26 September 2020

News Flash

सिंधुसंस्कृती ते वेद-संस्कृती..

तर्कतीर्थानी जिचे वर्गीकरण ‘वेदपूर्व भारतीयांचा धर्म’ असे केले, ती सिंधु संस्कृती आणि वेदकाळ यांची सांगड कशी घालायची?

| January 26, 2015 12:34 pm

तर्कतीर्थानी जिचे वर्गीकरण ‘वेदपूर्व भारतीयांचा धर्म’ असे केले, ती सिंधु संस्कृती आणि वेदकाळ यांची सांगड कशी घालायची? सिंधु उत्खनानांत आर्याचे अवशेष मिळत नाहीत. आर्य आणि अनार्याचा सम्मीलित समाज या भूमीवर तयार झाला, त्यांपैकी आर्याच्या अनेक श्रद्धा आजही
मानल्या जातात हे मात्र खरे..

इसवी सन १९२०-३०च्या दशकात सिंधु नदीच्या खोऱ्यात म्हणजे हल्लीच्या पाकिस्तानांतील मोहोंजोदरो आणि हरप्पा येथे आणि भारत व पाकिस्तानात इतरत्रही दहा ठिकाणी उत्खनन करून इतिहास संशोधकांनी ज्या ‘सिंधुसंस्कृतीचा’ शोध लावला ती संस्कृती कोणाची व कशी होती ते आपण आता पाहू या. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘हिंदू धर्माची समीक्षा’ या त्यांच्या ग्रंथात ‘वेदपूर्व भारतीयांचा धर्म’ या शीर्षकाखाली दिलेली सिंधुसंस्कृतीची माहिती साधारणपणे खालीलप्रमाणे आहे.
‘वैदिक आर्याच्या पूर्वी हिंदुस्थानात अस्तित्वात असलेल्या सुसंस्कृत समाजांचा हा धर्म होय. या धर्मात व इजिप्त-इराकमधील पुरातन धर्मात तसेच आशिया मायनर व भूमध्य समुद्रीय संस्कृतीमध्ये आणि तेथील मानववंशामध्येसुद्धा फार मोठे साम्य आढळते. त्यांच्यात समुद्रमार्गे दळणवळणही होते. ही आर्यपूर्व संस्कृती होय.. इजिप्त, क्रीट व मेसापोटेमिया येथील संस्कृतीमध्ये शिव, विष्णू, काली या देवता होत्या. (ज्या वैदिक देवतामंडलात नव्हत्या व हिंदू धर्मात त्यांचा फार उशिरा वेदकालानंतर समावेश झालेला आहे.) तसेच त्या संस्कृतीमध्ये नागपूजा, लिंगपूजा, चंद्रपूजा, ग्रहपूजा, पितृपूजा व मातृपूजासुद्धा आहेत, ज्यांचा वेदात मात्र मुळीच उल्लेख नाही. (ऋग्वेदात तर लिंगपूजेचा निषेध आहे.).. नाईल, युफ्रेडिस, तेग्रिस आणि सिंधु नद्यांच्या तीरावर वाढलेल्या या प्राचीन संस्कृतीचा वारसा हिंदू समाजाकडे अजूनही चालू आहे. हीच वेदपूर्व भारतीय संस्कृती होय. त्यातील धर्म आजच्या हिंदू धर्माचा महत्त्वाचा भाग आहे. याच धर्माच्या पायावर, अखिल हिंदूंचा समान धर्म हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेला आहे.’ या सिंधु संस्कृतीचा काळ आजपासून पाच हजार वर्षांच्याही पूर्वीचा असावा. शास्त्रीजींनी इतरत्र असेही म्हटलेले आहे की, ‘आजच्या हिंदू धर्मात आर्य संस्कृतीपेक्षा, आर्येतर किंवा अनार्य संस्कृतीचा सहभाग जास्त आहे.’ तर हे असे आहे.
भारतात आर्याचे आगमन होण्यापूर्वी आणि वर उल्लेखिलेल्या भूमध्य समुद्रीय लोकांचेसुद्धा भारतात स्थिरस्थावर होण्यापूर्वी, नेग्रिटो, प्रोटो, ऑस्ट्रेलाईड, मंगोलाईड, मुंड, मुखमेर वगैरे दुसरे अनेक वंश वेगवेगळ्या वेळी भारतात येऊन वेगवेगळ्या ठिकाणी स्थिरावले होते आणि त्यांच्याही संस्कृतींचे विपुल अंश सध्याच्या हिंदू संस्कृतीत अंतर्भूत आहेत. वर वर्णिलेली सिंधुसंस्कृती केव्हा आणि कशी नष्ट झाली ते समजत नाही.
