News Flash

संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग

राज्यातील गडकिल्ल्यांची दुर्दशा ‘निसर्गामुळे’ होते आहेच. परंतु पुरातत्त्व खात्याने केलेल्या ‘सुधारणा’ पाहाता, राज्य सरकारने गड राखण्यास असमर्थताच न्यायालयात व्यक्त केली, हे बरे झाले..

| November 23, 2013 12:19 pm

राज्यातील गडकिल्ल्यांची दुर्दशा ‘निसर्गामुळे’ होते आहेच. परंतु  पुरातत्त्व खात्याने केलेल्या ‘सुधारणा’ पाहाता, राज्य सरकारने गड राखण्यास असमर्थताच न्यायालयात व्यक्त केली, हे बरे झाले..
महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि या दोन्हींच्या आश्रयाने नांदलेल्या संस्कृतीचा विचार करायचे झाल्यास सह्य़ाद्री आणि त्याच्या अंगाखांद्यावरील दुर्गाकडे पहिले लक्ष जाते. कधी दोन हजार वर्षांपूर्वी, महाराष्ट्राचा आद्य राजवंश सातवाहनांपासून आपल्याकडे या दुर्गसंस्कृतीचे मूळ रुजले. पुढे ती वेगवेगळ्या राजवटींमध्ये वाढली-विस्तारली. शिवकाळात तर या दुर्गाचे महत्त्व सर्वोच्च स्थानी पोहोचले. सह्य़ाद्रीचा दुर्गम मुलूख आणि त्यावरील या अभेद्य दुर्गाच्या मदतीने छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. पुढे त्यांच्या निधनानंतर या दुर्गाच्या साह्य़ानेच हा महाराष्ट्र औरंगजेबच्या बलाढय़ सेनेविरुद्ध तब्बल २७ वर्षे लढला आणि अभेद्य-अपराजित राहिला. इथल्या माणसांनी या दुर्गामध्ये आणि या दुर्गानी माणसांमध्ये लढाऊ, स्वत्वाची जी बीजे-वृत्ती पेरली त्याआधारेच आजची ‘महाराष्ट्र संस्कृती’ जगली-वाचली!
..हे सर्व ‘दुर्गमाहात्म्य’ आठवण्याचे कारण नुकतीच झालेली एक न्यायालयीन सुनावणी. या न्यायदरबारी सरकारने निसर्गाच्या हल्ल्यापुढे यापुढे गडांचे जतन करण्यास असमर्थतेची कबुली दिली आहे. उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यानेच हतबलता जाहीर केल्यावर रुग्णाच्या नातेवाईकांच्या काळजात जसे धस्स होते तसेच ही ‘सरकारी कबुली’ ऐकल्यावर महाराष्ट्रजनांचे झाले असेल. जगाच्या पाठीवर जिथे-जिथे इतिहासाच्या पाऊलखुणा सापडतात तिथे-तिथे दुर्ग-स्थापत्य आढळते. आपल्याकडे भारतभर किल्ले आढळतात. ज्या दिवशी दूरवरून, अवकाशातून मारा करण्याचे तंत्र मानवास गवसले त्याच वेळी या किल्ल्यांचे लढाऊ महत्त्व संपले. वर्तमान नष्ट होत या किल्ल्यांची ऐतिहासिक स्मारके झाली आणि या स्मारकांचे जतन म्हणजे आपल्या संस्कृतीचेही जतन, हे लोकांना उमगत गेले. अगदी युरोपातील जागोजागीच्या ‘कॅसल्स’पासून ते चीनच्या अवाढव्य भिंतीपर्यंत आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून ते गोव्यातील छोटेखानी आग्वाद-तेरेखोलपर्यंत. इथला दगड ना दगड वाचवायचा, आहे त्या अवस्थेत त्याचे जतन करायचे, त्याभोवतीची इतिहास-संस्कृती विविध माध्यमांतून जिवंत करायची आणि या साऱ्याला व्यावसायिक पर्यटनाची जोड देत परकीय चलनही मिळवायचे. जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासाच्या या चढत्या भाजणीतून या एकेका स्मारकाने कात टाकली किंवा टिकवली आणि जागतिक कीर्ती मिळवली. आमच्या महाराष्ट्राची गाडी मात्र यातील जतनाच्या पहिल्याच स्थानकात गेली साठ वर्षे फसली-अडकली. न्यायालयात सादर झालेल्या या प्रतिज्ञापत्राने हीच शोकांतिका समोर आली आहे.
महाराष्ट्रात आजमितीस पाचशेच्या आसपास किल्ले असावेत, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. (काही दिवसांतच यातील बहुसंख्य केवळ कागदावरच राहतील हा भाग निराळा.) यातील किमान दीड-दोनशे किल्ल्यांना गौरवशाली इतिहास, स्थापत्य आणि पर्यटनमूल्य आहे. यातील बहुतेकांचे पालकत्व केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात आहे. अशा वेळी त्यांनीच हात वर केल्याने या किल्ल्यांचे तट-बुरूज आजच खचू लागल्याचे भासत आहे.
