स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ३५ आणि ३६वी ओवी, तिचा ज्ञानेश्वरीतील क्रम, तिचा प्रचलितार्थ आणि विशेषार्थ विवरण पुढीलप्रमाणे :
दीपाचेनि प्रकाशें। गृहींचे व्यापार जैसे। देहीं कर्मजात तैसें। योगयुक्ता।।३५।। (अ. ५/ ४९) तो कर्मे करी सकळें। परी कर्मबंधा नाकळे। जैसें न सिंपें जळीं जळें। पद्मपत्र।। ३६।। (५ / ५०)
प्रचलितार्थ : दिव्याच्या उजेडाच्या आधारावर ज्याप्रमाणे घरातील सर्व व्यवहार चालतात, त्याप्रमाणे (ज्ञानाच्या प्रकाशांत) योगयुक्तांची सर्व कर्मे देहांत चालतात (४९). ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात असूनही पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो सर्व कर्मे करतो, परंतु (धर्माधर्मरूप) कर्मबंधनाने आकळला जात नाही (५०).
विशेषार्थ : हे वरकरणी पाहता योगयुक्ताचं वर्णन असलं तरी साधकासाठी हे सद्गुरूचंच दर्शन आहे. साधकानं योगयुक्त कसं व्हावं, यासाठी सद्गुरूंनी केलेलं हे प्रात्यक्षिक आहे!
विवरण : इथे योगयुक्त हा शब्द फार महत्त्वाचा आहे. परमतत्त्वाचा योग येणं आणि परमतत्त्वानं सदोदित युक्त असणं, या दोन्ही गोष्टी योगयुक्त या एका शब्दांत अंतर्भूत आहेत. आपणच विचार करा. परमतत्त्वाचं या डोळ्यांना साधेल असं दर्शन केवळ सद्गुरूंच्याच माध्यमातून घडत नाही का? ज्यांनी ज्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं, त्यांच्याशी ज्यांना ज्यांना बोलता आलं, ज्यांना ज्यांना त्यांच्या सहवासात काही क्षण राहता आलं त्यांना त्यांना स्वामींचा योग आलाच ना? काही जणांना एकदाच त्यांचं दर्शन झालं, काही जणांना अनेकदा त्यांचं दर्शन झालं. काही जण एकदाच त्यांच्याशी बोलू शकले, काही जण अनेकदा त्यांच्याशी बोलू शकले. काहींना पत्राद्वारे एकदाच स्वामींच्या बोधाचा लाभ मिळाला, काही जणांना अनेकदा स्वामींची पत्रं आली आणि बोधाचा लाभ मिळाला. आता योग तर अशाप्रकारे अनेकांना घडला पण युक्त किती जण झाले? प्रत्येक जण युक्त झाला का? त्या योगाचा संस्कार मनात टिकवणं किती जणांना कितपत साधलं? ज्याला ते पूर्ण साधलं त्याची आंतरिक स्थिती कशी होऊन जाईल, हे या दोन ओव्या सांगतात! आता पहिल्या ओवीचा विचार करू. योगयुक्त हा देहानं कशी र्कम करतो, हे सांगताना दिव्याच्या प्रकाशात घरात होणाऱ्या कर्माची सुरेख उपमा माउलींनी दिली आहे. दिव्याचा प्रकाश आहे म्हणूनच घरात आवराआवर, लेखन-वाचन, स्वयंपाक करणं, भोजन करणं आदी कामं होतात. त्या कर्माचं कर्तेपण मात्र दिवा घेत नाही! त्याच्या देखतच आणि त्याच्याच आधारावर सर्व कर्मे होत असतानाही त्या कर्मामध्ये तो गुंतत नाही. त्याप्रमाणे योगयुक्त देहाच्या आधारे सर्व कर्मे करीत असतो, पण कर्तेपणाची भावना त्याला चिकटत नाही की त्या कर्मात तो गुंततही नाही. कारण आत्मदीपाच्या प्रकाशात केवळ साक्षीभावानं तो कर्मव्यवहारांकडे पाहात असतो. आता इथे दिवा आणि घर या दोन उपमांचा वापर योगयुक्त अंत:करण अर्थात आत्मज्ञानानं प्रकाशित अंत:करण आणि देहानं होणारी कर्मे यांच्यासाठी चपखलपणे केला आहे.