इ.स.पू. तीन हजार म्हणजे आजपासून सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी केव्हातरी आर्याचे भारत प्रवेशापूर्वीचे वसतिस्थान जे उत्तर ध्रुवाजवळ कुठेतरी किंवा युरोपात स्वीडन हे किंवा मध्यपूर्व आशियात कुठेतरी असू शकेल (ते निश्चित करता येत नाही) तिथून निघून अफगाणिस्तानातून काबूलमार्गे हे आर्य लोक भारतात आले. हे आर्य लोक उंच, गोरे, लांब व सरळ नाकाचे, पशुपालन व्यवसाय करणारे, धाडसी व काहीसे भटक्या वृत्तीचे लोक होते. कदाचित त्यांच्या गुरांना चारा शोधण्यासाठी त्यांना भटकावे लागत असावे. आर्य लोक स्वत:ला ‘देव’ जातीचे म्हणवत असत. ‘इंद्र’ हा देवांचा राजा-पुढारी होता. तो मोठा शूर आणि लढवय्या होता. कित्येक वर्षे किंवा शतके आर्याच्या वेगवेगळ्या टोळ्या भारतात येत राहिल्या. परंतु त्यांच्या शेकडो वर्षे अगोदर भारतात येऊन सिंधु नदीच्या परिसरात ज्या भूमध्य समुद्रीय द्रविड लोकांनी आपली स्थिर संस्कृती निर्माण केली होती, त्यांच्याबरोबर आर्याना शत्रुत्व आणि संघर्ष करावा लागला. हे अनार्य लोक धान्य-वस्त्र उत्पादक आणि चोख व्यापार करणारे लोक होते. त्यांची फक्त घरे आणि रस्तेच नव्हे तर किल्ले आणि कालवेसुद्धा होते. आर्याचे या लोकांशी शत्रुत्व झाल्यावर आर्य त्याना दस्यु, पणी, अनार्य व राक्षस वगैरे त्यांच्याविषयींच्या वैरबुद्धीने म्हणू लागले. आर्य व अनार्याच्या अनेक युद्धांमध्ये आर्य जिंकले आणि अनार्य हरले असे दिसते. आर्यानी अनार्याचे किल्ले व कालवे फोडून टाकले. हे अनेक शतके, अनेक पिढय़ा घडत राहिले. या आर्येतरांचे काही देव, ईश्वर, पूजा-प्रार्थना असूही शकतील. पण सिंधु उत्खननात त्यांचे एकही मंदिर मिळालेले नाही. लिहिण्यासाठी त्यांची लिपीसुद्धा होती. पण त्यांच्या लिपीचा अजून उलगडा झालेला नाही. असो.
आर्याच्या भारतप्रवेशानंतर सुमारे १५०० वर्षे त्यांचा अनार्याबरोबर संघर्ष, लढाया आणि ‘आर्य व अनार्याचा सम्मीलित समाज तयार होण्याची प्रक्रिया’ चालू होती. याच दीर्घ काळात हिंदू धर्मात ज्यांना अपौरुषेय व पूज्य मानले जाते, त्या चार वेदांच्या रचना झाल्या व त्या पाठांतराने टिकविण्यात आल्या. (कारण आर्याजवळ लिहिण्याची लिपी नव्हती.) पुढील ५०० वर्षांत वेदांचेच विस्तार मानले जाणारे ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे हे ग्रंथ रचले गेले. त्यापैकी उपनिषदांना वेदान्त असे म्हटले जाते. हा सर्व सुमारे दोन हजार वर्षांचा काळ इ.स.पू. ३००० पासून इ.स.पू. १००० पर्यंत असावा. यालाच वेदकाळ किंवा ऋग्वेदकाळ असेही म्हणतात. कारण चार वेदांपैकी ऋग्वेद हा प्रमुख, सर्वात मोठा, प्रथम रचना सुरू झालेला व पूर्णत: स्वतंत्र वाङ्मय असलेला आहे.
या काळाच्या सुरुवातीच्या शतकांमध्ये भारतात आर्य लोकांच्या वस्त्या सात नद्या ओलांडून, गंगेच्या खोऱ्यापर्यंत पसरलेल्या होत्या. त्यामुळे विशेषत: उत्तर भारतात त्या काळी काय घडून गेले असावे ते समजण्यासाठी आपल्याला ऋग्वेदाचा आधार उपलब्ध आहे. वेगवेगळ्या पिढय़ांतील सुमारे ४०० ऋषींनी सुमारे १५०० वर्षांत रचलेला हा ऋग्वेद, मानवजातीचा ‘आद्य ग्रंथराज’ ठरतो. पण त्याच्या फार प्राचीन भाषेमुळे तो काहीसा दुबरेधही झालेला आहे. अलीकडेच कालवश झालेले रघुनाथ द. जोशी या मोठय़ा वेदाभ्यासी पंडिताने अत्यंत चिकित्सक बुद्धीने व ऐतिहासिक दृष्टी ठेवून रचलेला ‘अनोखा परिचय ऋग्वेदाचा आणि उपनिषदांचा’ हा ‘टिळक विद्यापीठ पुरस्कारप्राप्त’ ग्रंथ आधारभूत मानून संकलित केलेली काही माहिती मी खाली देत आहे.
