नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनी। पाप ताप नयनीं न पडेचि।। हा चरण पुन्हा उच्चारून अचलदादा म्हणाले..

अचलदादा – जगाच्या प्रभावातून, ‘मी’पणातून सोडविणारी साधना हीच ‘नामापरता मंत्र’ म्हणून लक्षात घ्या.. मग कुणी नामाभ्यास करीत असेल, कुणी योगाभ्यास करीत असेल, कुणी ज्ञानाभ्यास करीत असेल, कुणी कर्माभ्यास करीत असेल.. साधना कोणतीही असो, त्यापाठोपाठ अभ्यासही हवाच.. त्या साधनेचा आपल्या अंतर्मनावर काय परिणाम झाला आहे, होत आहे, आपल्या अंतर्मनात किती सकारात्मक बदल झाला आहे, याचा सूक्ष्म अभ्यास झाला पाहिजे.. आजूबाजूच्या परिस्थितीनं, छोटय़ा छोटय़ा प्रसंगांनं मनाचं हिंदकळणं किती कमी झालं, हे पाहिलं पाहिजे.
बुवा – एखादा माणूस शरीर बळकट व्हावं यासाठी खुराक करतो आहे, पण त्याचा काहीच परिणाम शरीरावर दिसत नसेल तर काहीतरी चुकतंय, हे लक्षात येतं ना? अगदी त्याचप्रमाणे वर्षांनुर्वष उपासना करूनही आपल्यात काहीच पालट होत नसेल, तर कुठेतरी काहीतरी चुकतंय, हे जाणवलं पाहिजे ना? उपासनेनं निदान इतकी तरी जाग आणि जाण आलीच पाहिजे!
अचलदादा – आणि अशी जाग आणि जाण आली की उपासना खरी सजगतेनं सुरू होईल.. अशी उपासना जसजशी घडू लागेल तसतसं ‘पाप’ आणि ‘ताप’ आयुष्यातून ओसरत जातील..
कर्मेद्र – पण दादा, माणूस उपासना करू लागला की त्याला पापाची जास्त भीती वाटते का हो?
योगेंद्र – (हसत) म्हणून तू उपासनेच्या वाटेलाच जात नाहीस का?
कर्मेद्र – मुळात आपण उपासना करतो म्हणजे जणू काही मोठी जगावेगळी गोष्ट करतो, हा अविर्भावच मला आवडत नाही.. मी रजनीशांचं पुस्तक वाचलं होतं.. त्यात त्यांनी समाजातल्या दांभिकतेवर बोट ठेवलं होतं.. ते म्हणाले होते की, आपल्या समाजात धर्माची, अध्यात्माची चर्चा अहोरात्र इतकी सुरू असते की स्वर्गातल्या देवांना वाटेल हा समाज किती धार्मिक आहे! प्रत्यक्षात ते इथे अवतरले तर त्यांना आश्चर्य वाटेल की ज्यांच्या बोलण्यात देवधर्माचाच विषय आहे त्यांची पुस्तकं, त्यांचे चित्रपट, त्यांची गाणी यात इतकी लैंगिकता का भरून आहे? ते तर म्हणाले की, जेव्हा जेव्हा देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया मला भेटत तेव्हा त्या देवाधर्माबद्दल आंतरिक कळकळीनं प्रश्न करीत, पण जेव्हा कुणी बाबाबुवा भेटत तेव्हा लैंगिकतेवर मात कशी करायची, हेच ते खाजगीत विचारत!
हृदयेंद्र – पण जो प्रामाणिकपणे साधना करतो त्याच्या मनात वासनेतून सुटका कशी करायची, हा प्रश्न आल्याशिवाय राहात नाही.. आणि आपल्या पापाच्या अनेक कल्पना या वासनेशीच चिकटून आहेत..
कर्मेद्र – पण मला वाटतं दादा, माणसाला मनातून पापाचीच आवड असते, पण तो पाप करायला घाबरतो.. याचं कारण त्याला पापाचा तिटकारा असतो, असं नाही तर त्या पापाचे जे परिणाम भोगावे लागतील, त्यांना तो घाबरतो.. अशी दांभिकता खोलवर असल्यामुळे माणसं ‘पाप’ करत नाहीतच, पण ‘पुण्य’ही ती आनंदानं करीत नाहीत! त्यांच्या मनात म्हणूनच सतत खंतच असते आणि ‘पापी’ माणसांच्या प्रगतीबद्दल जळफळाट असतो!

अचलदादा – पण हाच आंतरिक संघर्षसुद्धा माणसाला खूप काही शिकवतोच ना? आपल्या जगण्याचं उद्दिष्ट काय आहे, हे तपासायला लावतोच ना? मनातला हा संघर्ष, हे द्वंद्व सतत आरसा बनून आपलं खरं रूप दाखवत असतं.. आपण बोलतो काय आणि मनात खदखदतं काय, हे जाणवून देतं.. अशा मनातही जर भगवंताचं खरं स्मरण चालू झालं, खरा नामाभ्यास सुरू झाला.. खरा साधनाभ्यास सुरू झाला, तर मनाला आपल्यातलं खरं दैन्य जाणवेल.. आपल्या खऱ्या क्षुद्र मनोवृत्तीची त्याला खंत वाटू लागेल.. यातून सुटण्याची तळमळ वाटू लागेल.. जगण्यातली दांभिकता कमी होऊ लागेल.. सहजसाधं सोपं जगणं जमू लागेल..
बुवा – तेव्हा खरी साधना आणि खरा अभ्यास सुरू झाला की त्रिगुणांचा प्रभाव ओसरत जाईल.. अशा मनालाच ‘पाप ताप नयनीं न पडेचि’ हा अनुभव येईल.. या साधनसिद्ध स्थितीतच वर्णन करताना चोखोबा म्हणतात, वेदाचा अनुभव शास्त्राचा अनुवाद। नामचि गोविंद एक पुरे!!
चैतन्य प्रेम