‘अलविदा धडकनों को जब कहना, जब खुदा को तेरी जरूरत हो’.. प्रसिद्ध उर्दू गीतकार, लेखक तसेच तत्त्वज्ञ डॉ. सरदार अंजुम (वय ७३) यांचे मृत्यूला आपण घाबरत नाही हे सांगणाऱ्या ओळी.. जवळपास महिनाभर ते मोहाली येथील एका रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते, पण अखेर मृत्यूने त्यांना गाठले.
अंजुम यांचा जन्म होशियारपूर शहरानजीक घोरेवाला खेडय़ात २२ एप्रिल १९४२ रोजी झाला. पतियाळाच्या महेंद्र कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली व नंतर मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी उर्दू व इंग्रजी या विषयांत पदव्युत्तर पदवी घेतली.  ‘त्यांनी एकूण २५ पुस्तके लिहिली आहेत, शिवाय ‘गूंगी तारीख’ ही पंजाबच्या दहशतवादावरील दूरचित्रवाणी मालिका त्यांनी तयार केली होती. १९८० च्या दशकात त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना एका पत्राद्वारे शेर लिहून पेश केला होता, तो त्यांना खूप आवडला होता. पंजाब विद्यापीठाच्या उर्दू विभागाचे ते प्रमुख होते. त्यांचा ‘कर्जदार’ हा चित्रपट भारत व पाकिस्तान यांना जवळ आणणारा होता. सध्या ते हरयाणातील पंचकुला येथे वास्तव्यास होते. आपली प्रकृती कशीही असो, पण आपण कवी असल्याचा आपल्याला अभिमान आहे, देवानेच ती देणगी आपल्याला दिली, कवी म्हणून आपला मृत्यूवर विश्वास नाही, तर विश्व, प्रेम व देव यांच्यावर विश्वास आहे, असे ते म्हणत असत. कलाकारांना नेहमीच समाजात वरचे स्थान मिळाले पाहिजे असे त्यांना वाटत होते. जेव्हा सरकार अपयशी ठरते, तेव्हा कलाकार लोकांना मदत करतात, त्यांना जगण्याची आशा देतात, बळ देतात, असे ते सांगत असत. अडीच लाखांचा शिरोमणी उर्दू साहित्यकार पुरस्कार त्यांनी नाकारला होता, तो पैसा कवींच्या कल्याणासाठी खर्च करावा, असे त्यांनी म्हटले होते. अंजुम यांचे उर्दू, हिंदी व पंजाबी साहित्यात वेगळे स्थान होते. अंजुम यांना केवळ साहित्यात रुची होती असे नाही, तर भारतीय संगीताचे ते जाणकार होते. त्यांनी जगजित सिंग, पंकज उदास यांच्यासाठी अनेक गझला लिहिल्या. त्यांना १९९१ मध्ये पद्मश्री, २००५ मध्ये पद्मविभूषण हे  किताब मिळाले.‘जिंदगी एक इम्तिहान हैं, इम्तिहान का डर नहीं, हम अंधेरों से गुजर कर रोशनी कहलायेंगे.’ सरदार अंजुम यांनी २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेनिमित्त लिहिलेल्या या ओळींचे पडसाद आजही वाघा सीमेवर घुमत आहेत.