– अभय टिळक agtilak@gmail.com
दृश्य जगामधील एकमयता जाणणे आणि तिच्या मुळाशी असणाऱ्या अद्वयबोधाचे दर्शन शब्दरूपाद्वारे साकारणे ही भागवतधर्मी संतपरंपरेची खासियत होय. एकच एक तत्त्व अनंत नामरूपवेष धारण करून व्यक्त होत असते, हे अद्वयदर्शनाचे प्राणसूत्र. त्यामुळे आराध्य दैवताच्या व्यक्ताव्यक्त रूपाचे आकलन-अवगाहनही त्याला अनुसरत करण्याचा संकेत निवृत्तिनाथांपासून ते निळोबारायांपर्यंत संतमालिकेने जपलेला दिसतो. गणरायाच्या रूपगुणांद्वारे ज्ञानदेवांना, पांडुरंगाच्या माध्यमातून नामदेवरायांना आणि गणेशनमनाद्वारे नाथांना अद्वयानंदाचीच अनुभूती येत राहते, यांमागील रहस्य हेच. अनाम, अरूप, अनाख्येय आदितत्त्व शब्दांमध्ये आकळताच येत नाही. त्या स्थितीमध्ये स्वत:ची अनुभूती ते तत्त्व निखळ स्वयंप्रेरणेने बाह्य़ पदार्थाच्या मदतीखेरीज घेत असते म्हणूनच आदिबीजाच्या त्या रूपावस्थेचे वर्णन ‘स्वसंवेद्य’ करणे भाग पडते. परमशिवाच्या त्या रंगरूपातीत अवस्थेचे विवरण करण्यासाठी, शैवागमाचे तत्त्वदर्शन, ‘विश्वोत्तीर्ण’ अशी संज्ञा योजते. तर, तशा त्या एकल स्थितीला विटून, आत्मप्रेरणेद्वारे तोच परमशिव नाना रंगरूपांनी प्रगटत इंद्रियगोचर बनतो तेव्हा त्याच्या त्या व्यक्त रूपाचे वर्णन शैवागमाचे तत्त्वचिंतन ‘विश्वात्मक’ अशा संज्ञेने करते. आदितत्त्वाचे असे प्रगट रूप शब्दाच्या माध्यमातून वर्णन करता येण्याजोगे असल्याने ते ‘वेदप्रतिपाद्य’, म्हणजे, वेदांना वर्णन करता येण्याजोगे, असे बनते. ॐकारस्वरूप गणनायक नेमका असाच ‘विश्वोत्तीर्ण’ (स्वसंवेद्य) आणि ‘विश्वात्मक’ (वेदप्रतिपाद्य) रूपांच्या माध्यमातून क्रीडा करतो, याचा स्पष्ट उच्चार ज्ञानदेवांनी केलेला आहे ‘ज्ञानेश्वरी’च्या प्रारंभी आत्मरूप गणेशाला वंदन करतेवेळी. याच भूमिकेवर आरूढ होत पांडुरंगाच्या दर्शनास सरसावलेले नामदेवराय ज्ञान सत्य मुक्त शुद्ध बुद्ध युक्त कारणरहित निरंजन । तें आह्मीं देखिलें चर्मचक्षु दृष्टीं उभा वाळवंटी पंढरीये अशा शब्दांत विठ्ठलाच्या विश्वोत्तीर्ण, विश्वात्मक अवस्थारूपांकडे निर्देश करत परमशिव, गणाधीश गजवदन आणि श्रीविठ्ठल यांचे समरूपत्व अधोरेखित करतात. ‘एकनाथी भागवता’च्या निर्मितीसाठी सज्ज झालेले पैठणनिवासी नाथरायही नेमक्या याच अधिष्ठानावर आरूढ होऊन गणाधीशाला दंडवत घालतात तेव्हा या संतपरंपरेला एका धाग्यात ओवणाऱ्या अद्वयबोधाच्या सूत्राचे अधोरेखन होते. नमन श्री एकदंता । एकपणें तूंचि आतां । एकीं दाविसी अनेकता । परी एकात्मता न मोडे ही नाथांची ओवी या संदर्भात मननीय ठरते. एकमात्र गणेशतत्त्व, प्रसंगी, विविधतेने नटलेले विश्वात्मक रूप धारण करून विलसते आणि इच्छा होईल तेव्हा तो पसारा आवरत एकाकीपणे विश्वोत्तीर्ण अवस्थेमध्ये आपल्यातच रममाण होऊन राहते, हे विदित करणारे नाथराय गणाधीशाच्या गुणवर्णनाच्या निमित्ताने अद्वयतत्त्वाचाच उच्चार करतात, हे किती रमणीय आहे नाही ! पूर्णपणे निरुपाधिक अशा विश्वोत्तीर्ण अवस्थेमधून, स्वेच्छेने, उपाधीने विनटलेल्या विश्वात्मक अवस्थेमध्ये प्रगट व्हायचे आणि त्या स्थितीचा कंटाळा आला की, विश्वात्मक रूपाचा पसारा आवरत पुन्हा विश्वोत्तीर्ण रूपावस्थेमध्ये स्थित व्हायचे ही क्रीडा मनस्वीपणे करताना गणेशतत्त्व त्याचे आदिबीजस्वरूप अधिष्ठान मात्र अविचल, अढळ राखते या रहस्याकडे नाथराय लक्ष वेधतात. ‘चांगदेवपासष्टी’मधील दुसऱ्या ओवीमध्ये हेच तर सांगतात ज्ञानदेव.