साप, सुसरी या वन्यजीवांच्या संवर्धनासाठी चेन्नईचे नाव प्राधान्याने घेतले जाते. भारतातील पहिले सर्पोद्यान तिथे झाले, तिथेच देशातील पहिले ‘क्रोकोडाइल पार्क’ही उभे राहिले. परंपरेने पिढय़ान्पिढय़ा साप पकडणाऱ्या इरुला जातीच्या आदिवासींची पहिली सहकारी सोसायटी उभी राहिली तीसुद्धा चेन्नईतच! हे लोक आता अधिकृतरीत्या सापाचे विष काढतात आणि ते पावडरच्या स्वरूपात देशभर पुरवतात. हे सारे चेन्नईतच घडण्यास एक व्यक्ती कारणीभूत ठरली आहे. ती म्हणजे, ज्येष्ठ सर्पअभ्यासक आणि वन्यजीव कार्यकर्ते रोम्युलस व्हिटेकर. आज ७१ वर्षांचे असलेले व्हिटेकर गेले किमान अर्धशतकभर या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना पुरस्कार अनेक मिळाले असले तरी पुण्यातील भारतीय सर्पविज्ञान संस्थेतर्फे १ ऑगस्ट रोजी दिला जाणारा डॉ. बी. व्ही. राव पुरस्कार हा समविचारींकडून होणारा कार्यगौरव आहे.  
रोम्युलस यांची आई भारतीय, वडील अमेरिकी. त्यामुळे यांचे बालपण अमेरिकेत गेले. तिथे मायामी शहरातील सर्पोद्यानात ते स्वयंसेवक म्हणून काम करीत. ते तारुण्याच्या उंबरठय़ावर असताना भारतात आले. त्यांनी येथेच कारकीर्द करण्याचे ठरविले. त्या काळी म्हणजे पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी साप या प्राण्याबद्दल आस्था नव्हती, उलट भीती आणि घृणा होती. सापांसाठी काम करणाऱ्या माणसाला स्वीकारण्यास समाज तयार नव्हता. असे काम करणाऱ्यास वलय ही तर फारच लांबची गोष्ट! अशा काळात त्यांनी सापांचा अभ्यास व संवर्धनासाठी काम सुरू केले. ते व त्यांच्यासारख्या मूलभूत काम करणाऱ्या सुरुवातीच्या कार्यकर्त्यांमुळेच आता सापांबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. आता या कामाकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागले आहेत. त्यांनी सापाच्या दोन जाती शोधून काढल्या. साप पकडून जगणाऱ्या जमातींचे पुनर्वसन हे त्यांचे मोठे कार्य. तामिळनाडूमधील इरुला समाज साप पकडायचा. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह असे. व्हिटेकर यांनी त्यांची सोसायटी स्थापली. ही सोसायटी अधिकृतरीत्या सापाचे विष संकलन करण्याचे काम करते. त्याची देशभर विक्री होते. त्यामुळे साप बचावले आणि त्यांच्यावर जगणारा समाजसुद्धा! २५-३० वर्षांपूर्वी देशात सुसरी नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या. मात्र व्हिटेकर यांनी त्यात पुढाकार घेतला. सुसरींच्या सुरक्षित प्रजोत्पादनासाठी प्रयत्न झाले. आता सुसरींची संख्या वाढली आहे.
व्हिटेकर यांचे हे काम सामान्य लोकांना फारसे माहीत नाही. ते माहीत असतात ते नॅशनल जिऑग्राफिकसारख्या वाहिनीवर किंग कोब्रा, सुसरी किंवा मगरींवरील उत्कृष्ट फिल्मसाठी. त्या फिल्म तर महत्त्वाच्या आहेतच, पण इतर पायाभूत कार्यामुळेच ते या ग्लॅमपर्यंत पोहोचू शकले.