लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे मतदान पार पडल्यानंतर, १६ मे रोजी लागणाऱ्या निकालांचे औत्सुक्य आहेच, परंतु सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक उत्सुकता आहे ती मेधाताई पाटकरांच्या निकालाविषयी. मेधाताईनी आपले सर्व आयुष्य गोरगरीब, वंचित समाजासाठी वेचले आहे. त्यांचे समाजकार्य सर्वश्रुत असले तरी भारतीय निवडणुका हे अजब रसायन आहे. आजवर लोकशाहीचा डंका पिटविला जात असला तरी प्रत्यक्षात लोकशाहीच्या नावाखाली केवळ आणि केवळ घराणेशाही, प्रस्थापित, लादलेल्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करणेच मतदारांच्या हातात होते आणि आहे. दिल्लीतील ‘आप’च्या उदयामुळे वर्तुळाबाहेरील उमेदवार किमान निवडणुका लढविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकले आणि राजकीय शुद्धिकरणाचा विषय ऐरणीवर आला.
मेधाताईंचा वर्तमान निवडणुकीत विजय झाला तर केवळ समाजसेवेच्या ‘भांडवलावर’ निवडणुका जिंकता येतात, हा सकारात्मक संदेश इतर समाजसेवक, शुद्ध चारित्र्याच्या लोकांत जाईल आणि भविष्यात अनेक तत्सम मंडळी राजकारणात प्रत्यक्षात उतरल्यास इतर पक्षावरही दबाब येऊन राजकीय शुद्धिकरणाचा प्रवास अधिक प्रवाही होईल. समृद्ध लोकशाहीसाठी हे अत्यंत गरजेचे आहे. परंतु मेधाताईंना अपयश आले तर मात्र निवडणुका या केवळ आणि केवळ पैसा, साम, दाम, जात-पात, झुंडशाही, दबावतंत्र, प्रसारमाध्यमात जाहिरातींचा महापूर याच्या जोरावर जिंकल्या जातात आणि तुमच्या सामाजिक कामाला निवडणुकांच्या राजकारणात ‘शून्य किंमत’ असते, हा नकारात्मक संदेश जाण्याचा धोका संभवतो. परिणामी, चांगली मंडळी निवडणुकांच्या ‘वाटेवरून’ दूर जाऊन वर्तमान गेंडय़ाच्या कातडीच्या असंवेदनशील  पक्षीय राजकारणाला अधिक वाट सुकर होऊन आणि पर्यायाने लोकशाहीची आणखीच अधिक वाट लागत जाऊन आपल्या लोकशाहीला अधिकाधिक ‘लूटशाही’चे आलेले स्वरूप अधिक गडद होईल. म्हणूनच मेधा पाटकरांचा निकाल भविष्यातील राजकारणाला दिशादर्शक ठरेल असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरत नाही.

धर्माधिष्ठित पक्षाचे प्रातिनिधिक समर्थक
‘बहुसंख्यांची सहमती’ हे अवधूत परळकर लिखित पत्र वाचले. (लोकमानस, २३ एप्रिल). त्यातील विचारांशी सहमत आहे. प्रवीण तोगडिया, गिरिराज सिंह, रामदास कदम अशांची वक्तव्ये ही धर्माधिष्ठित पक्षाच्या प्रातिनिधिक समर्थकांची वक्तव्ये आहेत. त्यांना अटक करून आणि खटले भरून काय साध्य होणार? देशातील अनेकजण अशा वक्तव्यांनी सुखावतात हे वास्तव आहे.
सध्या समाजातील बहुसंख्यांची विचारसरणी अशीच बनलेली दिसते. किंबहुना सततच्या प्रचारमाऱ्यामुळे अनेकांच्या बुद्धीची विचारशक्ती ठप्प झालेली दिसते. सोमनाथ भारती यांना झालेल्या मारहाणीची दृश्ये टीव्हीवर (२३ एप्रिल) पाहिली.  त्यावरून या पक्षाच्या प्रातिनिधिक कार्यकर्त्यांची आचारसरणी स्पष्ट झाली. विरोधाचा प्रतिवाद करण्याची ही धार्मिक पद्धत आहे.
विवेकी सामान्यजनांसाठी काळ  तर मोठा कठीण आहे.
-य.ना.वालावलकर.

