भालचंद्र पेंढारकर यांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी जिद्दीने टाकलेले रंगभूमीवरचे पाऊल इतके घट्ट रोवले की, त्यामुळे संगीत रंगभूमीचा उद्धारकर्ता अशी उपाधी आपोआपच मिळाली. त्यांनी विकलांग होत चाललेल्या संगीत रंगभूमीला केवळ पुनरुज्जीवित केले नाही, तर ती अधिक दिमाखात उभी राहण्यासाठी आपले सर्वस्व वेचले. संगीत रंगभूमी या संकल्पनेचे निर्माते अण्णासाहेब किलरेस्कर यांनी स्थापन केलेल्या किलरेस्कर नाटक मंडळीतून गंधर्व नाटक मंडळीचा जन्म झाला आणि त्या काळात त्याच प्रेरणेने १८९४ मध्ये ‘स्वदेशहितचिंतक’ या नावाची संगीत नाटक कंपनीही स्थापन झाली. जनुभाऊ निमकर हे त्याचे संस्थापक. बालगंधर्वाचा आदर्श ठेवून त्या काळात जे अनेक नवे गायक नट पुढे येत होते, त्यांत केशवराव भोसले हे नाव दुमदुमणारे ठरले. केशवरावांनी ‘स्वदेशहितचिंतक’मधून बाहेर पडून १९०८ मध्ये हुबळी मुक्कामी ‘ललितकलादर्श’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. गंधर्व मंडळीमध्ये बखलेबुवा होते आणि त्यांनी संगीत नाटकाला गायनाच्या क्षेत्रात अतिशय उच्च पातळीवर नेले होते. ‘ललितकलादर्श’लाही अशा घराणेदार बुवांची गरज होतीच. केशवरावांनी ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ कलावंत रामकृष्णबुवा वझे यांच्याकडून गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली आणि गंधर्वशैलीच्या अनुकरणातून ते बाहेर पडले. केशवरावांच्या अचानक निधनाने ‘ललितकलादर्श’ची जबाबदारी कंपनीतील ज्येष्ठ असलेल्या बापूराव पेंढारकर यांच्याकडे आली. त्यांनीही मोठय़ा हिमतीने ही संस्था चालू ठेवण्यात यश मिळवले. बोलपटांच्या आगमनाने मागे पडू लागलेल्या संगीत नाटकांना त्याही काळात बापूरावांच्या वेगळेपणामुळे सतत प्रेक्षक लाभला. भालचंद्र हे बापूरावांचे चिरंजीव. भालचंद्रांनी खूप शिकावे आणि गाणे शिकू नये, अशी बापूरावांची इच्छा होती खरी. पण वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे भालचंद्रांनी या संस्थेची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लौकिक शिक्षणाला रामराम ठोकला. केशवराव आणि बापूराव हे दोघेही गायनाचार्य वझेबुवांचे शिष्य. भालचंद्रांनीही बुवांचा गंडा बांधला आणि पाच वर्षे तालीम घेतल्यानंतर ‘ललितकलादर्श’चे पुनरुज्जीवन केले. चढय़ा आवाजात गाण्याची केशवरावांची परंपरा भालचंद्र पेंढारकरांनीही चालू ठेवली. नवे विषय, नवी मांडणी आणि साजेसे संगीत यावर भर देत ही संस्था पुन्हा एकदा संगीत रंगभूमीच्या नभांगणात विहार करू लागली. शिस्त हा या संस्थेचा महत्त्वाचा गुणधर्म. त्यामुळे नाटक वेळेतच सुरू होण्यावर भर. मग अगदी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना यायला उशीर झाला, तरी नाटकाला उशीर न करण्याचा हट्ट. नाटय़वर्तुळात भालचंद्र पेंढारकरांची ओळख ‘अण्णा’ अशी होती. ‘सत्तेचे गुलाम’ या १९४२ मध्ये रंगभूमीवर आलेल्या त्यांच्या पहिल्याच नाटकात अण्णांनी रसिकांच्या मनात आपली जागा पक्की केली होती. त्यांच्या विद्याधर गोखले लिखित ‘पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाने तर पारंपरिक संगीत रंगभूमीवरील आधुनिक युगाचा शुभारंभ घडवून आणला. या नाटकात वसंत देसाई यांच्यासारख्या संगीतकाराने ‘प्लेबॅक’ तंत्राचा वापर केला होता. संगीत रंगभूमीचा इतिहास जपायला हवा, असे केवळ म्हणण्यापेक्षा त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या अण्णांनी सुमारे तीनशे संगीत नाटकांचे ध्वनिचित्रमुद्रण करून ठेवले. आयुष्यभर रंगभूमीचे पावित्र्य जपणाऱ्या या घराणेदार संगीत अभिनेत्याने आपली कला समाजापर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पुरस्कार आणि प्रसिद्धी यांचा कधी हव्यास धरला नाही, पण ते त्यांच्या मागे धावत आले. त्यांच्या निधनाने संगीत रंगभूमीवरील एका ज्येष्ठ रंगकर्मीला आपण मुकलो आहोत.