scorecardresearch

Premium

साक्षर-मात्र उपयोक्त्यांकरिता…

भारतात आज अन्योन्यसक्रिय वस्तूंचे अनेक नवे उपयोक्ते होऊ घातले आहेत.

साक्षर-मात्र उपयोक्त्यांकरिता…

भारतात आज अन्योन्यसक्रिय वस्तूंचे अनेक नवे उपयोक्ते होऊ घातले आहेत.त्यांच्याकरिता अभिकल्प कसा करायचा हे शोधण्यासाठी केलेल्या प्रयोगाविषयी..

पूर्वी अन्योन्यसक्रिय (इंटरॅक्टिव्ह) वस्तूंचे अगदी मोजकेच उपयोक्ते असत. त्यांचा वापर शहरांत राहणाऱ्या, सुशिक्षित, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या काही लोकांपर्यंतच मर्यादित असे. मात्र गेल्या काही वर्षांत अन्योन्यसक्रिय तंत्रज्ञानाचा प्रसार झपाटय़ाने झाला. त्यांचा वापर लहानांपासून थोरांपर्यंत, शहरांपासून खेडय़ांपर्यंत, घरापासून शाळांपर्यंत होऊ लागला. जुल २००६ मध्ये जगात १०५ कोटी लोक इंटरनेटचे उपयोक्ते होते. आज जगात ३४२ कोटी लोक इंटरनेट वापरतात. या दहा वर्षांत मिनिटाला ४८० नवीन लोक या अफाट गतीने इंटरनेटचा उपयोग वाढला.

abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
donald trump
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?
farah khan reacts to troll who criticised her
“गणपतीसमोर चपला घालू नकोस…”, ट्रोलरच्या कमेंटला उत्तर देत फराह खान म्हणाली…

ही प्रक्रिया प्रगत देशातच नव्हे तर भारतासारख्या विकसनशील देशातदेखील पाहायला मिळते. सोबतच्या आलेखात १९९१ ते २०१६ दरम्यान भारताची लोकसंख्या, मोबाइल फोनची संख्या, लॅण्डलाइनची संख्या, भारतातील अनुमानित इंटरनेट उपयोक्ते आणि भारतात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनची अनुमानित संख्या दर्शवलेल्या आहेत. २००५ ते २०१५ या काळात भारतातील मोबाइल फोनची संख्या १० कोटींपासून वाढून १०० कोटींच्या पुढे गेली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजाचे अनेक थर लीलया कापत अन्योन्यसक्रिय तंत्रज्ञान सर्व लोकांपर्यंत पोहोचत आहे.  वर दिलेल्या आलेखात पदवीधरांपासून निरक्षरांपर्यंत भारतातील शिक्षणाचे विविध थर दर्शवलेले आहेत. आज आपली मोबाइल फोनची संख्या साक्षर लोकांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनची सुद्धा तशीच वाढ होत जाईल असं अनुमान आहे.

दहावी किंवा त्यापेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या उपयोक्त्यांना अन्योन्यसक्रिय वस्तूंचे ‘उदयोन्मुख उपयोक्ते’ मानतात. ढोबळमानाने शिक्षणाच्या आधारावर आम्ही या उपयोक्त्यांचे तीन गट बनवले आहेत – ‘किमान-इंग्रजी-साक्षर’ (पाचवी ते दहावी शिक्षण घेतलेले), ‘साक्षर-मात्र’ (पहिली ते चौथी शिक्षण घेतलेले) आणि ‘निरक्षर’. आमच्या अनुभवानुसार, अभिकल्पात यातील प्रत्येक गटासाठी थोडा वेगळा दृष्टिकोन असावा लागतो.

