अभय टिळक agtilak@gmail.com
आपल्या नजरेच्या इशाऱ्यावर जग नाचते, आपली भिवई अंमळ वर चढली तरी सिंहासने खाली होतात यांचा कोण अभिमान असतो एकेकाला. आपला धाक अथवा दरारा (वास्तविक पाहता, ही दोन्ही ‘दहशत’ या भावनेचीच शर्करावगुंठित रूपे म्हणायची!) लोकांना वाटतो ही जाणीवच पराकोटीची सुखद वाटते काहींना. परंतु नाथ-ज्ञानदेवांना विचारले तर, हे सारे हिंसेचेच अवतार होत, असाच नि:संदिग्ध निर्वाळा देतील ते दोघेही. आतां अहिंसेची स्थिती। ऐकें राया चक्रवर्ती। भंवई उचलणें नाहीं भूतीं। स्वप्न-सुषुप्ती-जागतां हे नाथांचे। त्यांच्या भागवतातील कथन हा त्या वास्तवाचा बिनतोड पुरावाच ठरतो. नाथांचे बहुतांश भागवत संवादप्रधानच आहे. श्रीमद्भागवतामध्ये नमूद असलेल्या नवनारायणांमधील ‘प्रबुद्ध’नामक नारायण आणि विदेहराज जनक यांच्या संवादादरम्यान अहिंसेची ही व्याख्या नाथांनी घातलेली आहे प्रबुद्धांच्या मुखात. ‘एकनाथी भागवता’च्या तिसऱ्या अध्यायात गुंफलेला आहे हा सारा संवाद. अद्वयाची निखळ अनुभूती उभ्या अस्तित्वाशी एकजीव झाल्याखेरीज ही स्थिती हस्तगत होत नसते. भवताली दिसणारा वस्तू-जीवमात्रांचा यच्चयावत पसारा हा वस्तुत: ‘स्व’चाच विस्तार होय, ही प्रचीती अद्वययोग्याच्या ठायी स्थिर झालेली असते. जगण्याच्या त्या कोटीमध्ये ‘स्व’ आणि ‘पर’ या द्वंद्वात्मक द्वैताची पुरती झाडणी झालेली असल्यामुळे परपीडन आणि आत्मपीडन या, अशा योग्याच्या लेखी जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू बनलेल्या असतात. स्वत:चाच घात कोणी स्वप्नात तरी चिंतील काय? अगदी त्याच न्यायाने, सृष्टीतील चल-अचल अशा कोणत्याच अस्तित्वाला आपल्यापासून हानी पोहोचू नये यासाठी दक्ष असलेल्या अद्वयोपासकाच्या जगण्यातून अहिंसेचेच प्रगटन घडून येत राहते. निजदेहा करावया घातु। सर्वथा जेवीं नुचले हातु। तेवीं भूतांवरी निघातु। ज्याच्या पोटांतु उपजेना। अशा शब्दांत नाथराय वर्णन करतात अशा अद्वयसाधकाची जीवनदशा. जगण्याची अशी ती असाधारण परी आपल्या तर कल्पनेच्याही चिमटीत न येणारी. कारण, आपण अहोरात्र जगतो द्वंद्वातच. साहजिकच, आपला सगळा व्यवहार व्यापलेला राहतो द्वैताने. हिंसा ही तर स्वाभाविक परिणती द्वंद्व-द्वैताची. निर्द्वद्व जगणे आपल्याला अशक्यप्राय वाटत राहते. त्यामुळेच आपण सतत असतो साशंक. या साशंकतेद्वारे मनात दाटत राहते असुरक्षितता. तिच्यापायीच बळावते प्रेरणा आत्मसंरक्षणाची आणि तिच्यातूनच पदोपदी बळ मिळते हिंसावृत्तीला. त्यामुळे, आपला सगळा व्यवहारच एका विचित्र विरोधाभासाने नटलेला आहे. द्वंद्व-द्वैतामधून निष्पन्न होणाऱ्या हिंसात्मकतेचा परिपोष एकीकडे प्रतिक्षणी करत असताना, दुसरीकडे, आपण अपेक्षा मात्र सदोदित बाळगत राहतो अहिंसामय लोकव्यवहाराची. पेरिजे नुसधी हिंसा। तेथ उगवेल काय अहिंसा। परि नवल बापा धिंवसा। या याज्ञिकांचा। अशा आशयगर्भ शब्दांत त्याच विरोधाभासाची जाणीव ज्ञानदेव आपल्याला करून देतात. इथे ज्ञानदेवांच्या डोळ्यांसमोर आहेत पशुबळी देत विभशांतीच्या प्रस्थापनेसाठी यज्ञ करणारे यज्ञसंस्कृतीचे उपासक याज्ञिक. हिंसेच्या अधिष्ठानावर अहिंसेची इमारत कधी उभारता येईल का कोणाला? समाजभूमीमध्ये द्वैतजन्य हिंसाभावाची लागवड जोमाने जारी राखत अहिंसेचे मळे पिकविण्याचा खटाटोप करणारे आजचे आपण आणि प्राचीन यज्ञसंस्कृतीमधील याज्ञिक या दोहोंमध्ये, ज्ञानदेवांच्या लेखी, गुणात्मक फरक अणुमात्रही नाही. काळ बदलला, आत्मवंचना कायमच आहे!