शिवसेनेचे संस्थापक कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या हातून ज्या काही ऐतिहासिक घोडचुका घडल्या त्यातील एक म्हणजे राणे यांची पदोन्नती. त्यांना बढती देउन आपण मनगटशाहीचा उघड कैवार घेत आहोत, याचा जराही विचार कै. ठाकरे यांनी केला नाही. त्यांनी केवळ मातोश्रीवर रसद पाठवण्याची क्षमता हाच केवळ निकष लावला आणि राणे यांना मुख्यमंत्री केले. त्याची किंमत सेनेस द्यावी लागली. राणे यांनी पुढे पक्ष सोडला. सेनेसमोर नाक खाजवता येईल याच उद्देशाने राणे यांना काँग्रेसने आपले म्हटले. तसे करून आपण काय विकतचे दुखणे घेत आहोत याची प्रचिती काँग्रेसला लगेच आली. राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विरोधात बंड करून थेट मुख्यमंत्रीपदालाच हात घातला. काँग्रेसमधे शीतपेयदेखील थंडा करके पियो असा नियम असतो. हे राणे यांना अद्यापही उमगलेले नाही. 

राजकारणात इर्षेची भावना हवीच. पण वास्तवाचे भानही हवे. पहिल्या भावनेचा राणेंच्या मनी उदंड वास तर दुसरी औषधालाही नाही. त्यामुळे ते भलत्याच आवेशात या निवडणुकीत उतरले. जोडीला त्यांचे ते दिव्य सुपुत्र. सेनेच्या मुखात जाउन सिंधुदुर्गाच्या घरात जे जमले नाही ते वांद्र्याच्या अंगणात करून दाखवण्याची त्यांची इर्ष्या जागृत झाली. त्यामुळे काँग्रेसमध्येदेखील आपण निवडून आलेले कोणाला नको आहे, हे त्यांना लक्षातही आले नाही. नवनवे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मनातील किंचितशी सहानुभूती वगळता राणे विजयी व्हावेत असे मुंबईचे अध्यक्ष संजय निरूपम वा विधानभेतील काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील वाटत नव्हते. कृपाशंकर यांच्यासारखा बाजारबुणगा सोडला तर राणे यांना कोणाचीही साथ नव्हती. अगदी या मतदारसंघातील कोकणी मतदारांची देखील. त्यामुळे मुस्लीम मतदारांची मते आपल्याला मिळावीत यासाठी एमआयएमशी छुप्या तहासह अनेक खटपटी काँग्रेसने करून पाहिल्या. त्या सर्व पाण्यात गेल्या.

अखेर मतदारांनी राणे यांना दोन्ही हातांनी भरभरून धुळ चारली. राणे यांनी ही निवडणूक विनाकारण प्रतिष्ठेची केली नसती तर हे धुळीचे प्रमाण काही प्रमाणात का होईना कमी झाले असते. परंतु एकदा एखाद्याचा अहं मोठ्या प्रमाणात वाढला की विवेक विस्थापित होतो. या निवडणुकीच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा दिसून आले. एमआयएमचाही फुगा या निकालाने मोठ्या प्रमाणावर फुटला. त्या पक्षाचे राजकारणही विवेकाच्या थडग्यावरच आधारीत होउ लागले आहे. आताच्या निकालाने तो पक्ष देखील जमिनीवर येउ शकेल.