भारतात अंदाजे २५ टक्के लोकसंख्या किमान-इंग्रजी-साक्षर या गटात मोडते. मागील लेखांत या उपयोक्त्यांच्या दोन मुख्य गरजांबद्दल चर्चा केली आहे – स्वरचक्र कीबोर्डद्वारे भारतीय भाषांत टंकलेखन (लोकसत्ता, ४ जून) आणि अन्योन्यसक्रिय वस्तूंचे स्थानिकीकरण (लोकसत्ता, ९ एप्रिल). याव्यतिरिक्त अनेक गोष्टी या उपयोक्त्यांना साध्य करण्याजोग्या आहेत. ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी जसे ई-मेल, मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा गुगल डॉक्ससारखे कार्यक्षमतावर्धक अनुप्रयोग (प्रॉडक्टिव्हिटी अ‍ॅप) असतात, तसेच दुकानात काम करणाऱ्यांसाठी, सुतार, िशपी, स्वयंपाकी, इलेक्ट्रिशियन इत्यादी कारागिरांसाठी, बसवाहकांसाठी, ट्रकचालकांसाठी विशेष अनुप्रयोग असू शकतात. शिवाय भाषा, कला, कौशल्य इत्यादी शिकण्यासाठी अनुप्रयोग बनू शकतात. पुढील एक-दोन वर्षांत हे किंवा तत्सम अनुप्रयोग दिसू लागतील अशी आमची अटकळ आहे.

भारतातील २७ टक्के लोक हे साक्षर-मात्र आहेत. या गटात अन्योन्यसक्रिय वस्तूंचा, विशेषकरून मोबाइल फोनचा प्रसार झपाटय़ाने झाला असला तरी त्यांच्याकरिता अन्योन्यसक्रिय वस्तूंचा अभिकल्प कसा असावा हे पूर्णपणे स्पष्ट नाही. पारंपरिक उपयोक्त्यांपेक्षा या नवीन उपयोक्त्यांच्या गरजा, त्यांच्या मर्यादा वेगळ्या आहेत. त्यांच्यासाठी अभिकल्प कसा असावा, हे शोधण्यासाठी आम्ही काही प्रयोग केले. त्यातील एका छोटय़ा प्रयोगाचा सारांश देत आहे.

२००९च्या सुमारास साक्षर-मात्र गटात मोबाइल फोनचा उपयोग सुरू झाला. तेव्हा महाराष्ट्रातील काही छोटय़ा गावांत आम्ही या गटाची पाहणी केली. आम्हाला असे आढळले की मोबाइल फोन असला तरी हे लोक अजून फोनची ‘डायरी’ बाळगत. तिच्यात ४० ते ८० फोन नंबर लिहिलेले असत. नावे नेहमी सुवाच्य अक्षरात मराठीत लिहिलेली असत. नंबर कधी इंग्रजीत तर कधी मराठीत लिहिलेले असत. डायरीत इंग्रजी अक्षरांचे ‘टॅब’ असले तरी त्यांचा सहसा उपयोग केला जात नसे. मग हे लोक नंबर कसा शोधत? तर डायरीत प्रत्येक नावाची जागा त्यांच्या लक्षात असे. नंबर सहसा गटागटाने लिहिलेले असत. म्हणजे पुण्याच्या लोकांचे नंबर एकत्र, मुंबईचे एकत्र इत्यादी. नंबर बदलला तरी जागा बदलत नसे. आहे त्याच ठिकाणी जुना नंबर खोडून नवा लिहिला जाई. शिवाय एक गोष्ट आम्हाला प्रकर्षांने जाणवली की साक्षर-मात्र असले तरी त्यांना आपल्या साक्षरतेबद्दल अभिमान होता. आपण निरक्षर नाही, हे ते आवर्जून सांगत. अडखळत का होईना, डायरीत लिहिलेली नावे वाचून दाखवत.

असे असले तरी अनेकांच्या फोनमध्ये मात्र ‘कॉण्टॅक्ट सेव्ह’ केलेले नसत. असले तरी फार तर १०-१५ असत. ते अनेकदा ‘अ१’ ‘इ२’ अशा ‘सांकेतिक’ भाषेत लिहिलेले असत. फोनमध्ये मराठीत लिहिणे शक्य असूनदेखील ते हमखास इंग्रजीत लिहिलेले असत. ते बहुधा कुणाकडून तरी ‘सेव्ह’ करून घेतलेले असत. नंबर बदलला, की परत मिनतवारी करून तो कुणाकडून तरी बदलून घ्यावा लागे. काहींना फोन करायलादेखील मदत लागत असे. याचे कारण त्यांना इंग्रजी अल्फाबेटिकल क्रम लक्षातच राहात नसे. त्यापेक्षा काहींना आपल्या डायरीत बघून नंबर स्वत: टाइप करणे सोपे जाई.

