कनिमग रेल्वे स्थानकात झालेल्या दहशतवादी हत्याकांडामुळे भारतासारख्या देशांचे दु:ख चीनला नक्कीच समजले असेल! शनिवारी ही घटना घडली. रेल्वे स्थानकातील नेहमीच्या गर्दीत अचानक सुमारे दहा दहशतवादी घुसले आणि समोर दिसेल त्याला हातातील लांब सुऱ्यांनी कापत सुटले. त्यात ३३ जण ठार झाले आणि १३० जखमी. मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि या हल्ल्यात म्हटले तर बरेच साम्य आहे. दोन्ही हल्ल्यांतील दहशतवाद्यांची संख्या सारखीच होती. दहा. दोन्ही ठिकाणी रेल्वे स्थानकात असाच रक्तपात झाला होता. मुंबईत रायफली चालल्या होत्या. चीनमध्ये सुरे होते. दोन्ही हल्ल्यांमागे इस्लामी दहशतवादी होते. मुंबईतील हल्ल्यामागील सूत्रधार पाकिस्तानी होते. चीनमधील हल्ला शिनजांग प्रांतातील विगुर दहशतवाद्यांनी केल्याचे चीनचे म्हणणे आहे. पूर्व तुर्कस्तान इस्लामिक चळवळ ही तेथील विगुर मुस्लिमांची संघटना. या संघटनेचे पाकिस्तानी तालिबानशी संबंध असल्याचा चीनचा दावा आहे. याचा अर्थ असा, की या हल्ल्यामागे पाकिस्तानी जिहादी शक्तींचा हात आहे. तो अद्याप स्पष्ट झाला नसला तरी आहे. कनिमग हत्याकांडाची तुलना चिनी माध्यमांनी ९/११ केली आहे. ती या अर्थाने योग्यच आहे. परंतु ही तुलना मुंबईतील २६/११शी केली असती तर अधिक चपखल ठरली असती. पाकिस्तान आणि चीनचे चांगलेच गूळपीठ आहे. किंबहुना आशियातील अमेरिका बनण्याच्या चीनच्या खेळीत पाकिस्तान हे एक मोठे प्यादे आहे. पाकिस्तानात ग्वादार येथे बंदर उभारून ते आपल्या शिनजांग प्रांताशी रस्त्याने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चीन राबवीत आहे. या खेळीतून एका भस्मासुराला आपण डोक्यावर घेत आहोत, याचे भान बहुधा चीनला नाही. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये फोफावलेल्या इस्लामी मूलतत्त्ववादाचा टारफुला शिनजांगमधील विगुर अल्पसंख्याकांमध्येही रुजत आहे. २००१ मध्ये अफगाणिस्तानात काही विगुर दहशतवाद्यांना अमेरिकी फौजेने पकडले होते. किरगिझमध्ये एका चकमकीत ११ विगुर दहशतवाद्यांना मारण्यात आले होते. या घटना शिनजांगमधील वातावरण सांगण्यास पुरेशा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रांत चीनपासून वेगळे होऊ इच्छित आहे. तेल आणि कोळसा या संपत्तीने समृद्ध असलेला हा प्रांत. चीनच्या आíथक प्रगतीचे इंजिन त्यावर धावत आहे. पण त्याचा काडीचाही फायदा तेथील विगुर अल्पसंख्याकांना मिळत नाही. दारिद्रय़ आणि बेरोजगारी ही त्यांची सर्वात मोठी समस्या, त्यामुळे त्यांच्यातील स्थलांतरितांचे प्रमाण मोठे आहे. जवळच्या शहरांत पोटासाठी जायचे, चोऱ्यामाऱ्या करायच्या हे त्यांचे जिणे. त्यामुळे हान चिनी आणि विगुर मुस्लीम यांच्यात तणाव आहे. साम्यवादात सगळेच समान असले, तरी चिनी साम्यवादात हान चिनी अधिक समान असतात. त्यामुळे पडते माप नेहमीच या अल्पसंख्याकांच्या पदरात जाते. या रोजच्या संघर्षांतून स्वतंत्र होण्याची मागणी जोर धरीत आहे. यावर उपाय काय? चिनी राज्यकर्त्यांच्या मते – दडपशाही. त्यातून हा संघर्ष अधिक टोकदार बनत चालला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिनजांग प्रांताबाहेरही दहशतवादी हल्ले होत आहेत. तिबेटींप्रमाणेच विगुर दहशतवाद्यांना दडपून, विस्थापित करून कदाचित विगुरांची बंडखोरीही मोडू असा विश्वास चीनला असेल, तर तो मात्र चुकीचा असेल. कारण येथे चीनचा सामना जिहादी दहशतवाद नावाच्या एका आंतरराष्ट्रीय घटिताशी आहे आणि त्याला आजही पाश्चात्त्य साम्राज्यवादी सत्तांचा पाठिंबा आहे. चीनच्या दृष्टीने शिनजांगमधील समस्या दहशतवादी आहे. तीच पाश्चात्त्य माध्यमांच्या दृष्टीने बंडखोरीची आहे. हा फरक बरेच काही सांगणारा आहे..
संग्रहित लेख, दिनांक 4th Mar 2014 रोजी प्रकाशित
चीनमधील २६/११
कनिमग रेल्वे स्थानकात झालेल्या दहशतवादी हत्याकांडामुळे भारतासारख्या देशांचे दु:ख चीनला नक्कीच समजले असेल! शनिवारी ही घटना घडली.

First published on: 04-03-2014 at 12:55 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2611 of china