श्रीगोंदवलेकर महाराज यांचे जे विचार आपण गेल्या भागात वाचले त्यातून अनेक तरंग आपल्या मनात उमटले असतीलच. त्यांचा मागोवा घेत बोधाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करू. श्रीमहाराजांच्या सांगण्यात एक शब्द आला आहे तो म्हणजे ‘जनप्रियत्व’. आपण दुसऱ्यांसाठी जे काही करीत असतो त्यामागे आपले अनेक सुप्त हेतू असतात त्यातला एक असतो जनप्रियत्व. लोकांना आपण आवडावं, हा तो हेतू असतो. श्रीमहाराज त्यासाठी सांगतात की जनांचा जो राजा परमात्मा त्याचं प्रियत्व संपादन करा की जनप्रियत्व लाभेल. आता परमात्म्याचं प्रियत्व संपादन करायचं म्हणजे काय आणि त्याचा मार्ग काय, हे श्रीमहाराज इथे विशद करीत नाहीत पण अन्य एके ठिकाणी त्याचा तपशील श्रीमहाराजांनी दिला आहे. श्रीमहाराज जनप्रियत्वाला कमी लेखत नाहीत. उलट खरं जनप्रियत्व आपल्या माणसाला लाभावं, असं त्यांना वाटतं. आपल्या मनातल्या जनप्रियत्वाबद्दलच्या कल्पना आणि ते मिळविण्याचे आपले मार्ग, याबाबतीत मात्र मोठीच गफलत आहे. खरं जनप्रियत्व म्हणजे काय आणि ते लाभण्याचा खरा शुद्ध मार्ग कोणता, हे स्पष्ट करताना श्रीमहाराज म्हणतात, ‘‘मला जनप्रियत्व फार आवडते. कारण जो लोकांना आवडतो, तोच भगवंताला आवडतो. जो निस्वार्थी असेल त्यालाच जनप्रियत्व येईल. आपण आपल्यासाठी जे करतो ते सगळ्यांसाठी करणे, हे भगवंताला आवडते. आपण आपल्यापुरते न पाहता सर्व ठिकाणी भगवंत आहे, असे पाहावे. प्रत्येकाला आपण हवेहवेसे वाटले पाहिजे. असे वाटण्यासाठी लोकांच्या मनासारखेच वागले पाहिजे किंवा त्यांना आवडेल तेच बोलले पाहिजे असे नाही. प्रेम करायला कशाचीही जरुरी लागत नाही; पैसा तर बिलकूल लागत नाही, हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. जगात कुणी भोगली नसेल एवढी गरिबी मी भोगली आहे. अशा गरिबीमध्ये राहूनही माझे अनुसंधान टिकले, मग तुम्हाला ते टिकवायला काय हरकत आहे? मी जर काही केले असेल तर मी कधी कुणाचे अंतकरण दुखवले नाही, तेवढे तुम्ही सांभाळा’’(प्रवचने, २५ फेब्रुवारी). श्रीमहाराजांच्या एकेका परिच्छेदावरून खरं तर पुस्तकंच्या पुस्तकं लिहिली जाऊ शकतात तरी सांगणं अपूर्णच राहील! आपण आपल्या स्थलमर्यादेत विचार करू. लोकांना आपण आवडावं यासाठीचे आपले मार्ग काय असतात? आपण लोकांना आवडेल असंच वागू पाहतो, लोकांना आवडेल असंच बोलू पाहतो, लोकांना आवडतं म्हणून त्यांच्यासाठी पैसाही खर्च करू पाहतो. श्रीमहाराज तर या तिन्ही गोष्टी मोडीत काढतात. पाहा बरं! लोकांना आवडेल असंच बोलायची गरज नाही, हे ठामपणे सांगतानाच लोकांचं अंतकरण कधी दुखवू नका, असंही श्रीमहाराज सांगतात! लोकांच्या मनासारखं वागायची गरज नाही, हे सांगतानाच त्यांचं अंतकरण दुखवू नका, असंही बजावतात. आपल्या मनासारखं कोणी वागलं नाही किंवा बोललं नाही तर आपलं अंतकरण दुखावतंच ना? मग परस्परविसंगत भासणाऱ्या या वाक्यांतील आंतरसंगती काय असावी?