– अभय टिळक
अतिशय ढोबळपणे शब्द वापरण्याच्या सवयीमुळे असेल कदाचित, पण ‘अवधान’ हा विलक्षण अर्थगर्भ असा शब्द होय, हे वास्तव भिडतच नाही आपल्या मनाला. ‘अनुसंधान’, ‘ध्यान’, ‘जागृती’, ‘एकाग्रता’ असे अर्थांचे पदर लाभलेले आहेत ‘अवधान’ या शब्दाला. केवळ ‘ऐकणे’ या कृतीपेक्षा ‘अवधान’ ही संकल्पना आपल्याकडून अधिक कशाची तरी मागणी करते, या एका बाबीचा उलगडा तरी या साऱ्या अर्थच्छटांवर नजर टाकल्यानंतर आपल्याला व्हावा. अर्थांतराचे हे सारे पदर एकजात निर्देश करतात ते ऐकण्याची कृती घडत असताना त्या वेळी अपेक्षित असलेल्या मनाच्या अवस्थेकडे. श्रवणाचा संबंध असतो श्रवणेंद्रियाशी, तर अवधानाचा अनुबंध आहे मनाशी. निव्वळ ‘मन:पूर्वक’ ऐकणेही इथे अभिप्रेत आणि पुरेसे नाही. इथे अपेक्षा आहे ती ‘मनासहित’ ऐकण्याची! उभी उमर कृष्णमूर्तींनी आग्रह धरला याच एका गोष्टीचा. व्याख्यान ‘ऐकण्या’साठी गर्दी करणाऱ्या श्रोत्यांकडून कृष्णमूर्ती अव्याहत मागणी करत राहिले अवधानाची. याबाबतीत कृष्णमूर्ती पुरेपूर वारसा चालवितात तो ज्ञानदेवांचा! ‘अवधान’ हा ज्ञानदेवांचा अत्यंत आवडता शब्द. ‘ज्ञानेश्वरी’मध्ये ज्ञानदेवांनी हा शब्द अनंत ठिकाणी वापरलेला आहे. मी जे काही तुम्हाला सांगतो आहे त्याच्याकडे निखळ अवधान दिलेत, तर तुम्हाला सुखानंदाची प्राप्ती झाल्याखेरीज राहणार नाही, असे वचनपत्र म्हणा अथवा हमीपत्र तुम्हाला मी लेखी देतो, इतक्या आत्मविश्वासपूर्ण भाषेत ज्ञानदेव बोलतात नवव्या अध्यायातील पहिल्याच ओवीत. ‘‘तरि अवधान एकलें देइजे। मग सर्वसुखांसि पात्र होइजे। हें प्रतिज्ञोत्तर माझें। उघड आइकां।।’’ ही ज्ञानदेवांची या संदर्भातील ओवी बहुतेकांच्या परिचयाची असते. इथे ज्ञानदेवांनी पुन्हा एक गंमत केलेली आहे. श्रोत्यांकडून त्यांना अपेक्षा आहे, ती साध्या अवधानाची नव्हे तर एकल्या अवधानाची! या ठिकाणी ‘एकले’ हा शब्द जो ज्ञानदेवांनी जाणीवपूर्वक उपयोजिलेला आहे, त्यात ठासून भरलेली अर्थवत्ता उलगडण्यासाठी आपल्याला हात धरावा लागतो कृष्णमूर्तींचा. ‘अवधान’ असा सुटा शब्द कधीच वापरत नसत कृष्णमूर्ती. त्याला ‘आवडनिवडरहित’ असे विशेषण कायम जोडणे, यात कृष्णमूर्तींच्या कथनाचे अवघे आगळेपण सामावलेले आहे. एका विलक्षण सूक्ष्म अशा मानसिक प्रक्रियेकडे कृष्णमूर्ती ‘अवधान’ या क्रियेला ‘आवडनिवडरहित’ हे विशेषण जोडून आपले लक्ष वेधतात. कोणतेही भाषण असो, व्याख्यान असो अथवा शाळा-महाविद्यालयातील अभ्यासाचा वर्ग असो; वक्त्याचे विवरण चालू असताना त्याकडे आपले विशुद्ध लक्ष बहुतेकदा नसतेच, असा दावा कृष्णमूर्ती करतात. प्रतिपाद्य विषयासंदर्भात आपण त्याआधी जे काही वाचलेले अथवा ऐकलेले असेल त्याचे स्मृतिजन्य संस्कार आपल्या मनबुद्धीवर दृढ झालेले असतात. कानावर जे पडत असते ते स्मृतींमध्ये संचित झालेल्या माहितीच्या साठ्याशी ताडून बघण्याची, तुलना करण्याची प्रक्रिया आपल्या अबोध मनामध्ये अविरत चालू असते, असे कृष्णमूर्तींचे प्रतिपादन. पूर्वसंचित ज्ञानाशी त्या क्षणी कानावर पडणारे जेवढे काही सुसंवादी असते तेवढेच अंत:करणात झिरपते आणि विसंवादी असणारा अंश अबोध मन विसर्जित करून टाकते. या झटापटीपासून अस्पर्शित राहिलेले अथवा राहणारे अवधान म्हणजेच ‘एकलें’ अवधान. हे साधले तर वर्गातील आपली उपस्थिती कारणी लागेल!
agtilak@gmail.com