१) इ.स.पू.१२००-१३००च्या सुमारास होऊन गेलेल्या व्यास (म्हणजेच वेदव्यास) या वेदवेत्त्याने, त्याच्या काळापर्यंतच्या सुमारे दीड हजार वर्षे पठणात असलेल्या सर्व वेदवाङ्मयाचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद असे चार भाग केले असे मानले जाते. व्यासांनी ज्या ऋचांचा संग्रह ऋग्वेद म्हणून निश्चित केला त्याला ऋग्वेद संहिता असे म्हणतात.
२) ऋग्वेद संहितेतील दहा मंडलांमध्ये, दहा हजारांहून अधिक ऋचा, हजाराहून अधिक (१०२८) सूक्तांमध्ये विभागलेल्या आहेत. त्यापैकी बहुतांश सूक्ते १) इंद्र या प्रमुख देवावर २) अग्निदेवतेवर ३) ‘सोम’ या उत्तेजित करणाऱ्या एका पेयावर आणि ४) सूर्य, मरुत, उषा इत्यादी देवतांवर आहेत. सर्व ऋषींनी मानवी जीवनाशी संबंधित नैसर्गिक घटनांना विविध देवता व त्यांची कृत्ये असे मानून त्यांच्याकडे केलेल्या मागण्या हेच बहुतेक सूक्तांचे विषय आहेत. त्या मागण्या बहुश: संततीसाठी, अन्नासाठी, संरक्षणासाठी व धनासाठी म्हणजे ऐहिक जीवन सुखी होण्यासाठी आहेत. आर्य लोक निसर्गपूजक, सूर्यपूजक व अग्निपूजक होते. शिवाय ते जीवनातील साध्यासुध्या वस्तूंनाही देवत्व देत असत. त्यांची कसलीही मंदिरे नव्हती व त्यांच्या पुढील काळांतील वंशजांप्रमाणे ते मूर्तिपूजकही नव्हते.
३) आर्याच्या आणि नंतर सम्मीलित झालेल्या संमिश्र समाजातही स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान नसावे. त्यांनी स्त्रियांची सामाजिक प्रतिष्ठा शूद्रांसारखी कमी मानलेली होती. त्यांच्या दानवस्तूंमध्येसुद्धा स्त्रिया असत.
४) सर्व देवांच्या मागे एकच सर्वश्रेष्ठ शक्ती किंवा मूलतत्त्व असावे असे काही वेदकर्त्यां ऋषींना तरी वाटत होते. सर्व देवांकडे पोचण्याचा यज्ञ हा त्यांचा जादूसारखा मार्ग होता. यज्ञात अर्पिलेली आहुती, अग्नी त्या त्या देवाकडे पोचवितो असे त्यांना वाटत होते. त्यांच्या वेदऋचांमध्ये मोठे सामथ्र्य असून, वेदमंत्रयुक्त यज्ञ करून पाऊस पडतो. पुत्रकामेष्टी यज्ञ करून निश्चयाने पुत्रप्राप्ती होते, गायत्री मंत्राने सिद्धी प्राप्त होतात, महामृत्युंजय मंत्राने मृत्यूवर विजय मिळतो अशा त्यांच्या अंधश्रद्धा होत्या. तत्कालीन मनुष्यजातीच्या भौतिक शास्त्रविषयक अज्ञानपातळीमुळे वेदमंत्र सामर्थ्यांवरील त्यांचा विश्वास क्षम्य म्हणता येईल.
५) सूर्याभोवती पृथ्वी नव्हे, तर पृथ्वीभोवती सूर्य फिरतो असे तत्कालीन ऋषींना वाटत होते, असे ऋग्वेदांतील काही ऋचांवरून स्पष्ट दिसून येते.
(आणखी माहिती पुढील प्रकरणात)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2015 12:34 pm

Web Title: sindhu culture to vedic culture
Next Stories
1 माणसाने निर्मिले देव, ईश्वर आणि धर्म
2 माणूस आफ्रिकेत उत्क्रांत झाला..
3 पृथ्वीवर माणूस केव्हा आणि कसा आला?
Just Now!
X