– अभय टिळक agtilak@gmail.com
भारंभार माहिती आणि अव्वल शब्दज्ञान पदरी असूनही भागत नसते. त्याचे अंतरंग नेमकेपणाने आकळण्यासाठी निकड असते ती तारतम्याची. त्याचाच अभाव असल्यास सारेच हुकते. ‘जीवसमाधी’ आणि ‘पूर्णसमाधी’ या नाथरायांनी प्रवर्तित केलेल्या दोन संज्ञांचे मर्म अचूक आकलन होण्यासाठी गरज आहे ती तशा प्रौढ तारतम्याचीच. जीवसमाधी व पूर्णसमाधी या दोहोंमध्ये विलक्षण तलम आंतरिक नाते नांदते. विशुद्ध जीवसमाधी ही ठरते पूर्णसमाधीची अनिवार्य अशी पूर्वअट. हा क्रम म्हणूनच, कमालीच्या नितळ अंतर्दृष्टीने समजावून घ्यावयास हवा. तुकोबांचा अवघा जीवनक्रम हा त्यादृष्टीने आदर्श. किंबहुना, परिपक्व जीवसमाधिवस्था व परिणत पूर्णसमाधी यांचा रम्य संगम म्हणजे तुकोबांचे जीवनचरित्र. कळीचे रूपांतर फुलात घडून येते त्याच न्यायाने, एकांती जीवसमाधी समरसून अनुभवलेल्या योग्याचे अवस्थांतर पूर्णसमाधीची अनुभूती लोकांतामध्ये घेणाऱ्या संतामध्ये घडून येणे अपेक्षित आहे भागवतधर्माला. अंत:करण निष्काम आणि बुद्धी स्थिर होण्यासाठी, जीवसमाधीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून, लोकसंमर्दापासून अलिप्त राहणे अत्यावश्यक असते योगसाधकाच्या दृष्टीने. आंतरिक उन्नतीच्या नेमक्या या पर्वात, १६३०-३१ सालाच्या आगेमागे, तुकोबा प्रवेश करते झाले. त्या काळात त्यांनीही पंथ अंगीकारला तो एकाकी व एकांती साधनेचाच. याजसाठीं वनांतरा। जातों सांडुनियां घरा हे त्यांचे उद्गार त्याच वास्तवाची साक्ष म्हणता येईल. मन आणि बुद्धी स्थिर होण्यासाठी, निदान काही काळ तरी, एकांतवास हा अपरिहार्यच ठरतो. यांत अवास्तव, अनैसर्गिक असे काहीच नाही. महत्त्वाची परीक्षा जवळ आल्यानंतर घरदार-मित्रमैत्रिणी-नाटकसिनेमा यांपासून मुले एकदम फारकत घेऊन अभ्यासाला वाहून घेतात, तसाच हा प्रकार. अनंत आकर्षणे मन आणि बुद्धीला हाकारे घालत असतातच. चंचल बुद्धी स्थिर झाल्याखेरीज मनोकायिक व्यापारांवर तिचे नियंत्रण शाबीत होणे अशक्यच असते. चारचौघांत सतत गप्पा हाणत बसल्याने स्थिर होण्यास अवकाशच लाभत नसतो बुद्धीला. नयें बोलों फार बैसों जनामधीं । सावधान बुद्धी इंद्रियें दमी अशा शब्दांत तुकोबा, म्हणूनच, अधोरेखित करतात महत्ता एकांतवासाची. ज्ञानोबांची या संदर्भात पूर्ण एकवाक्यता आहे तुकोबांशी. निर्धारित केलेल्या साध्यावर केंद्रित होण्यासाठी बुद्धी प्रथम निष्काम बनवावी लागते याचसाठी योगसाधक सुदूर वनोपवन जवळ करतो, असा दाखला यापरी इष्टानिष्टीं। रागद्वेष किरीटी । त्यजुनि गिरिकपाटीं। निकुंजीं वसे मांडतात ज्ञानदेव. तशा त्या एकांतवासामध्ये रागलोभादिकांचा दक्षपणे बंदोबस्त करत तुका म्हणे घडी घडीनें साधावी । त्रिगुणांची गोवी उगवूनि या तुकोबांच्या अनुभवसिद्ध प्रतिपादनानुसार जीवसमाधिवस्था प्रतिष्ठित झाली की समाजसंपर्काच्या रणधुमाळीमध्ये उतरण्यास योगी सिद्ध होतो. जीवसमाधीचे जणू चिलखतच धारण केलेले असल्याने व्यावहारिक जीवनाच्या लढाईदरम्यान अंगावर कोसळणाऱ्या कर्माकर्माच्या वारांनी जायबंदी होण्याची भीती त्याला आता नसते. तया लोकसंग्रहालागीं। वर्ततां कर्मसंगीं। तो कर्मबंधु आंगीं। वाजेलना अशा शब्दांत, मग, त्या संतयोग्याच्या ठायी उमललेली पूर्णसमाधिवस्था विशेषून सांगतात ज्ञानदेव आपल्याला. हा समाधिक्रम उलगडला का आता?
