निरक्षर उपयोक्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान वापरणे शक्य आहे. पण त्याकरिता सुयोग्य, साजेसे अनुप्रयोग अभिकल्पित करण्याची गरज आहे.

१९४७ साली भारतातील ८० टक्के म्हणजे ३२ कोटी लोक निरक्षर होते. २०११ सालच्या जनगणनेत भारतात २७ कोटी लोक निरक्षर होते. या अर्थी गेल्या सात दशकांत आपण भारतातली निरक्षरता म्हणावी तशी घटवू शकलो नाही. २०३० पर्यंत भारताचे ‘विकसनशील’ हे लेबल काढून ‘विकसित’ हे लेबल लावण्याची स्वप्ने आपण पाहतो, मात्र त्याआधी भारताला पूर्णपणे साक्षर बनवावे लागेल. यासाठी अन्योन्यक्रिया अभिकल्पाची (इंटरॅक्शन डिझाइनची) मदत घेणे शक्य आहे.

Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…
Apple CERT-In Security Alert Marathi News
लाखो iOS – Android युजर्सचा डेटा चोरी होण्याचा धोका! फोनमध्ये ‘हे’ बदल करून घ्यायचा CERT-In चा इशारा

मागील एका लेखात (लोकसत्ता, ३० जुलै) आपण पाहिले की, कमी शिक्षण असलेल्या उपयोक्त्यांना अन्योन्यक्रिया अभिकल्पाचे ‘उदयोन्मुख उपयोक्ते’ असे म्हणतात. शिक्षणाच्या आधारावर त्यांचे तीन ढोबळ गट करता येतात- विनाइंग्रजी साक्षर, साक्षर मात्र आणि निरक्षर. या लेखात निरक्षरांसाठी अन्योन्यक्रिया अभिकल्पाचे दोन प्रकल्प आपण पाहू.

मे २००९ ची गोष्ट. एके दिवशी अचानक जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीचे तीन शास्त्रज्ञ आम्हाला भेटायला आले. थोडा वेळ त्यांनी आमच्या गटाचे काम बघितले. मग त्यांनी विचारले की, एचआयव्हीची लागण झालेल्या लोकांच्या उपचारासाठी मोबाइल फोनचा वापर करता येणे शक्य आहे का? प्रश्न ऐकून प्रथम आम्ही विचारात पडलो- मोबाइल फोन उपचार कसा करू शकेल? पुढे आम्ही भारतातील तज्ज्ञ एचआयव्ही डॉक्टरांना भेटलो. एचआयव्ही व त्यावरचा उपचार समजून घेतला. अनेक एचआयव्हीग्रस्त लोकांशी बोललो. त्यांच्या समस्या समजण्याचा प्रयत्न केला.

एचआयव्ही विषाणू रक्त, वीर्य वगैरे संसर्गित शारीरिक द्रवपदार्थातून पसरतो. हा विषाणू स्वत: आपल्याला फारसा त्रास देत नाही. मात्र शरीराच्या एका रोगप्रतिकारक रक्तपेशीचा नाश करून तो झपाटय़ाने स्वत:च्या प्रती बनवतो. परिणामी रोगप्रतिकारकशक्ती कमी होते व अनेक संधिसाधू संसर्गजन्य रोग होऊ  शकतात. एचआयव्हीची दुसरी विशेष गोष्ट म्हणजे एकदा का लागण झाली की हा विषाणू त्या शरीरातून काढणे वैद्यकशास्त्राला अजून तरी शक्य नाही.