या पाहणीनंतर आम्ही ‘रंगोली’ नावाचा एक फोनवरील अनुप्रयोग बनवला. रंगोली ही रंग आणि चित्राची एक ‘डायरी’ होती. डायरी उघडली, की त्यात नऊ पाने दिसत. प्रत्येक पान वेगळ्या रंगाचे. प्रत्येक पानावर एका गटाचे नंबर साठवलेले असत. उदाहरणार्थ, लाल पानावर घरच्या लोकांचे नंबर, पिवळ्या आणि केशरी पानांवर नातेवाईक इत्यादी. प्रत्येक पान १ ते ९ पकी एका क्रमांकाशी निगडित होते. पान उघडण्यासाठी त्या रंगाचा क्रमांक कीपॅडवर दाबायचा. पान उघडले की त्यावर नऊ चित्रे दिसत. प्रत्येक फोन नंबरसाठी एक चित्र असे. चित्रदेखील एका क्रमांकाशी निगडित असे. रंग आणि चित्र यांच्या संयोजनाने कीपॅडवरील फक्त दोन बटणे दाबून डायरीतील एक नाव निवडता येत असे. रंग आणि चित्र नेहमी त्याच जागेवर, त्याच क्रमांकाशी निगडित राहात. शिवाय चित्रासमोर नाव असेच, पण ते फक्त वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी नव्हे. त्यामुळे नाव वाचायची सवय राहात असे. काही दिवसांनी नेहमी फोन करावा लागणाऱ्या व्यक्तींचे दोन क्रमांक लक्षात राहू लागत व त्यांची जोगा, रंग किंवा चित्र पाहायची गरज उरत नसे. आम्ही रंगोली आणि त्या वेळी उपलब्ध असलेली अल्फाबेटिकल कॉण्टॅक्ट बुक यांची सापेक्ष वापरयोग्यता चाचणी घेतली. त्यात असे आढळले की सर्व उपयोक्ते नेहेमीच्या कॉण्टॅक्ट बुकपेक्षा रंगोलीवर जास्त लवकर नावे शोधू शकत. साक्षरता जितकी कमी, तितकी रंगोलीची वापरयोग्यता जास्त जाणवत असे.

ही होती २००९ सालची गोष्ट. रंगोली केवळ एक प्रायोगिक अनुप्रयोग होता. प्रयोगशाळेतील चाचणीत काही तत्त्वे सिद्ध करणे हे त्या प्रयोगामागचे उद्दिष्ट होते. पुढील २-३ वर्षांत स्मार्टफोन या उपयोक्ता गटाला परवडण्याजोग्या किमतीला मिळू लागतील. मात्र पण त्या स्मार्टफोनवरील अनुप्रयोग वापरयोग्य बनवण्यासाठी वेगळाच अभिकाल्पिक दृष्टिकोन ठेवावा लागेल. आजपासून कामाला सुरुवात केली, तर पुढील २-३ वर्षांत साक्षर-मात्र उपयोक्त्यांसाठी खास स्मार्टफोन बनवणे शक्य आहे. आणि निरक्षर उपयोक्त्यांचं काय? त्यावर नंतर स्वतंत्र लेख लिहीत आहे.

 

अनिरुद्ध जोशी
 anirudha@iitb.ac.in

( लेखक आयआयटी मुंबई येथील ‘औद्य्ोगिक अभिकल्प केंद्र’ (आयडीसी- इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) येथे  प्राध्यापक आहेत. )

 

 

 

 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अभिकल्प बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-07-2016 at 03:08 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×