जीवनातल्या प्रत्येक प्रसंगात गुरूबोधाचं भान असेल, परमात्म्याचं भान असेल आणि प्रत्येक प्रसंगात परमात्म्याची काय इच्छा आहे, हे पाहण्याची जाण असेल, प्रत्येक प्रसंगात त्यांना आवडेल अशीच कृती, वर्तणूक माझ्याकडून व्हावी, असा प्रयत्न असेल तर मग हळुहळू ‘सर्वात्मक’चा अर्थ अनुभवांतदेखील येईल, असं संत सांगतात. सुरुवातीला प्रत्येकात ईश्वर आहे, हा ‘सर्वात्मक’चा अर्थ शब्दार्थानं कळतो, पण दुसऱ्याशी वागताना तो टिकत नाही. आपलं भान सुटतं आणि आपलं वागणं आपल्या ‘मी’च्या कलानुसार बरं-वाईट होतं. तेव्हा सर्व रूपांत, सर्व प्रसंगांत ईश्वरच मला काही शिकवू पाहात आहे, काही सांगू पाहात आहे, असं मानलं तर ‘मी’ची पकड सुटून प्रसंगाकडे थोडं तरी अलिप्तपणे पाहाता येईल. त्या प्रसंगाबरोबर वाहात जाणं कमी होईल. आतून मन थोडं अधिक स्थिर, सावध राहील. तर हे साधका, तुझं जे बरं-वाईट जीवन आहे ती माझी सेवाच आहे, माझ्याचसाठी तुला ते जगायचं आहे. आता हे जीवन कर्माशिवाय आहे का? नाही. जीवन म्हणजे अनंत कर्माचा प्रवाह आहे आणि जिथे कर्म आहे तिथे कर्तव्याची सीमा ओलांडली गेली तर नवं प्रारब्धही आहेच. म्हणून कर्तव्यापुरतंच कर्म साधावं यासाठी कर्मातील सूक्ष्म ‘मी’केंद्रित हेतूलाच धक्का लावत माउली आणखी खोलवर पालट घडविणारा बोध करतात! तया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्मकुसुमांची वीरा। पूजा केली होय अपारा। तोषालागीं।। माझ्यासाठी तुझ्याकडून होणारी कर्मे म्हणजे जर माझीच सेवा असेल, ही कर्मे जर तू मला अर्पण करीत असशील तर हीच माझी पूजा आहे. ही कर्मे म्हणजे या पूजेत मला वाहिली जाणारी फुले आहेत. ‘मी’पणाच्या ओढीतून कर्मे करीत राहाण्याची सवय मोडण्यासाठी मोठं धैर्य लागतं. असं ज्याला साधेल तोच खरा वीर आहे. या पूजेनंच तू अपार म्हणजे पैलपार होशील आणि पूर्ण संतोष प्राप्त करून घेशील! आपण जी कर्मे करतो त्यात ‘मी’पणाच चिकटला असतो, ‘मी’चं पोषणच असतं. प्रत्येक कर्मातून आपण काहीतरी मिळवूही पाहात असतो. ती सौदेबाजीच असते. मी दुसऱ्यासाठी इतकं केलं तर त्यानंही माझ्यासाठी अमुक केलं पाहिजे, असा सौदा मनात पक्का असतो. मनाची ही वृत्ती पालटण्यासाठी भगवंत सांगत आहेत की तुझं अवघं कर्ममय जीवन ही माझीच सेवा मान. प्रत्येक प्राणिमात्रांत मी भरून आहे. मग त्यांची सेवा ही माझीच सेवा आहे. त्यांच्यासाठी तू जे काही करशील त्यात मोबदल्याची अपेक्षा ठेवू नकोस. तू माझीच सेवा केलीस, असं मानून त्या मोबदल्याच्या अपेक्षांतून मोकळा हो. बाबा रे, ही माझीच खरी पूजा आहे. तुझ्या पूजेत थाटमाट असतो. देखावा असतो. अवडंबर असतं. जो आपल्याला पूज्य असतो त्याची पूजा केली जाते. पूजेची खरी सांगता मात्र पूजा करणारा पूज्य होण्यातच असते. इथे पूज्य म्हणजे शून्य! पूजा करणारा स्वत:ला विसरला, देहबुद्धीच्या पकडीतून सुटला, शून्यवत झाला की पूजा खरी झाली. सर्व कर्मे मला अर्पण करीत असताना तू ‘मी’पणानं जेव्हा उरणारच नाहीस तेव्हाच त्या कर्माची खरी फुले होतील आणि तेव्हाच माझी खरी पूजा साधेल.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jun 2014 रोजी प्रकाशित
१२४. पूजा
जीवनातल्या प्रत्येक प्रसंगात गुरूबोधाचं भान असेल, परमात्म्याचं भान असेल आणि प्रत्येक प्रसंगात परमात्म्याची काय इच्छा आहे, हे पाहण्याची जाण असेल,
First published on: 25-06-2014 at 12:24 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 124 worship