News Flash

संवाद दोन विश्वमानवांचा!

अल्बर्ट आईन्स्टाईन हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ तर रवींद्रनाथ टागोर जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ. त्यामुळे या दोघांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे आणि त्यांनी केलेल्या

शरद देशपांडे

अल्बर्ट आईन्स्टाईन हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ तर रवींद्रनाथ टागोर जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ. त्यामुळे या दोघांच्या भेटीला विशेष  महत्त्व आहे आणि त्यांनी केलेल्या संवादालाही. या दोघांच्या १९३०-१९३१ च्या दरम्यान एकंदर चार टप्प्यांत झालेल्या संवादाला  १४ जुलै २०१४ रोजी चौऱ्याऐंशी वर्षे पूर्ण झाली.
त्यानिमित्ताने हा विशेष लेख
१९३० सालातील जून, जुलै व ऑगस्ट हे महिने टागोर अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. या कालावधीमध्ये जागतिक महत्त्वाच्या तीन व्यक्तिमत्त्वांशी टागोरांचे संवाद घडले. त्यातील पहिला संवाद एच. जी. वेल्स यांच्याशी जूनमध्ये जीनिव्हा येथे, तर दुसरा आईनस्टाईन यांच्याशी जुलैमध्ये झाला. तिसरा संवाद रोमा रोलां यांच्याशी ऑगस्टमध्ये झाला. यापैकी आईनस्टाईन यांच्याशी झालेला संवाद अजूनही चर्चेत आहे. जर्मनीतील पॉटस्डॅमजवळच्या कापूत या गावातील आईनस्टाईन यांच्या घरात या संवादाची सुरुवात १४ जुलै १९३० रोजी झाली. एक महिन्याच्या अंतराने बर्लिन येथील डॉ. मेंडेल या मित्राच्या घरात पुन्हा एकदा या दोघांत संवाद झाला. पहिल्या संवादात विश्वाचे स्वरूप काय व विश्वाचे अस्तित्व मानवी मनावर अवलंबून आहे की नाही या मुख्य मुद्दय़ावर चर्चा झाली. विज्ञान व तत्त्वज्ञान या दोन्हींच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मुद्दा आहे. डॉ. मेंडेल यांच्या घरी झालेल्या संवादात नियत-तत्त्व-वाद (डिटरमिनिझम) व योगायोग (चान्स), जर्मनीतील युवक चळवळ, कुटुंब व्यवस्था, भारतीय व पाश्चात्त्य संगीतातील फरक यावर चर्चा झाली. टागोर हे कवी तर आईनस्टाईन हे वैज्ञानिक. त्यामुळे दोघांचे दृष्टिकोन भिन्न असणार हे उघड होते, पण त्यांच्यात एक समान धागाही होता. तो म्हणजे ते दोघेही अस्सल प्रतिभावंत होते. त्यामुळे या संवादाला एक वेगळेच परिमाण प्राप्त झाले आहे. असे संवाद हे कालातीत असतात. त्यामुळे या संवादाचा ताजेपणा व महत्त्व आजही टिकून आहे.
टागोर-आईनस्टाईन यांच्यातील कापूत येथील संवादाच्या नोट्स तिथे उपस्थित असलेले टागोरांचे स्नेही अमिय चक्रवर्ती आणि आईनस्टाईनचा जावई दिमित्री मारियानॉफ यांनी घेतल्या. यातील दिमित्रीने घेतलेल्या नोट्सवर आधारित वृतान्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये ‘टागोर अँड आईनस्टाईन प्लम्ब द ट्रूथ’ या शीर्षकाने लगेचच म्हणजे १० ऑगस्ट १९३० रोजी प्रसिद्ध झाला. हा आणि एक महिन्याच्या अंतराने डॉ. मेंडेल यांच्या घरी झालेला संवाद ‘आशिया’ आणि ‘अमेरिकन हिब्रू’ या नियतकालिकांसह अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे.
