीवाहू म्हणून असावेत, तर धोरणविषयक कोणतेही कामकाज होत नसल्याने व लोकसभा विसर्जित असलेले केंद्रीय मंत्री, खासदार म्हणून कोणासही मिरवता येणार नाही. राज्य सरकारातील खासदारकीसाठी उभे असणाऱ्या मंत्र्यांनी किंवा महामंडळाच्या अध्यक्षांनी आपला कार्यभार मुख्यमंत्री किंवा अन्य मंत्र्याकडे सोपवून निवडणूक लढविली पाहिजे. त्यांना शासकीय वाहने, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सवलती नसल्या तरी शासनाशी संबंधित अनेक हितसंबंधी ठेकेदार, लोक, शासकीय बंगले, विश्रामधाम, दूरध्वनी, पोलीस संरक्षण, अन्य कर्मचारीवर्ग यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत मिळत असते. निवडणुकीच्या काळात मंत्री, अध्यक्ष म्हणूनच ते मिरवत असतात आणि त्यांच्या पदाच्या प्रतिष्ठेचा जनमानसावर प्रभाव पडत असतो. प्रसंगी त्यांच्यासमोरील प्रतिस्पर्धी हा अतिशय सामान्य असतो. अशा प्रतिस्पध्र्याला न्याय मिळण्यासाठी त्यांनी खुलेआम निवडणूक लढविली पाहिजे. निकोप लोकशाहीसाठीसुद्धा ही गोष्ट महत्त्वाची आहे.
विद्यमान मंत्री, महामंडळ अध्यक्षांनी पदांचा कार्यभार सोडूनच खुल्या वातावरणात निवडणूक लढविली पाहिजे, परंतु आता निवडणुका अगदीच तोंडावर आल्याने हे शक्य नसले तरी पुढील निवडणुकांच्या वेळी निवडणूक आयोगाने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.
-सुरेश पोतदार, मोठा खांदा, नवीन पनवेल.

सुट्टी-काम या चक्रातच शैक्षणिक परिवर्तन अडकणार का?
‘सुट्टीत मुलांकडून पाच ते अठरा तास अभ्यास करून घ्या’ ही बातमी (लोकसत्ता- १४ एप्रिल) वाचली. शिक्षण विभाग मनाला येईल त्याप्रमाणे फर्मान काढते हे खरे आहे; परंतु हे हे खरे आहे की, शाळा-महाविद्यालयांना, ओघाने शिक्षकांनाही वर्षभरात भरपूर सुट्टय़ांची सवयच जडलेली आहे. अभ्यासातील रूक्षता, साचेबद्धता वर्षभर इतकी दमवते, थकवते, कंटाळा आणते की, मुलांना त्यातून मुक्तता मिळणे गरजेचे आहे, असे मानसशास्त्र सांगते. सुट्टय़ांच्या कालावधीत मुलांना मुक्त मनाने आपले छंद जोपासता येतात, नातेवाईकांना मनमुराद भेटता येतं, भरपूर खेळता येतं; यातून खरंखुरं जीवनशिक्षण त्यांना आपसूक मिळतं. मग प्रश्न असा आहे, की हीच मुक्तता त्यांना शाळा चालू असतानाही का मिळू नये, जेणेकरून मुलांना अभ्यास रूक्ष नाही, तर आनंदाचा वाटेल, जिथे त्यांना स्वत: अभ्यास करून काही तरी नवे शोधून काढण्याची जिज्ञासा जागृत होईल. खरोखर उत्कटतेने जे शिकायचे आहे, ते शिकायला मिळाल्याचा पुरेपूर आनंद मिळाल्याने सुट्टीची आठवणही त्या वेळी नसेल आणि त्याच अध्ययनामध्ये चिंतन, मनन चालू राहून बालसुलभ खेळ खेळण्यास, छंद जोपासण्यास, जिवलगांवर प्रेम करण्यास, निसर्गाशी एकरूप होण्यासही तितकाच वाव मिळेल?
 काम आणि सुट्टीच्या चक्रात अडकल्यामुळे शिकण्याची प्रक्रिया दूर राहते व जीवनाबद्दल कामचोरपणाचा नकारात्मक दृष्टिकोन तयार होताना दिसून येतो; किंबहुना शिकविण्याच्या आनंदापेक्षा अधिक, सुट्टय़ांच्याच हव्यासाने शिक्षकी पेशाकडे वळणारे नवनवे तरुण विद्यार्थी तयार होताना दिसतात. म्हणजे काम करणे हे ध्येय आहे, की सुट्टय़ा मिळविणे?
