चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी खिळखिळी होत चालली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत या आघाडीतील किती साथीदार काँग्रेससोबत राहतील याबद्दल शंकाकुशंका सुरू आहेत. अशाच वेळी, केंद्रात आणि महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेचे भागीदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा पुढचा मार्ग मोकळा असल्याचे संपूर्ण संकेत देत काँग्रेसला धक्का दिला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीला शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला ४५ वष्रे पूर्ण झाली. त्यापकी नऊ वष्रे पवार यांनी काँग्रेसबाहेर राहून काँग्रेससोबत केंद्रातील सत्तेत भागीदारी केली. या काळातही, आपण काँग्रेसपासून कायमच सुरक्षित अंतरावर आहोत, हे दाखविण्याची एकही संधी पवार यांनी सोडली नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाची क्षमता खालावत असल्याची स्पष्टोक्ती पवार यांनी ऑक्टोबर २०११ मध्ये लोकसत्ताच्याच आयडिया एक्स्चेंज कार्यक्रमात बोलताना केली होती. तेच मत आजही कायमच आहे, हेही त्यांनी मधल्या काळात वारंवार दाखवून दिले. पवार यांच्या राजकारण शैलीचे वर्णन वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. काहींना ते धूर्त आणि कुटिल राजकारणी वाटतात, तर काहींना त्यांचे राजकारण आजही अनाकलनीय वाटते. पण आता पवार यांच्या राजकारणाचा रोख थेट आणि स्पष्टपणे उघड होऊ लागला आहे. राजकारणात कोणीच कायमचा मित्र असू शकत नाही, ही भूमिका अलीकडे त्यांच्या वक्तव्यांतून आणि राजकीय इशाऱ्यांमधूनही वारंवार स्पष्ट होऊ लागली आहे. भ्रष्टाचार, महागाई आणि कमकुवत नेतृत्व यामुळे खिळखिळ्या झालेल्या काँग्रेसला आगामी निवडणुकीत आधाराची खरी गरज असतानाच, महाराष्ट्रापलीकडे राष्ट्रवादीला आपला मार्ग मोकळा आहे, असे सांगत पवार यांनी काँग्रेसला दणका दिला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जागावाटपाचे सूत्र गेल्या वेळेसारखेच असणार हा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. राज्यातील काँग्रेसजनांकडून या मुद्दय़ावर सुरू असलेली लुडबुड थांबवून दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाला महाराष्ट्राच्या मुद्दय़ावर जेरीस आणण्याचा हा मुत्सद्दी डाव आहे, यात शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात मतविभागणी टाळण्यासाठी काँग्रेससोबत आघाडी करणे अपरिहार्य आहे आणि काँग्रेसचेही हेच दुखणे आहे. मात्र राजकीय पडझडीमुळे दुबळ्या होऊ लागलेल्या काँग्रेसकडे आता राष्ट्रवादीचे नाक दाबण्याची शक्ती उरलेली नाही. हीच संधी साधून काँग्रेसला िखडीत गाठण्याचा आवडता खेळ राष्ट्रवादीने सुरू केला आहे. या खेळाचा शेवट राष्ट्रवादीच्या अपेक्षेप्रमाणेच होणार, हेही जवळपास स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी ही केवळ महाराष्ट्रातील व केंद्रातील सत्तेसाठीची तडजोड आहे, असेच पवार यांच्या काँग्रेसपासून सुरक्षित अंतर राखण्याच्या नीतीमुळे सूचित झाले आहे. आपल्या ४५ वर्षांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत शरद पवार हेच महाराष्ट्राचे थेट किंवा अप्रत्यक्षपणे सत्ताकेंद्र राहिले आहेत आणि देशातील अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्र हेच त्यांच्या राष्ट्रीय सत्ताकारणाचे बलस्थान आहे. आघाडीच्या राजकारणात, बहुमत गाठण्यासाठी जुळवाजुळव करणाऱ्यांच्या पाठीशी उभे करण्यापुरते संख्याबळ गाठीशी असले तरी सत्ताकारण सोपे होते, हे अनेक निवडणुकांनी दाखवून दिले आहे. सध्याच्या राजकीय अस्थिरतेत, देशातील लहानमोठय़ा राजकीय पक्षांनी याच गणिताची आकडेमोड सुरू केलेली असताना, शरद पवार यांच्यासारखा मुरब्बी राजकारणी भविष्यातील सत्ताकारणाचे सारे दोर स्वत:च्या हाताने कापून घेईल, यावर काँग्रेसजनदेखील विश्वास ठेवणार नाहीत.