हा संवाद घडला तेव्हा टागोर सत्तर तर आईनस्टाईन बेचाळीस वर्षांचे होते. टागोरांना ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहासाठी १९१३ साली तर आईनस्टाईनना क्वांटम फिजिक्समधील संशोधनाबद्दल १९२२ साली नोबेल मिळाले. आईनस्टाईन यांचा सापेक्षतावादाचा सिद्धांत १९३० सालातही शास्त्रज्ञ मंडळी वैज्ञानिक कसोटय़ांवर पारखून घेत होते, पण विज्ञानात अनुस्यूत असलेल्या तात्त्विक प्रश्नांची उत्तरे शोधणारे आईनस्टाईन यांचे संशोधन चालूच होते. आईनस्टाईनना जरी विज्ञान शाखेतील नोबेल मिळाले असले तरी ते त्यांच्या विज्ञान शाखेतील तात्त्विक संशोधनाबद्दल देण्यात येत आहे असा उल्लेख त्यांना दिलेल्या नोबेल पारितोषिकाच्या मानपत्रात मुद्दाम केला गेला होता. ज्या तात्त्विक प्रश्नांची उत्तरे टागोर त्यांच्या काव्यातून शोधत होते त्याच प्रश्नांची उत्तरे आईनस्टाईन गणित व विज्ञानातून शोधत होते.
टागोरांनी जगभरचा प्रवास केला, तर त्यामानाने आईनस्टाईन हे फारसे बाहेर जात नसत; पण हा संवाद घडण्याआधी टागोर व आईनस्टाईन यांची पत्रव्यवहाराद्वारे मैत्री झाली होती. विचारवंतांच्या आंतरराष्ट्रीय वर्तुळात या दोघांचाही समावेश झाला होता. फ्रेंच साहित्यिक रोमा रोलां व शास्त्रज्ञ वेर्नर हायझेनबर्ग हेही या वर्तुळात होते. या सर्वाचा नियमित पत्रव्यवहार होत असे. दुसरे महायुद्ध होण्याआधी रोमा रोलां यांनी शांततेचे आवाहन करणारे  पत्रक काढले. त्यावर ज्यांनी सह्य़ा करायच्या होत्या त्यात टागोर व आईनस्टाईन यांचा समावेश होता. या सर्वामुळे टागोरांचा जगाकडे पाहण्याचा एक विशाल दृष्टिकोन तयार झाला होता. त्यातूनच त्यांनी संकुचित राष्ट्रवादातून निर्माण होणाऱ्या वैचारिक व भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाऊ  शकणाऱ्या वैश्विक-मनाची (युनिव्हर्सल माइंड)ची कल्पना मांडली.
टागोर-आईनस्टाईन संवाद पौर्वात्य व पाश्चिमात्य दृष्टिकोनातील फरक सांगणारा होता, की तो विज्ञानातील प्रश्नांबद्दल होता, की सत्याचे स्वरूप काय याविषयीची ती एक तात्त्विक चर्चा होती, याबद्दल मतभिन्नता आहे. याचे एक कारण म्हणजे विविध ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या वृतान्तामध्ये टागोरांचे म्हणणे वेगवेगळ्या तऱ्हेने मांडले गेले होते. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृतान्तात टागोरांच्या विचारातील वैज्ञानिक आशयाला गौण स्थान मिळून टागोर म्हणजे भारतातून आलेले एक गूढवादी कवी असे चित्रण केले गेले. याउलट टागोरांच्या ‘द रीलिजन ऑफ मॅन’ या ग्रंथात समाविष्ट केलेल्या या संवादाच्या आवृत्तीमध्ये टागोरांच्या म्हणण्यातील वैज्ञानिक आशयाला उठाव दिला गेला, तर ‘आशिया’ व ‘अमेरिकन हिब्रू’मधील वृत्तान्तामध्ये या संवादाला (टागोर भारतीय असल्यामुळे) पूर्व-पश्चिम वादाचे स्वरूप दिले गेले. प्रत्यक्षात मात्र विज्ञानात नव्याने आलेल्या पुंज (क्वांटम) वादाच्या सिद्धांतामुळे ज्या प्रश्नांची चर्चा शास्त्रज्ञांत होऊ  लागली होती. त्यांची पाश्र्वभूमी टागोर-आईनस्टाईन संवादाला असावी असा तर्क करायला जागा आहे. टागोरांना वैज्ञानिक जगतात होत असलेल्या घडामोडींची माहिती असे. आण्विक आणि उप-आण्विक स्तरावरील ऊर्जा आणि जडद्रव्याच्या वर्तनाचे आणि त्यांच्या स्वरूपाचे स्पष्टीकरण पुंज (क्वांटम) या संकल्पनेद्वारे करता येते असे मॅक्स प्लांक याने सिद्ध केले. कोणत्याही वैज्ञानिक सिद्धांताचा विश्वाच्या संदर्भात अन्वयार्थ कसा लावायचा याबद्दल नेहमीच मतभेद होतात. या न्यायाने पुंजवाद मान्य केल्यास आपल्या विश्वाचे स्वरूप कसे असेल याबद्दलच्या आपल्या प्रस्थापित धारणांवर कोणते परिणाम होतील याबद्दल तत्त्वज्ञ व वैज्ञानिकांत मतभेद निर्माण न होते तरच नवल. टागोर-आईनस्टाईन संवादात या मतभेदातील काही तात्त्विक प्रश्न पुढे आलेले आहेत.
