तेलुगू चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक ही व्ही. बी. (वीरमचनेनी बाबू) राजेंद्र प्रसाद यांची ओळख पुरेशी नव्हे. त्यांनी तेलुगूखेरीज काही हिंदी चित्रपटांचीही निर्मिती केली होती. हे चित्रपट नाव घेण्याजोगे नव्हते आणि तेलुगू चित्रपटांच्या क्षेत्रात मात्र राजेंद्रबाबूंची कामगिरी लक्षणीय होती, हे त्यांची ओळख तेलुगूपुरती सीमित राहण्याचे खरे कारण.
एकंदर १४ चित्रपटांचे दिग्दर्शन, १६ चित्रपटांची निर्मिती आणि दोन चित्रपटांचे लेखन, असा १९६१ ते १९८९ पर्यंतच्या त्यांच्या कारकीर्दीचा आवाका होता. काही काळ लेखनाची कामे केल्यावर त्यांनी ‘जगपति आर्ट्स’ ही स्वत:ची चित्रपट-संस्था स्थापली. ‘आराधना’ (१९६२), ‘आत्मबलम्’ (१९६४) आणि ‘अंतस्तलु’ (१९६५) अशा चित्रपटांची निर्मिती सुरू केली. हे सारेच चित्रपट साध्यासुध्या कथांचा रंजक फुलोरा आणि सामाजिक संदेशही, अशा स्वरूपाचे होते; पण हे त्या काळाचेच वैशिष्टय़ होते. यापैकी ‘अंतस्तलु’ हा १९६५ मध्ये तेलुगू भाषेतील ‘राष्ट्रीय पुरस्कार’ विजेता ठरला. त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार मराठीसाठी मिळवणारा चित्रपट होता भालजी पेंढारकरांचा ‘साधी माणसं’! हिंदीत ‘खतरों के खिलाडी’ हा चित्रपट (चंकी पांडे आणि नीलम- १९८८) बनवणारेही हेच ते राजेंद्रबाबू. तेलुगूची विख्यात अभिनेत्री भानुमती हिला अभिनयासाठीचे तिचे पहिले राष्ट्रपती पदक मिळवण्याची संधी देणारे राजेंद्रबाबू, तेलुगूत उंची गाठल्यावर हिंदीच्या मागे का लागले, हे आज कुणीच सांगत नाही. शबाना आझमीसारख्या अभिनेत्रीनेही त्यांच्या चित्रपटात काम केले आहे! पण तो चित्रपट (रास्ते प्यार के, नायक जितेंद्र) आज शबाना यांनाही आठवणार नाही.
राजेंद्रबाबूंचा चित्रपट-प्रवास १९८०च्या दशकात काहीसा वावदूक झाला. परंतु १९९० ची चाहूल लागण्याआधी त्यांनी हा प्रवास सरळ थांबवलाच आणि सूत्रे चिरंजीव- अभिनेता जगपति बाबू यांच्या- हाती दिली. पडद्यावरल्या हाणामाऱ्या आणि रुपेरी प्रेम अशा दोन्हींचे दर्शन नायक म्हणून घडविणारे जगपति बाबूसुद्धा हल्ली वडिलांच्या भूमिका करू लागले आहेत. गेल्या २५ वर्षांत जगपति यांना पडद्यावर यश मिळत असताना राजेंद्रबाबू घरीच निवृत्त आयुष्य जगत होते. आध्यात्मिक वाचनात त्यांचा दिवस जात असे. मात्र एखाद्या संध्याकाळी चित्रपटांच्या गप्पा निघाल्या की, हल्ली पूर्वीसारखे चित्रपट निघत नाहीत, ही खंत त्यांच्या बोलण्यात हमखास निघे. त्यांना ‘पूर्वीसारखे’ म्हणजे, १९६५ पर्यंतचे- साधेसरळ आणि सुंदर-चित्रपट अभिप्रेत असत. ते बनवण्याचा काळ तर त्यांच्याही कारकीर्दीत बदलतच होता.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2015 रोजी प्रकाशित
व्ही बी राजेंद्र प्रसाद
तेलुगू चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक ही व्ही. बी. (वीरमचनेनी बाबू) राजेंद्र प्रसाद यांची ओळख पुरेशी नव्हे.
First published on: 15-01-2015 at 12:15 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran telugu filmmaker vb rajendra prasad