मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जी सदिच्छा भेट घेतली तिचा वेगळा अर्थ लावू नये, असे डॉ. देशमुख यांनी म्हटले असून, ते शंभर टक्के खरेच आहे. अशा भेटींचा वेगळा नव्हे, तर योग्य तोच अर्थ घ्यायचा असतो. डॉ. देशमुख हे एक विद्वान गृहस्थ असून ते माजी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर नाहीत. मुंबई आणि महाराष्ट्रातील सुबुद्ध जनतेला ते ज्ञात आहे तेव्हा ते अशा भेटींतून वेगळा अर्थ काढणारही नाहीत. डॉ. देशमुख यांच्या म्हणण्यानुसार विद्यापीठाच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या हेतूने ते गेले काही महिने समाजातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि त्या वैयक्तिक पातळीवर आहेत. यातून हेतूंच्या शुद्धतेबाबत तरी कोणी शंका घेण्याचे कारण दिसत नाही. तेव्हा याबाबत बाकीचे काय म्हणतात याची पर्वा करण्याची कुलगुरूंना आवश्यकता नाही. आता प्रश्न राहिला तो या भेटीच्या योग्य अर्थाचा. डॉ. देशमुख सांगतात त्याप्रमाणे या भेटी वैयक्तिक स्तरावर घेतल्या जात होत्या हाच मुळात वादग्रस्त मुद्दा आहे. पूर्वीच्या मसाला हिंदी चित्रपटांतून एक हमखास दिसणारा प्रसंग असे. त्यात नायिकेचा बाप नायकाला म्हणायचा, की आज मी येथे एका पोलीस अधिकाऱ्याच्या हैसियतीने नाही, तर मुलीच्या बापाच्या हैसियतीने उभा आहे. डॉ. देशमुख यांचे म्हणणे या अशा प्रकारचे आहे. अखेर कुलगुरूपद हे काही शासकीय कार्यालयातील कारकुनाचे पद नाही, की घरी गेल्यानंतर त्याला ते विसरून वागता येते. कुलगुरू हे सतत कुलगुरूच असणार. त्या पदाची प्रतिष्ठा, मानमरातब हे त्यांना कदापि विसरता येणार नाही. १५८ वर्षांचा वारसा मिरवणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना तर नाहीच नाही. सर अलेक्झांडर ग्रांट, काशिनाथ त्र्यंबक तेलंग, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, सर फिरोजशाह मेहता, पां. वा. काणे यांसारख्या मातब्बरांनी आपली विद्वत्ता, कार्य आणि कर्तृत्व यायोगे या पदाला मोठी उंची दिलेली आहे. तेथे पाठकण्याचा आजार असलेली मंडळी आलीच नाहीत असे नाही. तीही होऊन गेली. परंतु खुजे बसले म्हणून खुर्चीची उंची कमी होत नसते. बरे हे की राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना कुलगुरूपदाच्या उंचीचे भान आहे. कुलगुरूंकडे मोठी जबाबदारी असते. तेव्हा त्यांनी प्रशासकीय कामांसाठी मंत्रालयात वगैरे येण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी त्यांनी एखादा अधिकारी नेमावा, अशी सूचना त्यांनी अलीकडेच केली होती. शिक्षणमंत्री असे सांगत असताना डॉ. देशमुख अगदी सद्हेतूने का होईना, परंतु कुणाच्या द्वारपूजेस जात असतील तर ते पदाच्या प्रतिष्ठेस अशोभनीय आहे. राजकीय नेते तर अशा भेटींचा आपल्या प्रतिमासंवर्धनासाठी लाभ करून घेण्यास उत्सुकच असतात. कुलगुरूंनी ते काम तरी सोपे करू नये. भेटायचेच असेल, तर त्यांना पाचारण करावे. ते येतील. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंचे आमंत्रण अव्हेरण्याचा अडाणीपणा आपल्या राजकीय नेत्यांत असेल असे वाटत नाही. मात्र त्याआधी कुलगुरूंनीही कुळाचार पाळला पाहिजे. विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला याआधी गेले ते तडे खूप झाले..