खेळ खेळण्यास मजा येते हे खरं, पण नवीन खेळ अभिकल्पित करणं तितकंच कठीण आहे. बहुतेक खेळांत सामग्री फार महत्त्वाची नसते- बुद्धिबळ चिंचोक्यांनीदेखील खेळता येतो. खेळाची अभिकल्पना खेळाडूंना आवडेल का, हे महत्त्वाचे..
मागील लेखात आपण अभिकल्प (डिझाइन) हे फक्त उत्पादित वस्तूंपर्यंत मर्यादित नसून, जीवनाच्या विविध अंगांमध्ये महत्त्वाचे ठरत आहे हे पाहिले. या लेखामध्ये अभिकल्पाच्या एका विशिष्ट क्षेत्राकडे बारकाईने बघू या.
कल्पना करा, एक मोठं रिंगण आहे. रिंगणाभोवती हजारो प्रेक्षक उपस्थित आहेत. आरडाओरडा करत आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूसाठी टाळ्या वाजवत आहेत. या सगळ्या उल्हसित वातावरणात रिंगणामध्ये दोन स्पर्धक साप-शिडी खेळत आहेत. कल्पना फारच विचित्र वाटते ना? मनाला पटतच नाही. याचं कारण काय आहे? तसं पाहिलं तर साप-शिडी हा लहान मुलांचा आवडता खेळ. हा खेळ आपण सगळे एका वयापर्यंत खेळतो. मग वय वाढल्यावर हा खेळ खेळणं आपण का सोडून देतो? जगात विश्व साप-शिडी अजिंक्यपद स्पर्धा का होत नाहीत? बुद्धिबळपटूसारखीच साप-शिडीपटू अशी पदवी का नाही? खरं सांगायचं तर खेळ अभिकल्पक साप-शिडीला अस्सल खेळ मानत नाहीत! या लेखामध्ये खेळ म्हणजे काय, खेळांच्या अभिकल्पामध्ये कोणते घटक वापरले जातात व खेळांमध्ये नुसती मौजमजाच असते की आणखी काही, याची चर्चा करू.
खेळ खेळताना लोक आपलं सर्व देहभान विसरून जातात. प्रवासी रेल्वेच्या डब्यातील गर्दीतदेखील दाटीवाटीने बसून पत्ते खेळण्यात रमतात. एवढय़ा गडबड गोंधळात व गैरसोयीतसुद्धा खेळात रमणे का शक्य होते? खेळांमध्ये सर्वानाच भुरळ पडेल असे काय दडले आहे? त्याबद्दल एवढे विलक्षण आकर्षण का? काही खेळच का लोकप्रिय होतात? खेळ अभिकल्पक या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधत असतात.
खेळ अभिकल्प हा एक व्यवसाय आहे, त्यावर संशोधन होते व शैक्षणिक संस्थांमध्ये खेळ अभिकल्पाचा पाठय़क्रम आहे, हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल. खेळ विकसित करताना अभिकल्पक एक आगळेवेगळे कृत्रिम विश्व तयार करतात. गंमत अशी आहे की सर्व खेळाडू स्वेच्छेने त्या विश्वात प्रवेश करतात. अभिकल्पक या विश्वाचे स्वतंत्र नियम तयार करतात व खेळाडू तक्रार न करता त्यांचा स्वीकार करतात. बुद्धिबळाचं उदाहरण घेतलं तर, ‘घोडा अडीच घरंच का चालतो? तीसुद्धा वाकडी!’, ‘उंट तिरपाच व हत्ती सरळच का चालतो?’ असे प्रश्न कुठलाही खेळाडू विचारत नाही.
प्रत्येक खेळात चार मूळ घटक असतात- यातील सर्वप्रथम घटक म्हणजे कौशल्य. क्रिकेटमधील फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण, कॅरममध्ये सोंगटय़ांवर अचूकपणे नेम मारून त्या जिंकणे हे कौशल्याचे भाग झाले. खेळाडू जितका जास्त खेळेल, सराव करेल, अभ्यास करेल, तितकेच त्याचे खेळकौशल्य वाढत जाते व त्यास नैपुण्य प्राप्त होत जाते.
दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे डावपेच. आपले व विरोधकाचे कौशल्य ओळखून, चालू स्थितीचे विश्लेषण करून, भविष्यकाळाचा अंदाज घेऊन त्याअनुरूप निर्णय घेणे म्हणजे डावपेच. क्रिकेटमध्ये खेळपट्टी, खेळाची स्थिती आणि फलंदाज यांच्या अनुसार गोलंदाज निवडणे व क्षेत्ररक्षण मांडणे हे झाले डावपेचाचे उदाहरण. दोन तुल्यबळ संघांमधल्या सामन्यात कौशल्य जवळजवळ समान असते. तरी योग्य डावपेच आखणारा कर्णधारच सामने जिंकून जातो. बुद्धिबळात पटावरील स्थितीचे विश्लेषण करता येणे, प्रतिस्पध्र्याच्या पुढच्या खेळ्यांचा अंदाज बांधणे हेदेखील डावपेचाचेच भाग. नावीन्यपूर्ण डावपेचांमुळे सामने मनोरंजक होत जातात. एका खेळाडूने केलेल्या चालीचा दुसऱ्या खेळाडूवर परिणाम होतो. दुसरा खेळाडू प्रतिस्पध्र्याच्या डावपेचास प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करीत राहतो. कुणाला दुखापत न करणारे हे एक द्वंद्वयुद्ध चालू राहते. कोण काय खेळी करेल सांगता येत नाही. या अनिश्चिततेमुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढते व सामना मनोरंजक होतो.
