‘‘यहाँ रूकिए सर, बैग दिखाइए..’’ सुरक्षा रक्षकानं अंगावर आणि बॅगवर धातूशोधक उपकरण फिरवलं. ‘‘शुक्रिया सर, जाइए..’’ थोडं पुढं गेल्यावर पुन्हा तपासणी. मग धातूशोधक यंत्र बसविलेल्या कमानीतून प्रवेश. थोडय़ा अंतरावर सुरक्षेचं तिसरं कडं. नंतरही थोडय़ा-थोडय़ा अंतरावर सुरक्षा कमांडो तैनात. कर्मेद्र एकदम खळाळून हसला.
हृदयेंद्र – काय झालं? असा का हसतोयंस?
कर्मेद्र – हृदू, मला फार गंमत वाटते.. भगवान कृष्ण जर आज असते आणि इथे परत आले ना..
हृदयेंद्र – असते आणि आले म्हणजे काय? तो परमात्मा कुठे जात नाही की येत नाही. तो चराचरात आहेच.
कर्मेद्र – तू मान रे तसं, पण मी काय म्हणतो? श्रीकृष्ण परत आले ना, तर त्यांनाही माझ्यासारखंच हसू येईल.
हृदयेंद्र – का? कशाला हसतील ते?
कर्मेद्र – अरे हजारो वर्षांपूर्वी आपण जन्मलो तेव्हा इथे असाच कडेकोट बंदोबस्त होता.. हजार र्वष सरूनही काही फरक पडलेला नाही, हे पाहून त्यांना हसू नाही येणार? तेव्हाचा बंदोबस्त त्यांना जन्मत:च मारता यावं किंवा इथून बाहेर पळवून नेता येऊ नये म्हणून होता. आजचा बंदोबस्त त्यांच्या नावाला जराही धक्का पोहोचू नये, म्हणून आहे!
हृदयेंद्र – त्यांच्या नावाला कशानंही धक्का लागणार नाही. तुझ्या मनात काय विचार येतील सांगता येत नाही.. अरे आपण इथे आलो कशासाठी आहोत?
तोच जिना भुयारी वाटेत गेला. ती वाट उतरून खाली गेल्यावर समोर दिसलं अजस्त्र कारागार. गजांआड श्रीकृष्णजन्माचा नयनरम्य देखावा. अर्थात याही कारागाराबाहेर आजचे कमांडो तैनात होतेच! मग तिथून पुन्हा बाहेर. भिंती अगदी जाड दगडी..
कर्मेद्र – आता मला सांग, हा काय कृष्णाच्या काळातला तुरुंग आहे का?
हृदयेंद्र – असेलही..
कर्मेद्र – असेलही? इथेच आपण भारतीय मार खातो.. अरे कसं असेल? बर, जर असलंच तर इतक्या प्राचीन वास्तूची काही नोंद नको? जर प्रतीकात्मक म्हणून उभारलं असेल तर त्याचीही नोंद नको? कोणी बांधलं? कोणत्या काळात बांधलं? काही नाही!
हृदयेंद्र – बाबा रे, थोडं मनाच्या डोळ्यांनी सर्वत्र पहा.. प्रत्येकवेळी इतक्या चिकित्सकपणाची गरज नाही..
जन्मस्थानचा परिसर होता मात्र अत्यंत विशाल. कंसाच्या राजवाडय़ाचा परिसर शोभावा अशी भव्यता सर्वत्रच जाणवत होती. मग पायऱ्या-पायऱ्या चढून वर गेल्यावर होतं कृष्णमंदिर! संगमरवरी.. अत्यंत देखणं.. सर्वात चित्ताकर्षक होती ती मंदिरातली मुरलीधर भक्तवल्लभ श्रीकृष्णाची मूर्ती! त्या दर्शनानं अंत:करण खरंच तृप्त झालं. मग प्रदक्षिणा मार्गावर चौघंही चालू लागले. डॉक्टरसाहेब त्यांच्या मित्रांबरोबर मागं रेंगाळत चालत होतेच. प्रदक्षिणेचा मार्ग मधेच गाववस्तीतूनही जात होता. मार्गावर छोटी छोटी दुकानं. त्यात कृष्णभक्तीच्या सीडीज, पुस्तकं, लॉकेट्स्, मोरपीसं, तसबिरी असं बरंच काही.. मग तिथून आंतरराष्ट्रीय कृष्णभक्ती संघाचं मंदिर. तिथली टापटीप, स्वच्छता, सुबकपणा आणि परदेशी भक्तांचा साधू व जोगिणीच्या वेषातला वावर. अत्यल्प किंमतीत असलेली प्रसादाची व्यवस्था. तिथून सर्वजण मूळ जन्मस्थानी परत आले. तोच दुपारच्या नमाजाची बांगही कानावर पडली. मंदिर परिसराला लागूनच मशीदही आहे. तिथून सर्व हॉटेलवर परतले. ज्ञानेंद्रनं विचारलं..
ज्ञानेंद्र – डॉक्टरसाहेब पुढचा बेत काय?
डॉ. नरेंद्र – आम्ही आजच निघणार होतो, पण थोडा बदल झालाय. उद्या पहाटे निघणार आहोत.
योगेंद्र – वा! म्हणजे आजची सायंकाळ आणि रात्र गप्पांना मिळणार म्हणायची!
डॉ. नरेंद्र – हो, पण रात्री लवकरच परतावं लागेल.
योगेंद्र – तुम्ही जे रेखाचित्र काढलं होतंत ना? त्यावरून अभंगाचा अर्थ बराचसा ‘दिसतोय’ असं वाटतं! त्यामुळे तुम्हीही गप्पांत असलेलं चांगलंच.
डॉ. नरेंद्र – मलाही तो अर्थ जाणून घ्यायला आवडेल, पण हृदयेंद्रजी एक शंका येते. ‘दुधे भरूनी वाटी’पर्यंतचा अर्थ कळला, पण सद्गुरूबोध पूर्ण ग्रहण केल्यावर तो परमात्मा मिळेल का, हा प्रश्नच का पडावा?
हृदयेंद्र – डॉक्टर तो प्रश्न नाही, ती ग्वाही आहे! ‘विठो येईल का’ विचारलं नाही, तर ‘कायी’ म्हणजे ‘याच देहात विठो प्रकटेल’ असं स्पष्ट म्हटलं आहे!
-चैतन्य प्रेम