सध्या एचआयव्हीवरचा एकमेव उपचार म्हणजे त्या विषाणूची प्रती बनवण्याची गती कमी करणे. हे काम करणाऱ्या औषधांना अ‍ॅण्टीरेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) असे म्हणतात. विषाणूंच्या प्रती बनण्याच्या प्रक्रियेला विविध टप्प्यांवर रोखणारी अनेक औषधे विकसित करण्यात आली आहेत. मात्र काही काळाने त्यातील पहिल्या फळीची औषधे काम करेनाशी होऊ  शकतात किंवा असे म्हणू या की विषाणू त्या औषधांना जुमानत नाही व परत आपल्या प्रती बनवू लागतो. औषधे नियमितपणे, वेळेवर घेतली नाहीत, गोळ्या चुकवल्या किंवा काही दिवस औषधे घेऊन मग ती बंद केली, तर असे होण्याची शक्यता वाढते. पहिल्या फळीची औषधे लागू पडेनाशी झाली की दुसऱ्या फळीची औषधे घ्यावी लागतात. अशा एकंदर चार-पाच फळ्या सध्या उपलब्ध आहेत. तसे असले तरी प्रत्येक फळीबरोबर औषधांची किंमत वाढत जाते, औषधे जास्त गुंतागुंतीची होतात व आपले पर्याय कमी होत जातात. म्हणून एआरटीची पहिली फळीच एचआयव्हीग्रस्त व्यक्तीला उपचाराची सर्वोत्तम संधी देऊ  शकते व त्यावर त्यांनी जास्तीत जास्त काळ राहण्याचा प्रयत्न करावा, असे डॉक्टर मानतात.

तर या सगळ्यात मोबाइल फोन कुठे येतो? त्याचे असे आहे की, वर अगदी संक्षेपात दिलेली माहितीदेखील आपल्याला कदाचित गुंतागुंतीची वाटली असेल. पण या व असल्या अनेक गोष्टी एचआयव्हीग्रस्त व्यक्तीने समजून-उमजून घेतल्याशिवाय एआरटीच्या औषधांचा परिणाम व्यवस्थित होत नाही. किंबहुना एखादा असमंजस एचआयव्हीग्रस्त बेजबाबदारपणे ही औषधे घेत गेला तर तो ‘न जुमानणारे’ विषाणू पसरवू शकतो. अशाने समाजाला फक्त तोटाच होऊ  शकतो. म्हणूनच एआरटीची औषधे चालू करताना प्रत्येक व्यक्तीला समुपदेशन केले जाते. ते महत्त्वाचे आहेच. पण ते पुरेसे नाही. ते धबधब्याखाली उभे राहून पाणी पिण्यासारखे आहे. बहुतांश पाणी डोक्यावरून जाते. एचआयव्हीच्या उपचारात योग्य औषधाबरोबरच योग्य माहितीची जोड देणे आवश्यक आहे. ती माहिती सगळी एकदम न देता सातत्याने रोज थोडी थोडी द्यावी लागेल. उजळणी करून पक्की करावी लागेल. त्यासाठी मोबाइल फोन हे एक सुयोग्य साधन आहे.

या सर्व बाबी समजून घेऊन आम्ही टामा नावाचा एक अनुप्रयोग (अ‍ॅप्लिकेशन) अभिकल्पित केला. त्याची चार मुख्य कार्ये होती- लोकांना औषधाच्या वेळी आठवण करणे व त्यांनी घेतलेल्या औषधांची नोंद ठेवणे. गेल्या महिनाभरात किती औषधे घेतली याचा ‘स्कोअर’ त्यांना सांगणे व जर गोळ्या चुकल्या असतील तर त्याबद्दल त्यांना इशारा देणे. उपचाराबाबत व एचआयव्हीसोबत जगण्याबाबत रोज थोडी थोडी माहिती देणे आणि जर त्यांना बरे वाटत नसेल तर लक्षणे विचारून त्यावर उपाय सांगणे.

आम्ही इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स (आयव्हीआर) प्रणाली वापरून टामा उपयोक्त्यांपर्यंत पोहोचवायचे ठरवले. आपण जेव्हा मोबाइल कंपनीला किंवा बँकेला फोन करता, तेव्हा आपण असली आयव्हीआर प्रणाली वापरतो (त्यात अमुक करण्यासाठी एक दाबा, तमुक करण्यासाठी दोन दाबा असे मेनू असतात). सामान्यत: ग्राहकांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कंपन्या आयव्हीआर वापरतात. मात्र टामासारख्या वैयक्तिक अनुप्रयोगासाठी हे माध्यम अगदी क्वचितच वापरले जाते. आयव्हीआरचा मुख्य फायदा असा आहे की, ती कुठल्याही फोनवर चालते (अगदी लॅण्डलाइनवरसुद्धा). मात्र तिचा मुख्य तोटा हा की, अन्योन्यक्रियेच्या दृष्टीने ती वापरायला सोपी नाही. ती वापरयोग्य (यूजेबल) बनवणे हे एक मोठे आव्हान होते.

