हृदयेंद्रचं लक्ष लॅपटॉपवर केंद्रित झालं होतं. तिघांचे कानही एकवटले होते. हृदयेंद्रनं एकवार तिघा मित्रांकडे कटाक्ष टाकला आणि तो धीरगंभीर स्वरात अभंग वाचू लागला. अभंग असा होता..
पैल तो गे काऊ कोकताहे।
शकून गे माये सांगतसे।। १।।
उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानें मढीन पाऊ।
पाहुणे पंढरीराऊ घरा कै येती।। २।।
दहिंभाताची उंडी लाविन तुझ्या तोंडी।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगीं।। ३।।
दुधें भरुनी वाटी लावीन तुझें वोंठीं।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी।। ४।।
आंबयां डहाळीं फळें चुंबी रसाळीं।
आजिचेरे काळीं शकून सांगे।। ५।।
ज्ञानदेव म्हणे जाणिवे ये खुणें।
भेटती पंढरीराणे शकुन सांगे।। ६।।
अभंग वाचला. मनात लताबाईंच्या आर्त स्वरांची आठवणही झाली, पण अर्थ? तो काही हाती आला नाही! सहज गप्पा मारत गड चढताना उंच सुळका यावा आणि तो नेमका कसा सर करावा, हे उकलू नये, अशी अवस्था झाली. प्रत्येक शब्दाचा अर्थ शब्दकोशात मिळेल, पण शब्दांच्या गुंफणीतून सूचित अर्थ कुठे मिळणार? चौघांची ही स्थिती झाली.
कर्मेद्र – अभंग छान वाटतो रे ऐकताना. आवजर कितीवेळा गुणगुणलाही असेल. पण आज अर्थ शोधण्यासाठी नीट ऐकला तेव्हा बुद्धीच स्तभ झाली.
ज्ञानेंद्र – जनाबाईंनी म्हटलच आहे, ज्ञानेश्वरांचे काव्य म्हणजे ‘‘भाव अक्षरांची गांठी। ब्रह्मज्ञानाने गोमटी।’’ माउलींचे शब्द म्हणजे जणू भाव आणि अक्षरांची गाठच. प्रत्येक शब्द शुद्ध ब्रह्मज्ञानानं ओतप्रोत भरलेला.
कर्मेद्र – आता काऊ समजतो रे.. पण ती दहीभाताची उंडी काय, दुधाची वाटी काय, सोन्यानं पाय मढवणं काय, आंब्याच्या डहाळीनं रसाळ फळांना चुंबणं काय.. शब्द कळतात, पण अर्थाचा रोख कळत नाही.
हृदयेंद्र – अरे, ही विराणी आहे. पंढरीरायाची वाट पहाणं सुरू आहे. त्यात कावळा ओरडतो. पाहुणे येणार असले म्हणजे तो ओरडतो ना? म्हणून माउली आनंदतात की पंढरीराया घरी येणार तर हे कावळ्या मी तुझे सर्व लाड पुरवीन..
कर्मेद्र – आता पाहुणे येणार हा अर्थ ‘काव काव’मधून काढा हवं तर. कोण येणार, हे तो काय सांगणार? आणि जरी आवडीचा पाहुणा आला तरी लाड करून घेण्यासाठी कावळा थांबतोय थोडाच?
योगेंद्र – आणि कावळा ओरडण्यानं पाहुणे येतात हे खरं असतं तर शहरात कावळ्याला जगू दिलं असतं का लोकांनी?
ज्ञानेंद्र – बास.. आता विनोद थांबवा आणि शब्दाशब्दाचा नीट विचार करा. कावळा ओरडून ‘संकेत’ देत नाही तर ‘शकुन’ देत आहे. पंढरीरायाची वाट पाहाणाऱ्या भक्ताला हा परमात्म्याच्या आगमनाचाच शुभसंकेत वाटतो.
योगेंद्र – पुन्हा विनोद म्हणू नकोस हं, पण पाय सोन्यानं मढवायचे तर कावळ्यानं एका जागी बसलं तर पाहिजे? त्याला ‘उडरे उडरे काऊ’ का म्हंटलंय? त्याचे पाय मढवायला आपणही उडणार का?
हृदयेंद्र – मी काय म्हणतो, हा अभंग मनात वारंवार वाचू आणि माउलींची प्रार्थना करू की अर्थ सांगा..
कर्मेद्र – अरे त्यापेक्षा तुझे सद्गुरू आहेत ना उत्तरेत? त्यांनाच विचार ना..
योगेंद्र – पण त्यांना मराठी येतं का?
ज्ञानेंद्र – अरे सर्वज्ञाला काय कठीण?
हृदयेंद्र – हो, पण इथे रेंज नाही.
कर्मेद्र – मग दारात जा..
तिघांचा आग्रह पाहून हृदयेंद्र मोबाइल घेऊन दाराकडे गेला. तिघे अभंग वाचण्यात गढले. हृदयेंद्र काही क्षणांतच परतला. ‘काय झालं?’ असा भाव तिघांच्या चेहऱ्यावर होता. हृदयेंद्र हसून म्हणाला, ‘‘गुरुजी म्हणाले, मेरा स्मरण रखो. आगे आगे बढोगे तो अपने आप अर्थ समझ मे आएगा!’’
कर्मेद्र – झालं! म्हणजे तू आध्यात्मिक प्रगती करणार केव्हा आणि अर्थ सांगणार केव्हा! सरळ त्यांनी नाही तरी सांगायचं.
या वाक्यावर हृदयेंद्रनं किंचित रागानं त्याच्याकडे पाहिलं.. गाडी बोगद्यात शिरली आणि डब्यात अंधार पसरला..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhang dhara crag and tail
First published on: 02-01-2015 at 12:12 IST