अभय टिळक agtilak@gmail.com
‘स्वाभिमान’, ‘अभिमान’, ‘अस्मिता’ हे शब्द निरनिराळे असले तरी त्या सगळ्यांचे अधिष्ठान एकच आहे आणि ते म्हणजे अहंकार. मोठी गंमतच आहे ही. अहंकार हा शब्द अंमळ उग्र, अंगावर येणारा असा दिसतो. तो आहेही तसाच. म्हणूनच एक प्रकारची नकारात्मकता त्याला वेटाळून बसलेली असते. त्या मानाने स्वाभिमान, अभिमान वा अस्मिता हे शब्द बाह्यत्कारी तरी भासतात सौम्य, सकारात्मक आणि म्हणूनच काहीसे सुस, स्वीकारार्ह. स्वत्व जपण्याची प्रेरणा निसर्गसिद्ध असल्याचे सांगत आपल्या स्वाभिमानाला जपत राहतो आपण. भाषेचा, जातीचा, वर्णाचा अभिमान सगळ्यांनाच वाटत असतो स्पृहणीय आणि त्याचमुळे समर्थनीयही. प्रादेशिक, वांशिक, राष्ट्रीय अस्मितेचा टेंभा तर सगळेचजण आपण मिरवत राहतो सदानकदा. निर्मम वृत्तीने अगदी सूक्ष्मपणे तपासले तर ही सगळी अहंकाराचीच नानाविध रूपे होत हे पटणे आपल्याला जड जाऊ नये. संग्रह करण्याच्या ईर्षेला खतपाणी घालत राहतात याच साऱ्या प्रवृत्ती. अभिमान हाच पाया असतो परिग्रहाचा. परिग्रहत्यागाचें मूळ जाण। आधीं त्यजावा अभिमान। तेणेंवीण त्यागु तो विटंबन। केल्या जाण होईल असे अवधूतांच्या मुखातून वदवत नाथराय हाच कार्यकारणभाव सूक्ष्मपणे अधोरेखित करतात. ‘एकनाथी भागवता’च्या सातव्या, आठव्या आणि नवव्या अध्यायांत नाथांनी विस्ताराने विवरलेला अवधूत आणि यदु यांचा संवाद याचसाठी विलक्षण मननीय ठरतो. अभिमान त्याज्य का ठरतो याचे या संवादादरम्यान अवधूतांनी मांडलेले विवरण आजही पुरेपूर प्रस्तुत ठरते. अभिमानाच्या कुशीतून जन्म घेतो परिग्रहाचा हव्यास आणि त्यापोटी मनीमानसी बळावू लागते तीव्र स्पर्धावृत्ती. रात्रंदिवस बळजोर बनत राहणाऱ्या स्पर्धाळूपणाच्या त्या विळख्यातून कोणीही सुटत नाही. मग तो संसारी गृहस्थ असो अथवा नि:संग संन्यासी! संग्रहवृत्तीमधून निपजत राहतो कलह. कारण, कलह हीच होय स्पर्धेची स्वाभाविक परिणती. कलहामुळे आपण मुकतो किमान सहृदयतेलाही. नाथांच्या लेखी परिग्रहाचा सर्वात भीषण व मोठा धोका कोणता असेल तर तो हाच. गृहपरिग्रहें गृहस्था। पाषाणमृत्तिकेची ममता। काडीकारणें कलहो करितां। सुहृदयता सांडिती हे नाथांचे शब्द आज आपल्या अनुभूतीस पदोपदी येत नाहीत, असे कोणी तरी म्हणू धजावेल काय? अभिमान, त्यांतून उमलणारा परिग्रह, त्यांपायी कडोविकडीची बनणारी स्पर्धा आणि अंतिमत: निर्दयतेमध्ये घडून येणारी तिची निष्पत्ती ही सगळी कारणशृंखला माणूसपणाचा पराजयच निर्देशित करत राहते. परमार्थसाधनेसाठी लौकिकाचा त्याग केलेला तापस संन्यासीही परिग्रहाच्या मोहातून सुटत नसतो, या दुर्धर वास्तवाकडे नि:संगा परिग्रहो लागला तैसा। शिष्यसंप्रदायें घाली फांसा। शास्त्रपुस्तकसंग्रहवशा। वाढवी आशा मठाची अशा रोकडय़ा शब्दांत आपले लक्ष वेधतात नाथराय. भरघोस शास्त्राध्ययनासाठी ग्रंथसंग्रह अपरिहार्यच बनतो, प्रकांड पांडित्यामुळे मोठा शिष्यसंप्रदाय भवताली गोळा होतो, विपुल ग्रंथसंभार आणि शिष्यमेळा सांभाळण्यासाठी मग मठाची उठाठेव अनिवार्यच बनते. यथावकाश, मठाचा उत्तराधिकारी बनण्यासाठी शिष्यांमध्येच तुंबळ कलह माजतो! पण इथे ऐकतो कोण? कलहाद्वारेच बीजारोपण होते वैरभावनेचे. त्यांतून पुरता नासून जातो प्रपंच आणि परमार्थही. निर्वैर व्हावें सर्वभूतांसवें। साधन बरवें हें चि एक असे बजावून सांगत नाथांचा वैचारिक वारसा अधिक समृद्ध बनवतात तुकोबाराय.