21 September 2020

News Flash

झियाउद्दीन युसूफझाई

पाकिस्तानात खैबर पख्तुनवाला हा जो आदिवासीबहुल प्रांत आहे तिथे अजून सात लाख मुलांनी प्राथमिक शाळेचे तोंडही पाहिलेले नाही आणि त्यातील सहा लाख मुली आहेत. मुलांच्या

| December 12, 2012 12:39 pm

पाकिस्तानात खैबर पख्तुनवाला हा जो आदिवासीबहुल प्रांत आहे तिथे अजून सात लाख मुलांनी प्राथमिक शाळेचे तोंडही पाहिलेले नाही आणि त्यातील सहा लाख मुली आहेत. मुलांच्या तुलनेत त्यांना शिक्षण घेण्याची संधी शून्य आहे. याच प्रांतात शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या मलाला युसूफझाई या मुलीवर ती तिच्या मैत्रिणींबरोबर शाळेत जात असताना तालिबान्यांनी हल्ला केला, त्यात ती सुदैवाने वाचली. या ठिणगीला जन्म देणारा वणवा म्हणजे तिचे वडील झियाउद्दीन युसूफझाई. त्यांच्यामुळेच मलाला या लहानग्या मुलीत शिक्षणाची आवड निर्माण झाली. एकीकडे मलाला हिची शिफारस शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी होत असतानाच झियाउद्दीन यांची नेमणूक संयुक्त राष्ट्रांनी जागतिक शिक्षणाचा खास सल्लागार म्हणून केली आहे. याच विभागात संयुक्त राष्ट्रांचे दूत असलेले ब्रिटनचे माजी पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी केलेली ही निवड निश्चितच कल्पक आहे. झियाउद्दीन हे शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत आणि विशेष म्हणजे तालिबानच्या धमक्यांना न जुमानता लहान वयात मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या मलालासारख्या धीट व शूर मुलीचे पिता आहेत. अनेकदा एखाद्या योजनेचा प्रसार करण्यासाठी जे दूत नेमले जातात त्यांचा प्रत्यक्ष त्या क्षेत्राशी संबंध असतोच असे नाही. येथे धर्ममरतडांचा विरोध झुगारून शिक्षण प्रसाराच्या क्षेत्रात पुढे होऊन लढणाऱ्या एका लढवय्याला हा मान मिळाला आहे. झियाउद्दीन युसूफझाई यांचे फेसबुक प्रोफाइल बघितले तर ते मुस्लीम समाजातील एक प्रगतिशील शिक्षण-हक्क कार्यकर्ते आहेत हेच दिसते. स्वातमधील खासगी शाळा व्यवस्थापन संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. ‘खुशाल’ नावाची शाळा व कॉलेज ते चालवतात. पुश्तू, इंग्रजी व उर्दू या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. २०१५ पर्यंत जगातील सर्व मुलींना शिक्षण मिळाले पाहिजे, असा युनोचा निश्चय आहे. त्यासाठी ‘मलाला प्लान’ नावाची योजना राबवली जात असून ‘मी मलाला आहे’ असे बॅनर घेऊन मुली शिक्षणाचा हट्ट धरणार आहेत आणि तो पुरवण्याची जबाबदारी आपणा सर्वाची आहे. साडेतीन कोटी मुलींना या मोहिमेचा फायदा होणार आहे. स्वात खोऱ्यात सहाशे शाळा जाळून टाकल्या आहेत, अशा दारुण परिस्थितीत मलाला व तिचे वडील पूर्वीपासून लढतच होते. आज फक्त त्यांची ही साहसी कहाणी जगासमोर आली आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 12:39 pm

Web Title: vaktivedh 4
टॅग Vaktivedh
Next Stories
1 पॅट्रिक मूर
2 नसरीन
3 भानू चौधरी
Just Now!
X