आपल्या शिक्षण क्षेत्रातील ही पलायनाची मानसिकताच इतर क्षेत्रांतही संक्रमित झालेली दिसून येते आणि हाच देशाच्या विकासातील मोठा अडसर असून तो पूर्णपणे दुर्लक्षित झालेला आहे आणि म्हणूनच त्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. हा अडसर दूर करून शिक्षणाचे मानसिक आरोग्य नव्याने टवटवीत करण्याची आज जरुरी आहे. त्यासाठी आमूलाग्र वेगळा विचार शिक्षणपद्धतीबाबत आणण्याची खरी गरज आहे.
‘एकच ध्यास करू अभ्यास’ अभियानात इयत्तांनुसार अभ्यासाचे नियोजन सुचविलेले आहे. आपल्या एकूणच शिक्षणपद्धतीत ‘इयत्ता’ हाच एक मोठा अडसर आहे असे मला नेहमी वाटते. शिक्षण हे जीवनावश्यक विषयांचे सखोल अध्ययन होण्यासाठी आहे, की इयत्तांवर इयत्ता ओलांडून जाण्यासाठी? इयत्ता पार होतात, परंतु शिक्षण घडत नाही, ही ओरड तर सर्वत्र आहे. विद्यार्थी हे इयत्ता पालथ्या घालण्यासाठी नाही, तर विषयाचे अध्ययन करण्यासाठी शिक्षण घेतात. म्हणून इयत्तांवर वर्ग भरविण्याऐवजी एकेका विषयाला महत्त्व देऊन ‘विषयाचे’ वर्ग भरवावेत. एकाच वयाच्या सर्व विद्यार्थ्यांचे एखाद्या विषयातील आकलन हे अगदी समान असत नाही. यासाठी वयोगट करावेत. आठवडय़ाचे सात वार एकेका विषयाला देता येतील. एका वर्गखोलीत निरनिराळ्या एकाच वयोगटातील विद्यार्थी शिक्षण घेत असतील. मुलांनी आवडीने व आनंदाने शिकणे आणि शिक्षकांनी ही तितक्याच समरसतेने शिकविणे हेच सर्वात महत्त्वाचे. हे परीक्षेसाठी नाही, तर रोजचे प्रयोगशील शिक्षण असेल. प्रश्न हे शिक्षक नाही, तर मुले विचारतील; जे त्यांच्या मनातले असतील. शिक्षकांच्या मदतीने या प्रश्नांची उकल मुलेच करतील. असे काही बदल घडवले गेले, तर ‘एकच ध्यास करू अभ्यास अभियान’ मुद्दाम लादावे लागणार नाही.
मंजूषा जाधव, खार (प.)

असल्या अभ्यास-तासांमागचे गणित काय?
‘सुट्टीत पाच ते १८ तास अभ्यास’ ही बातमी (१४ एप्रिल) आणि त्यावरील अन्वयार्थ (१५ एप्रिल) वाचून बिचाऱ्या मुलांची कीव आली. खेळण्यात वेळ दवडू नका म्हणून मुलांना आधीच आईबाबा दटावीत असतात. कुठल्या इयत्तेतील मुलांनी किती तास अभ्यास करावा, याचं फर्मानच काढलं आहे आणि नेहमीप्रमाणेच ते काम बिचाऱ्या शिक्षकांवर टाकलं आहे.
दहावीच्या मुलांना १८ तास अभ्यास म्हणजे उरलेल्या दिवसांतले केवळ सहा तास. प्रातर्वधिी- स्नान मिळून एक तास, जेवणे-खाणे एक तास (दोन जेवणे, मधल्या वेळचे खाणे), घर-शाळा यांतील अंतरानुसार शाळेत जाणे-येणे याकरिता पंधरा मिनिटांपासून तीन तासांपर्यंत वेळ जाणार. झोपेकरिता किती वेळ राहिला? तेवढा वेळ झोप पुरेल का? आणि अशा अवस्थेत १८ तास अभ्यास कुणी तरी करू शकेल काय? काय गणित करून हे आकडे ठरवले आहेत?
 खेळण्यामुळे वेळ वाया जात नसून उलटपक्षी तो अभ्यासाकरिता उपयोगी ठरतो. बालकांच्या मेंदूच्या विकासाकरिता आणि निरोगी कार्याकरिता तर खेळांचं महत्त्व अनन्य आहे. अमेरिकेतील टफ्ट विद्यापीठाचे प्राध्यापक आणि आता सन्मान्य प्राध्यापक डॉ. डेव्हिड एिल्कड यांचं तसं स्पष्ट मत आहे. तेव्हा असली वेडगळ फर्माने काढण्याऐवजी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काही विधायक सूचना करण्यामुळे मुलांना लाभही होईल आणि अति-वेडगळ पालकांपासून होणारा बालकांचा संभाव्य छळही  टळेल.
 – प्रा. मनोहर राईलकर, बिबवेवाडी, पुणे</strong>