दरवर्षी ‘येणार.. येणार.. ’ म्हणून गाजणारी काही पुस्तकं असतात. त्यापैकी दोन पुस्तकांच्या कथा मात्र ‘नवलकथा’ म्हणाव्यात अशा आहेत. या दोन कथा म्हणा, बातम्या म्हणा, अशा : ‘हुआंतानामो बे’चे अनुभव..
मोहम्मदू ऊल्ड स्लाही हा निव्वळ मुस्लीम ‘मुजाहिदीन’ दहशतवादी गटांच्या आकर्षणापायी अफगाणिस्तानपर्यंत गेलेला एक तरुण. अर्थात, तो १९९० साली तिथे गेला, तेव्हा हे गट पाश्चात्य देशांसाठी फार महत्त्वाचे नव्हते. अमेरिकेवर ‘९/११’ चा हल्ला होताच स्लाहीसारख्या दहशतवादी-समर्थकांसाठी देशाटन करणे मुष्किल व्हावे, इतपत सापळे अमेरिकेने रचले आणि त्यातूनच स्लाहीची रवानगी ‘हुआंतानामो बे’ भागातील कुख्यात बंदिगृहांत झाली. तेथे स्लाहीने २००२ पासून  लिहिलेल्या रोजनिशीतील पाने, अर्थातच संपादित स्वरूपात आता पुस्तकरूपाने येत आहेत. संपादक आहेत लॅरी सीएम. लॅरी हे लेखक आणि अमेरिकी बंदिगृहांतील छळाचा नेहमीच निषेध करणारे कार्यकर्तेही आहेत.  या पुस्तकाची अमेरिकेतील प्रस्तावित प्रकाशन- तारीख २० जानेवारी आहे.  
.. स्लाही अर्थातच प्रकाशन सोहळय़ाला येणार नाही.. कारण आजही तो बंदिवानच आहे.
भाषांतर अखेर झाले!
लॅटिन अमेरिकी देशातील आणि स्पॅनिशमध्ये लिहिणाऱ्या नामांकित लेखकांपैकी नोबेल पारितोषिकाचे मानकरी मारिओ व्हर्गास ल्योसा हे मोठं नाव! त्यांच्या ‘ द डिस्क्रीट हीरो’ या कादंबरीचा अनुवाद गेली दोन र्वष येणार- येणार अशी चर्चा होती. अखेर आता, येत्या मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ाचा मुहूर्त या कादंबरीच्या प्रकाशकांनी नक्की केला आहे. अनुवादक  आहेत एडिथ ग्रॉसमन.
पेरू देशातच ल्योसाच्या कादंबऱ्या घडतात आणि  अनेक कादंबऱ्यांमध्ये सरजट लिटुमा, डॉन रिगोबेतरे आदी पात्रं असतात. सरकारयंत्रणा, लष्करशाही , सरंजामी अवशेष यांची ती प्रतीकंच बनली आहेत. ‘डिस्क्रीट हीरो’ ही कथा मात्र दोन व्यापाऱ्यांच्या, दोन निरनिराळय़ा कहाण्यांनी बनलेली आहे. यापैकी एक आहे स्वतच ब्लॅकमेलिंगची शिकार ठरलेला तर दुसरा, स्वतच्या दोघा मुलांना धडा शिकवू पाहणारा.. या दोघांच्या कहाण्या पुढे एकत्र होतात.. पुढे काय होतं? हे कळण्यासाठी १० मार्चपर्यंत थांबावं लागेल.

अख्खं पान ‘बुकमार्क’?
इंग्रजी पुस्तकांना वाहिलेला ‘बुकमार्क’ हा विभाग यापूर्वी फार तर पाऊण पान असे, आणि त्यामुळे पुस्तकांबद्दलच्या लेखांवरही शब्दमर्यादा येत असे.. ही त्रुटी वाचकांनीही नजरेस आणून दिल्यानंतर २०१५ मध्ये ‘बुकमार्क’ला पूर्ण पान जागा द्यावी, असे ठरले. मात्र, ज्येष्ठ वैज्ञानिक वसंत गोवारीकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आजचा अंक निराळा आहे.
नव्या वर्षांत, नवनवीन पुस्तकांवरील लेखांखेरीज, एक नवे सदर सुरू होते आहे. जुन्या, आठवतच राहतील अशा आणि आजही चमक कायम असलेल्या पुस्तकांनी जगण्याचे काही ‘गमक’ दिले का, याची शहानिशा करणारे, ‘चमकदार-गमकदार’ हे सदर अपरिहार्य कारणांमुळे पुढील आठवडय़ापासून.. या सदरातील पहिले ‘गमकदार’ पुस्तक आहे..
..अर्थातच आयन रँडचे ‘फाउंटनहेड’!