तिसरा घटक ज्ञान व स्मरणशक्ती. पत्ते खेळताना कोणाकडे कोणते पत्ते होते व किती हात कोणत्या पत्त्यांमध्ये होऊन गेले, हे लक्षात ठेवून खेळणे हा झाला स्मरणशक्तीचा भाग. बुद्धिबळात नेहमी वापरल्या जाणाऱ्या सुरुवातीच्या चालींचे संच माहीत असणं हा झाला ज्ञानाच भाग. भेंडय़ा लावताना ‘ह’ अक्षरावरून सुरू होणारी हिंदी गाणी माहीत असणारा खेळाडूच जिंकू शकतो. चौथा घटक म्हणजे नशीब. खेळामध्ये काही गोष्टी मुद्दाम यादृच्छिक (रँडम) राखलेल्या असतात. क्रिकेटमधील नाणेफेक, बुद्धिबळातील पांढऱ्या किंवा काळ्या सोंगटय़ा मिळणे, फाशावरती येणारे दान इत्यादी. खेळताना अनिश्चितता शाबूत ठेवणं महत्त्वाचं. प्रत्येक खेळीला जास्त पर्याय उपलब्ध असले तर अनिश्चितता वाढते. त्यामुळे खेळाला वेळोवेळी नवीनच कलाटण्या मिळत जातात व खेळ रोचक होतो.
प्रत्येक खेळात हे चार घटक आढळून येतात. काही खेळांमध्ये काही घटक जास्त महत्त्वाचे असतात. कुठे कौशल्याला जास्त महत्त्व असते तर कुठे डावपेचाला. जेव्हा अभिकल्पक नवीन खेळ बनवत असतात तेव्हा ते या चार घटकांचे प्रमाण, त्यांचा क्रम व संतुलन ठरवत असतात. त्यामुळे त्या खेळाचा वेग व अनिश्चितता स्थापित केल्या जातात. असं असल्यानेच खेळ लोकांना पुन:पुन्हा खेळायला आवडतात.
आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की या चार घटकांमुळे खेळ विशेषज्ज्ञ साप-शिडीला अस्सल खेळ का मानत नाहीत ते. साप-शिडी हा शंभर टक्के नशिबाचा खेळ आहे. साप-शिडी खेळायला कुठल्याच प्रकारचे कौशल्य, ज्ञान, स्मरणशक्ती किंवा डावपेच लागत नाहीत. साप-शिडीत एक खेळाडू कितीही पुढे गेला तरी त्याला थांबवण्यासाठी दुसरा खेळाडू काहीही करू शकत नाही. संपूर्णपणे यादृच्छिक (रँडम) असल्यामुळे कोणीही कधीही जिंकू किंवा हारू शकतो. असं असल्याने लहान मुलांना हा खेळ आवडतो, कारण मोठय़ांबरोबर खेळतानादेखील त्यांची जिंकण्याची शक्यता समानच असते. मोठय़ांना आपल्या मोठेपणाचा, अनुभवाचा काहीच फायदा होत नाही. म्हणूनच साप-शिडीत प्रावीण्य प्राप्त करता येत नाही.
खेळ खेळण्यास मजा येते हे खरं, पण नवीन खेळ अभिकल्पित करणं तितकंच कठीण आहे. बहुतेक खेळांत सामग्री फार महत्त्वाची नसते- बुद्धिबळ चिंचोक्यांनीदेखील खेळता येतो. खेळाची अभिकल्पना खेळाडूंना आवडेल का, हे महत्त्वाचे. विशेषत: लहान मुलांसाठी खेळ बनवायचे असतील, तर त्याकरिता अभिकल्प प्रक्रियेत मुलांचा समावेश करणे गरजेचे आहे. अभिकल्पक आधी खेळाचे एक आदिरूप (प्रोटोटाइप) बनवतात. ते वापरून मुलांबरोबर चाचणी घेतात. मुलांच्या क्षमतेनुसार व त्यांनी बनवलेल्या डावपेचांनुसार खेळात उत्क्रांती करतात.
अभिकल्पकांच्या समोर आणखीन एक आव्हान म्हणजे नावीन्यपूर्ण खेळनाटय़ (गेमप्ले) तयार करणे. यात खेळाचे नियम, खेळाची सामग्री, नेपथ्य, लागणारे कौशल्य या सगळ्यांबरोबरच खेळाडूंच्या नाटय़पूर्ण कृतीही महत्त्वाच्या. झेल पकडल्यानंतर चेंडू उंच फेकणे, चॅलेंजमध्ये हात पत्त्यांवर जोरात आपटणे, बदामसातमध्ये दिलेली ‘वन पेज वॉर्निग’, रमीमध्ये शेवटचे पान उलटे टाकणे, खोखोमध्ये जोरात दिलेला खो या नाटय़ प्रदर्शनामुळे खेळ रोचक होतात.
खेळताना मजा करणे सोपे असते, पण सर्वासाठी मजा अभिकल्पित करणे तसे कठीणच असते. पण एकदा का नवीन खेळ अभिकल्पित करू शकलो की त्या खेळांतून इतर अनेक गोष्टीदेखील साध्य करू शकतो. उदाहरणार्थ, समजा मुलं विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल यांसारखे विषय खेळता खेळता शिकली तर? मुलांना तर आवडेलच, पण पालकही खूश होतील ना? असल्या हेतूपूर्ण खेळांबद्दल आपण पुन्हा कधीतरी बोलू या.
गिरीश दळवी, विजय बापट, उदय आठवणकर आणि अनिरुद्ध जोशी
girish.dalvi@iitb.ac.in
सर्व लेखक आयआयटी मुंबई येथील ‘औद्योगिक अभिकल्प केंद्रा’त (आयडीसी- इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.