नावे नसल्याने मतदान तर बुडाले, पुढे ‘मतदारां’नी काय करायचे?
यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार याद्यांचा घोळ फार मोठय़ा प्रमाणात झाला. तसा तो याधीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा होतच होता. यंदा प्रसार माध्यमांनी त्यास विशेष प्रसिद्धी दिल्याने तो ठळकपणे जनतेसमोर आला तेवढाच काय तो फरक. जी सरकारी यंत्रणा या कामासाठी नेमलेली आहे ती या घोळाबाबत कोणतीही जबाबदारी आपणहून स्वीकारणार नाही व तशी त्यांच्याकडून अपेक्षा करणेसुद्धा व्यर्थ आहे. आज जे कायदे अस्तित्त्वात आहेत त्याचा वापर करून ज्यांची नावे ‘नमुना क्रमांक सहा’ मध्ये अर्ज करूनसुद्धा मतदार यादीत समाविष्ट झाली नाहीत अशांना दाद मात्र मागता येईल व ज्या कर्मचार्यानी कामात कुचराई केली त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी करता येईल.
असे करण्यापूर्वी सर्वप्रथम ज्या निवडणूक कार्यालयाकडे नमुना क्रमांक ६ मधील अर्ज सादर केला आहे त्यांच्याकडे माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम ६ अन्वये माहिती अर्ज सादर करून सादर केलेल्या  नमुना क्रमांक ६ च्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्यावी. माहिती अर्जासोबत निवडणूक कार्यालयाने दिलेल्या अर्जाच्या पावतीची छायाप्रत जोडण्यास विसरू नये. याचबरोबर अर्जाची नोंद आवक नोंदवहीमध्ये ज्या पृष्ठावर आहे त्याची छायाप्रत व तो ज्या कर्मचाऱ्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सोपविण्यात आला त्याचे नाव हा तपशील हवा असल्याचे माहिती अर्जात नमूद करावे.
माहिती प्राप्त झाल्यावर प्राप्त माहितीचा आधार घेऊन ज्या निवडणूक कर्मचाऱ्याने शासकीय कर्तव्य दक्षतेने पार पाडले नाही त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशी मागणी करणारा अर्ज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे द्यावा.
वर मी जो मार्ग सुचवला आहे तो अनुसरण्यासाठी धीर हवा. चिकाटीने प्रकरण धसास लावल्यास त्याचा निकाल निश्चितपणे लागेल व भविष्यात सरकारी कामात कुचराई करणाऱ्यांवर थोडाबहुत का होईना वचक बसेल हे नक्की.
रवींद्र भागवत

आताच गुडघे का टेकले?
‘गर्व से कहो’ची इंग्रजावृती हा अग्रलेख (२४ एप्रिल) एकूणच जगभरच्या राजकारण्यांवर व त्यांच्या धार्मिक श्रद्धेवर प्रकाश टाकणारा आहे. लोकशाही देशाचा पंतप्रधान जेव्हा धार्मिक विचार उघडपणे मांडतो, ही बाब गंभीर ठरते. २००९ साली एका प्रश्नाच्या उत्तरात कामेरून म्हणाले होते, ‘जेव्हा जेव्हा माझ्यापुढे प्रश्न उभा राहील त्या त्या वेळी मी गुडघे टेकून मार्गदर्शनासाठी प्रार्थना करू का? नाही, मी तसे करणार नाही’- तेच कामेरून ख्रिस्तींच्या पवित्र गुरुवारी म्हणजे दिनांक १७ एप्रिल रोजी संत मेरी चर्चमध्ये गुडघे टेकून प्रार्थना करताना अनेकांना दिसले. हा खटाटोप मते टिकविण्यासाठी नाही ना, अशी शंका ब्रिटनमधील विचारवंतांनी बोलून दाखविली आहे. शुभवर्तनवादी पंथाने (इव्हँजेलिस्ट) सध्या जगात धुमाकूळ घातला आहे. कट्टर धार्मिक विचार पसरविण्यात ते आघाडीवर आहेत. याच विचारांच्या जॉर्ज डब्ल्यु. बुश यांनी कडवा मुसलमान नसलेल्या इराकच्या सद्दाम हुसेन याना संपविले. ब्रिटनमध्ये तरुण वर्ग अशा कट्टरवाद्यांना वेसण घालताना दिसतो. तसे पाहता भारतात धार्मिकदृष्टय़ा कडवे असलेल्या िहदूंची संख्या अगदी किरकोळ आहे. मुंबई येथे परवा पार पडलेल्या मोदी यांच्या सभेत मुसलमान समाजाविरुद्ध भडकाऊ भाषण केल्याबद्दल रामदास कदम यांना उद्धव ठाकरे यांनी समज द्यावी लागलीच ना? प्रजासत्ताक भारतात धर्माध फार काय करतील असे वाटत नाही. आता प्रवीण तोगडिया आदींना अस्तित्व दाखविण्यासाठी अधूनमधून तमाशा करावा लागेल ती गोष्ट निराळी.     
-मार्कुस डाबरे, पापडी, वसई

चौथे नव्हे, सहावे शतक
‘गर्व से कहो’ची इंग्रजावृत्ती’ या अग्रलेखात म्हटले आहे की इसवी चौथ्या शतकात अँग्लिकन चर्च अस्तित्वात आले. वास्तविक ब्रिटनमध्ये संत अगुस्तीने ह्यांनी इसवी सन ५९७ मध्ये ख्रिस्ती धर्माचे रोपटे लावले ( त्या आधी येशूचा प्रेषित संत थोमस ह्याने दक्षिण भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार केला होता!). इ. स. ५३४ मध्ये आठवा हेन्री या राजाला दुसरे लग्न करायचे होते .त्याला रोमच्या धर्मपीठाने परवानगी नाकारली .तेव्हा राजाने रोमची धर्मसत्ता झुगारली व नवीन चर्चची म्हणजे अँग्लिकन  चर्चची स्थापना केली
इसवी सन १५५५ मध्ये राणी पहिली मेरी व राजा फिलिप यांनी पुन्हा कॅथोलिक चर्चबरोबर जुळवून घेतले मात्र १५५८ मध्ये राणी एलिझाबेथ यांनी रोमच्या धर्मपीठाशी कायमची फारकत घेतली. अलीकडच्या (२०११) जनगननेनुसार ब्रिटनमध्ये ५९ टक्के लोकांनी आपण ख्रिस्ती आहोत असे नमूद केले आहे.
धर्मसत्ता आणि राजसत्ता यात फारकत असली पाहिजे हे अग्रलेखातील मत अर्थातच योग्य आहे
फादर दिब्रिटो,वसई