अभय टिळक agtilak@gmail.com

माउली मुक्ताबाई म्हणजे भागवतधर्मी संतमंडळातील निर्विवाद असाधारण आणि लोकोत्तर असे विभूतिमत्व. त्यांतही मुक्ताईंचे ‘ताटीचे अभंग’ हे तर अ-लौकिक प्रबंधप्रकरण म्हणावयास हवे. या अभंग प्रकरणातील अखेरच्या अभंगाच्या अखेरच्या चरणातील पूर्वार्ध म्हणजे जीवसमाधी आणि पूर्णसमाधी या दोन अवस्थांचे संतुलित दर्शनच जणू. तुम्ही तरू नि विश्व तारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा असे कमालीच्या कळकळीने मुक्ताईंनी केलेले आवाहन, बहुधा त्या संतुलनापायीच, ज्ञानदेवांना थेट भिडले असावे. स्वत:चा उद्धार घडवून आणण्यासाठी जीवसमाधी एक वेळ अनिवार्य असेलही. त्यासाठी कोपीचे दार बंद करून घेणे कदाचित अपरिहार्य व समर्थनीयही ठरेल एक वेळ. परंतु, स्वत: तरून जात असतानाच जगातील यच्चयावत जीवमात्रांचे तारणहार बनून त्यांच्या कल्याणोद्धाराची जबाबदारीदेखील आपल्या खांद्यावर असल्याची जाणीव ठेवून जीवसमाधीचा मोह सोडत, ज्ञानदेवा, पूर्णसमाधीमध्ये प्रवेश करणे हे तुमचे कर्तव्य ठरते असेच जणू मुक्ताई निर्वाणीच्या शब्दांत बजावतात ज्ञानदेवांना. हे उत्तरदायित्व पार पाडत असतानाच, ‘जडजीवांना तारण्याचे महत्कार्य मी करतो आहे’, या उपाधीचा विटाळ संतयोग्याने आपल्या अंत:करणाला तिळमात्रही होऊ द्यायचा नाही, ही तर त्यांहीपुढील दुर्धर बाब. मी करितो सत्कर्माचरण। हा त्यासी नुरे अभिमान। हिंडता फिरता पूर्ण। समाधी त्याची मोडेना अशी त्या संतयोग्याची ती परिणत अवस्था शब्दबद्ध करतात श्रीधरस्वामी त्यांच्या ‘वेदान्तसूर्य’ या प्रबंधात. स्वत:ला आंतरिक प्रचीती आलेल्या बोधाचे दान विश्वाला मुक्तपणे प्रदान करत प्रबोधनामध्येच जीवन व्यतीत करणे, हा अशा चालत्या-बोलत्या समाधिस्थाचा मग बनतो स्व-भाव. समाजप्रबोधकाच्या हृदयात सदैव तेवणारी लोकोद्धाराची ऊर्मी, लोकव्यवहारात ठायी ठायी अनुभवास येणाऱ्या विकर्मांपायी अणुमात्रही निस्तेज होत नसते. ‘विकारयुक्त विपरित कर्म’ हा  ‘विकर्म’ या संज्ञेचा नाथांना अभिप्रेत अर्थ होय. कायावाचामनाने साकारतात ती होत सर्वसाधारण कर्मे. तर, तेच कर्म विकारग्रस्त बनले की त्याचे रूपांतर घडून येते ‘विकर्मा’मध्ये अशी सोपी उपपत्ती कर्म सर्वसाधारण। तेंचि विकारातें पावलें जाण। उठिले विधिनिषेध दारूण। ‘विकर्म’ जाण तें म्हणिपें अशा निर्मळ शब्दशैलीद्वारे सिद्ध करतात नाथराय. लोकव्यवहारातील अशी विकर्मे पावन करून त्यांचे अवस्थांतर सत्कर्मांमध्ये घडवून आणण्याचे सामर्थ्य नांदत असते संतयोग्यांच्या ठायी, असे प्रतिपादन आहे मुक्ताईंचे. ‘पवित्र’ आणि ‘पवित्र करणारा’ असे ‘पावन’ या शब्दाला अर्थांचे दोन पदर आहेत. योगी स्वत: पावन असतो आणि तो भवतालही पावन बनवतो, हेच सुचवितात मुक्ताबाई. चालती बोलती समाधी अंतर्यामी जपत असतानाच, बाह्य़ जगतातील विकर्मांचा मळ स्वच्छ करण्यासाठी जाणीवपूर्वक कार्यरत बनणाऱ्या संतयोग्याच्या लेखी जगदोद्धाराचे ते अंगीकृत कार्य म्हणजे सुखाचे जणू कल्लोळच होत, अशी निरपवाद साक्ष आहे नाथांची. भूतांचे सकळ मळ। ज्याचे दृष्टीं होती निर्मळ। ते समाधि सुखकल्लोळ। येर समूळ भूतादिभाव हे त्यांचे उद्गार थेट निर्देश करतात त्याच समाधिरहस्याकडे. ‘कल्लोळ’ म्हणजे समुद्राची लाट अथवा लाटा. मग तया सुखा अंत नाहीं पार। आनंदें सागर हेलावती ही तुकोबांची आत्मप्रचीती नाथांशी असलेले त्यांचे आंतरिक नातेच नाही का करत अधोरेखित!