आईनस्टाईनच्या मते विश्वाची सत्यता व त्याचे अस्तित्व मनुष्याच्या जाणिवेवर अवलंबून नसते. ही भूमिका वैज्ञानिक वास्तववादाची (सायंटिफिक रीएलिझम) आहे. या भूमिकेनुसार केवळ निसर्ग-नियमाद्वारेच विश्वाचे नियंत्रण होत असल्याने त्यात योगायोगाला थारा नाही. विश्व हे नियत-तत्त्वरूप (डिटरमिनिस्टिक) आहे. याउलट विश्वाला सापेक्ष व निरपेक्ष बाजू असतात व त्यांच्यातील बुद्धिनिष्ठ संवाद म्हणजे सत्य अशी टागोरांची धारणा होती. मनुष्य हाच विश्वाचा एक घटक असल्यामुळे विश्वाचे अस्तित्व मानव-निरपेक्ष आहे हे खरे आहे, पण या विश्वाचा अर्थ मात्र मानव-सापेक्ष आहे असे टागोरांना म्हणायचे आहे. ही चिद्वादी (आयडियालिस्ट) भूमिका आहे. विश्व हे केवळ मनुष्याच्या जाणिवेवर अवलंबून आहे, अशी ही भूमिका नाही. त्यामुळे ती अधिक गुंतागुंतीची आहे. आपल्या विश्वाचे स्वरूप द्वय़र्थी (डय़ूअल) आहे. ते एकाच वेळी निश्चित आणि संभाव्य, नियमबद्ध आणि आकस्मिक घटनांनी युक्त, जाणीव-सापेक्ष व जाणीव-निरपेक्ष असे आहे. असे म्हणण्यात एक मजेशीर विरोधाभास आहे. ‘‘या विश्वाचे आपल्याला आकलन होते हीच या विश्वाबद्दलची सर्वात अनाकलनीय गोष्ट आहे,’’ असे आईनस्टाईन यांनीच म्हटले आहे. यातील विनोदाचा भाग सोडला तर विश्वाचे हे द्वय़र्थी रूप निश्चितच व्याघाती नाही. टागोर-आईनस्टाईन संवादाच्या दुसऱ्या भागात हा मुद्दा अधिक स्पष्ट झाला आहे. या संवादात टागोरांनी कार्यकारणभाव, विश्वाचे नियत-तत्त्वरूप, मानवी-स्वातंत्र्य व मानवाचा व्यक्ति-विशेष हे मुद्दे भारतीय संगीताच्या संदर्भात मांडले आहेत.
टागोरांच्या एकूण साहित्यात हे विश्व मानवकेंद्रित आहे, (धिस वर्ल्ड इज ए ह्य़ूमन वर्ल्ड) ही भूमिका प्रमुख आहे. वरील सर्व संवादांतही तीच भूमिका अधोरेखित झाली आहे.
रवींद्रनाथ टागोरांनी विश्व-मानवाची कल्पना मांडली आहे. प्रत्यक्षात ते स्वत:च एक विश्व-मानव होते. त्यांच्या मित्रपरिवारात जॉर्ज बर्नार्ड शॉ व आधुनिक विज्ञानकथेचे जनक एच. जी. वेल्स हे इंग्रजीतील प्रसिद्ध साहित्यिक, फ्रेंच तत्त्वज्ञ हेनरी बर्गसॉ, जर्मन कादंबरीकार पॉल थॉमस मान, प्रसिद्ध अमेरिकन कवी रॉबर्ट फ्राउस्ट, जागतिक शांततेचे आग्रही रोमा रोलां व खुद्द आईन्स्टाईन हे होते. यातील एच. जी. वेल्स सोडल्यास इतर सर्वाना नोबेल, तर रॉबर्ट फ्राउस्टना पुलित्झर पारितोषिक मिळाले होते. या सर्वाशी झालेले टागोरांचे संवाद प्रसिद्ध झाले आहेत.

शरद देशपांडे

(लेखक सिमला येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडी या संस्थेत टागोर फेलो आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2014 2:49 am

Web Title: rabindranath tagore in conversation with albert einstein
टॅग : Rabindranath Tagore
Next Stories
1 उत्क्रांतीपासून निर्मितीपर्यंत
2 आहे (पूर्णपणे) खासगी तरीही..
3 सर्वसमावेशक भारतीय जीवनदृष्टी
Just Now!
X