सद्गुरूंकडे जाऊनही आपण मनानं जगातच भरकटत असतो. त्यांचा बोध कानांवर पडत असतानाच अंतर्मनातला भौतिकाचा कोलाहल कायम असतो. मग त्यांना खरं पाहावं कसं? हृदयेंद्रच्या मनाला या प्रश्नाचा स्पर्श झाला..
अचलदादा – मग प्रश्न असा की, हे रूप कसं पाहिलं म्हणजे पूर्ण सुख मिळेल? तर हे पाहणं तीन स्तरांवरचं आहे, तीन प्रकारांचं आहे!
कर्मेद्र – तीन स्तर?
माई – यांनीच आधी माणसासारखं धड एका पातळीवर पाहिलंत ना, तरी खूप झालं! बरं का हृदय यांचं लक्षच नसतं कुठे.. कल्याणला आम्ही काणेवाडय़ापाशी राहायचो ना? तिथल्या शेजाऱ्यांचा भाचा प्रदीप अचानक इंदुरास भेटला. रस्त्यात थांबून चांगलं दहा मिनिटं बोलला तो. हेसुद्धा होते बरोबर. आठेक दिवसांनी त्याचा विषय निघाला तर असा कोणी भेटला होता, हेच यांना आठवेना.. तेव्हा आधी एका पातळीवर पाहता येत नाही, तर या तीन पातळ्या काय कामाच्या?
माईंच्या या बोलण्यावर अचलानंद दादा सौम्यसं हसले. हृदयेंद्रला मात्र आश्चर्य वाटलं. पूर्वी दादांसमोर दबून वावरणाऱ्या माई त्याला आठवल्या. दादा म्हणाले..
अचलदादा – अहो या पातळीवर तर सर्वचजण पाहातात. मी ज्या तीन पातळ्या म्हणतोय ना, त्याही आपल्या नित्य अनुभवाच्या आहेत बरं का, तरी त्या लक्षात येत नाहीत..
हृदयेंद्र – दादा कोणत्या आहेत या पातळ्या?
अचलदादा – पहिली पातळी फार सोपी, अनुभवाची आहे. (हातात गोंदवले संस्थानाची ‘चैतन्य स्मरण’ ही स्मरणिका उंचावून घेतात आणि विचारतात) मला सांगा काय दिसतंय तुम्हाला?
योगेंद्र – स्मरणिका!
हृदयेंद्र – त्यावर थोरल्या राममंदिरातील मूर्ती आहेत.. खाली गोलात हनुमंताची मूर्ती आहे..
ज्ञानेंद्र – पाश्र्वभूमीला गुलाबी-काळा रंग आहे..
अचलदादा – झालं पाहून? (सर्वजण होकारार्थी मान हलवतात. दादांनी स्मरणिका हातात धरलीच आहे. ते म्हणतात-) आता बघा हं.. ही स्मरणिका तर तुम्हाला दिसतेच आहे, पण ती धरलेला माझा हातही दिसतो आहे.. माझा पांढरा सदराही दिसतोय.. बाजूच्या खुर्चीवर बसलेल्या माईही दिसत आहेत.. खोलीचा दरवाजा आणि त्या बाजूची खिडकीही दिसत आहे.. सगळं काही दिसत असल्याचं तुम्हाला आता जाणवतंय, पण तुम्ही मात्र पहात होतात स्मरणिका!! तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी ‘दिसत’ असल्या तरी आपण तेच पाहातो जिथं आपल्या लक्ष्याचं केंद्र असतं! त्या अर्थानं आपण सद्गुरूंना पाहतो का हो? आपण तर निव्वळ त्यांच्यावरची आवरणं पाहातो!
हृदयेंद्र – अगदी खरं आहे. ते काळे आहेत की गोरे, उंच आहेत की ठेंगणे, ते प्रेमळ आहेत की कठोर, त्यांचं घर व्यवस्थित आहे की साधंस.. सद्गुरूंपेक्षा याच गोष्टी मी अगदी खोलवर पाहात असतो..
अचलदादा – म्हणजेच सद्गुरूंना पाहातानाही माझं लक्ष्याचं केंद्र वेगळंच असतं. आता पाहण्याची दुसरी पातळी सांगतो. तुम्ही सर्वानी मी सांगताच डोळे मिटायचे आहेत, ते न उघडता मी जो प्रश्न विचारीन त्याचं उत्तर द्यायचं आहे. तर मिटा डोळे.. (सर्वजण डोळे मिटतात. चेहऱ्यावर कौतूहल. दादा म्हणतात-) मी माझ्या उजव्या हातात एक गोष्ट घेतली आहे. डोळे न उघडताच सांगा, ती वस्तू काय आहे? (कोणीच काही बोलत नाही..)
कर्मेद्र – अहो डोळे बंद असताना कसं सांगता येईल?
अचलदादा – ठीक तर, उघडा डोळे. (सर्वजण बघतात) बघा, तीच स्मरणिका माझ्या उजव्या हातात होती.
कर्मेद्र – पण डोळे मिटून कसं सांगता येणार? मिटलेल्या डोळ्यांना काही दिसतं का कधी?
अचलदादा – (हसतात) ठीक तर परत मिटा डोळे (सर्व डोळे मिटतात) आता तुमची सर्वात आवडती व्यक्ती नजरेसमोर आणा.. सांगा कोणी कोणाला पाहिलं.. (कर्मेद्र आणि ज्ञानेंद्रच्या डोळ्यांसमोर पत्नीचा, योगेंद्रसमोर लहानग्या गायत्रीचा तर हृदयेंद्रसमोर आईचा चेहरा तरळला होता) म्हणजे डोळे मिटूनही तुम्ही पाहू शकलात! ते कोणत्या डोळ्यांनी? नाही सांगता येत! तर ही झाली पाहण्याची दुसरी पातळी, आता तिसरी पातळी ऐका.. नव्हे पाहाच!
चैतन्य प्रेम