आणि टामाचा निरक्षरतेशी संबंध काय? तर एचआयव्ही विषाणू माणसांमध्ये भेदभाव करीत नाहीत. निरक्षर लोकांपासून पदवीधरांपर्यंत समाजाच्या सर्व थरांमध्ये ते पसरले आहेत. आम्ही अशिक्षित उपयोक्त्यांसोबत टामाच्या वापरयोग्यतेच्या चाचण्या केल्या. त्यातील एक किस्सा सांगावासा वाटतो. आधी टामात असा एक मेनू होता : ‘तुम्ही गोळी घेतली असेल तर एक दाबा. तुम्ही गोळी नंतर घेणार असाल तर दोन दाबा..’ गोळी घेतली असेल तेव्हा ‘एक’ दाबणे आमच्या सर्व उपयोक्त्यांना सहज जमले. मात्र जेव्हा आम्ही लोकांना सांगितले, ‘आता तुमची गोळ्या घायची वेळ झाली आहे, पण तुमच्या गोळ्या घरी आहेत. घरी जाऊन गोळ्या घ्यायला तुम्हाला एक तास तरी लागेल. आता तुम्ही काय कराल?’ त्या वेळी काही उपयोक्ते ‘दोन’ दाबेनात. मग आम्ही मेनूतले ते वाक्य बदलून, ‘तुम्ही आताचा डोस अजून घेतला नसेल, पण उशिरा घेणार असाल, तर दोन दाबा’ असे केले. या वेळेला सर्व उपयोक्त्यांना ते लगेच समजले आणि ते कार्य फत्ते झाले. अशा अनेक छोटय़ा-मोठय़ा प्रयोगांतून वापरयोग्यता सुधारत गेली. पुढे टामा एका क्लिनिकल ट्रायलमध्ये वापरली गेली व त्यामध्ये असे आढळून आले की, तिच्या मदतीने अनेक लोक आपल्या गोळ्या वेळेवर व न चुकता घेऊ  शकले.

हे झाले निरक्षर लोकांसाठी अनुप्रयोग बनवण्याबाबत. प्रत्यक्ष निरक्षरता कमी करायला अन्योन्यक्रिया अभिकल्प मदत करू शकते काय? हो तर. आमच्या काही विद्यार्थ्यांनी हे आव्हान पेलले आहे. जाता जाता त्यातील एकच उदाहरण सांगतो. रुचिका मित्तल नावाच्या एका विद्यार्थिनीने एक प्रयोग केला. तिची अशी संकल्पना होती की अक्षरे जर मूर्त (टँजिबल) बनली, तर ती जास्त खेळकर होतील व त्यामुळे प्रौढ निरक्षरांना शिकायला सोपी जातील. तिने काही मूर्त अक्षरे बनवली व ती प्रौढ साक्षरता वर्गात शिकणाऱ्या उपयोक्त्यांना हाताळायला दिली. हाताळताना त्यांनी बनवलेले शब्द कॅमेऱ्याद्वारे संगणकाने ओळखले, बोलून दाखवले व स्क्रीनवर त्यानुसार चित्रे दाखवली. उदाहरणार्थ, जर उपयोक्त्याने ‘काम’ असा शब्द बनवला तर कामाचे चित्र दाखवले, ‘कान’ असा शब्द बनवला तर कानाचे. प्रयोगाअंती तिने असे सिद्ध केले की, हा अभिकल्प वापरून उपयोक्ते अभ्यासात जास्त व्यग्र राहू लागले व त्यामुळे त्यांची प्रगती इतर विद्यार्थ्यांच्या मानाने जास्त झपाटय़ाने झाली.

माहिती तंत्रज्ञान स्वस्त होईल तसतसे ते नवनव्या कार्यासाठी वापरणे शक्य होत जाईल. त्याकरिता सुयोग्य, साजेसे अनुप्रयोग अभिकल्पित करण्याची गरज आहे. तसे केल्यानेच त्यांचा पुरेपूर लाभ उपयोक्त्यांपर्यंत पोहोचेल व त्यांच्या अनेक समस्या सोडवणे शक्य होईल.

 

अनिरुद्ध जोशी

anirudha@iitb.ac.in

लेखक आयआयटी मुंबई येथील औद्यगिक अभिकल्प केंद्र’ (आयडीसी- इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) येथे प्राध्यापक आहेत.