ज्या किल्ल्यांनी महाराष्ट्र घडवला, जागवला आणि जगवला त्यांचे अस्तित्व आज पुरातत्त्व खाते आणि त्यांनी निर्माण केलेल्या ‘निसर्ग वावटळी’वर अवलंबून आहे. मुळात हा विभाग कुठे, कसा, कधी, कुठल्या पद्धतीने, कुणाच्या आदेशाने काम करतो याचे साऱ्यांनाच कुतूहल असते. कुठल्याही ऐतिहासिक स्मारकाची माहिती, त्याचा इतिहास सांगण्यापेक्षा दंडाची ती ‘निळी पाटी’ लावण्यापुरताच हा विभाग आजवर सामान्यांना दिसला आहे. या विभागाकडून या किल्ल्यांसाठी कोटय़वधी रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते. पण महाराष्ट्रातील दुर्गाची आजची अवस्था पाहिली तर जतन, विकासाची ही पावले भिंग लावूनच शोधावी लागतील. शिवाजी महाराजांची भूतपूर्व राजधानी असलेल्या राजगडाचेच उदाहरण यासाठी पुरेसे आहे. भोर संस्थानच्या ताब्यातील हा गड स्वातंत्र्यानंतर सरकारजमा झाला. या वेळी गडावरील सदरेसह अनेक इमारती उभ्या होत्या. पण आज इथे त्यांचे अवशेषही शिल्लक नाहीत. स्वातंत्र्यापूर्वी तीनशे-साडेतीनशे वर्षे उभ्या असलेल्या या वास्तू एकाकी नाहीशा झाल्या. पुरातत्त्व खात्याच्या हवाल्यानुसार बहुधा त्या वादळ, पाऊस किंवा पुराने ‘खाऊन’ टाकल्या! विजयदुर्गचा तट असाच कोसळला, विशाळगडाचा दरवाजा ढासळला, लोहगडाच्या दरवाजाला तडे गेले, परांडा किल्ल्यातील तोफ कापून पळवली. कुठे इमारती कोसळल्या, कुठे तलाव बुजले, कुठे शिल्पं भंगली, अनमोल शिलालेख गायब झाले.. बहुधा हे सारे निसर्गानेच घडवले!
रसाळगडावर या खात्याने केलेले काम सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. इथल्या एका दीपमाळेची दुरुस्ती करताना या विभागाने ती दोन थरांनी कापून टाकली. मराठवाडय़ातील अनेक किल्ल्यांना सिमेंटचे गिलावे लावत त्यांचा ऐतिहासिक चेहराच नष्ट केला. रायगडावरील भर दरबारातील बाजूच्या दोन्ही भिंतींवर सिमेंट-दगडातील नवी भिंत चढवण्याचा पराक्रम घडला. ऐतिहासिक वास्तूंच्या मूळ रचनेत केलेले हे असे बदल कायद्यात बसतात का?
तानाजी मालुसरेंचा सिंहगड आज टपऱ्यांमध्ये हरवला आहे. बाजींच्या पन्हाळ्याचे बाजारू ‘हिल स्टेशन’ झाले आहे. प्रतापगडावर ऐतिहासिक वास्तूंपेक्षा दुकाने आणि उपाहारगृहांची गर्दी आहे, तर मुंबईतील किल्ले झोपडपट्टीत हरवले आहेत. आमचा गौरवशाली इतिहास, वारसा शोधायला जाणाऱ्या पावलांना इथे जागोजागी अतिक्रमणे, कचरा, बजबजपुरीचाच सामना करावा लागतो आहे. या साऱ्या दुर्दशेसही आम्ही निसर्गालाच जबाबदार धरणार का?
या साऱ्या हतबलतेत सरकारची भूमिकाही सावत्र आईची आहे. या पुरातत्त्व विभागाला पुरेसा निधी नाही, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नाही. यातील अनेकांचा पुरातत्त्व शाखेशी दूरान्वयेही संबंध नाही. या साऱ्यांमुळे जतन, विकासाच्या पातळीवर गोंधळ आणि गैरव्यवहार न उडेल तर काय? यांच्या सुरक्षारक्षकांपैकी अनेक जण तर सध्या सुरक्षेपेक्षा जागोजागी ‘कलेक्टर’चेच काम करत आहेत. एकूणच शिवरायांच्या या दुर्गाची चहूबाजूने दुर्दशा सुरू आहे.
ब्रिटिशांनी मराठय़ांचे साम्राज्य ताब्यात घेतल्यावर सर्वप्रथम या किल्ल्यांकडे जाणारे रस्ते तोडले होते. या गडांवर जाऊन पुन्हा ‘शिवाजी’ तयार होऊ नये ही यामागची भीती! आम्हाला आमची खरी स्मारके कळलीच नाहीत का? रायगड, राजगड दिवसामागे ढासळत असताना त्या अरबी समुद्रात आम्ही कुठले ऐश्वर्य मांडायला निघालो आहोत? ..सारेच विषण्ण करणारे आहे.
एकूणच सरकारी चालूपणा, पुरातत्त्व विभागासारख्या व्यवस्थांच्या मर्यादा, जनतेची उदासीनता आणि निरक्षरता, या साऱ्यांमुळेच आमचे दुर्गवैभव दिसामाजी ढासळत आहे. त्यांच्या या ढासळणाऱ्या प्रत्येक चिऱ्याचा ओरखडा इथे येणाऱ्याच्या मनावर उमटतो आहे.
शिवरायांच्या पदरी असलेल्या रामचंद्र अमात्यांनी लिहिलेल्या ‘आज्ञापत्र’ या अद्वितीय ग्रंथात ते म्हणतात, ‘गडकोट हेंच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचें मूळ ..संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’. एकेकाळी स्वराज्याचे आणि आता इतिहासाचे हे ‘सार’च आज अधोगतीला लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2013 12:19 pm

Web Title: state government unable to look after fort in maharashtra
Next Stories
1 अगदीच आम
2 मोदींचे मारक मौन
3 काका का मला वाचवा..
Just Now!
X