– अभय टिळक agtilak@gmail.com
‘उपरिचर वसु’ हे ‘महाभारत’कार महर्षी व्यासांचे आजोबा. महाभारताच्या शांतिपर्वातील नारायणीयोपाख्यानात वसूंसंदर्भात एक कथा आहे. सांस्कृतिक तसेच धार्मिक संक्रमणाचा एक मोठा टप्पा सूचित करणारी ती कथा आहे. ‘उपरिचर’ ही वसूंना लाभलेली उपाधी. अवकाश भ्रमणाची यंत्रविद्या अवगत असल्यामुळे, ‘आकाशात संचार करणारा’ या अर्थाने ‘उपरिचर’ ही उपाधी त्यांना बहाल झाली होती. देवराज इंद्राशी विशेष सख्य असलेल्या वसूंची सत्यप्रिय आणि सत्यवक्ता अशी ख्याती होती. महाभारतात नमूद कथाभागानुसार, एकदा यज्ञविधींसंदर्भात इंद्राचा मोठा वाद उद्भवला भूलोकावरील ऋषिवर्याशी. यज्ञामध्ये पशूंचा बळी द्यावयाचा की त्याऐवजी धान्यबीजांचे हवन करून कार्यभाग साधेल, या संदर्भात इंद्र आणि ऋषी परस्परविरोधी भूमिकांवर ठाम होते. पशूबळीचा आग्रह धरत होता इंद्र, तर त्याऐवजी धान्यबीजांची आहुती द्यावी असे मत मांडत होता ऋषीवर्ग. शेवटी सत्यप्रिय व सत्यवक्ता वसुराजांना निवाडय़ासाठी पाचारण करण्यात आले. दोन्ही पक्षांनी त्यांच्या भूमिका सादर केल्या. इथे, इंद्राशी असलेला पूर्वापारचा स्नेह वसूंच्या सारासार विवेकावर पालाण घालता झाला आणि वसुराजांनी इंद्राची तळी उचलून धरली. असत्य पक्षाची पाठराखण केल्याबद्दल ऋ षींनी अध:पतनाचा शाप दिला वसूंना आणि त्यापायी पश्चात्तापदग्ध झालेल्या वसूंनी उपासना आरंभली भगवान नारायणांची. महाविष्णूंनी उद्धरलेल्या वसूंनी पुढे अश्वमेध यज्ञाचा घाट घातला, परंतु त्यांत आहुती मात्र दिल्या सातूच्या आणि जवसाच्या. संपली कथा! तिथवर चालत आलेली पशुहवनप्रधान यज्ञपद्धती गुणात्मकरीत्या बदलण्याच्या एका अतिशय मूलभूत अशा धार्मिक व सांस्कृतिक स्थित्यंतराचे रेखाटन करणाऱ्या या महाभारतीय कथेमध्ये स्पष्ट सूचन घडते ते भागवत धर्माने पुरस्कारलेल्या हिंसात्यागाचे. किंबहुना, वेद, यज्ञ, सत्य, तप आणि दम हे सारे अहिंसाधर्माने युक्त असतील तेथेच निवास करावा, असा नि:संदिग्ध उपदेश वैष्णवधर्माचे सिद्धान्तन प्रतिपादन करतेवेळी भगवान नारायण करतात असा परंपरेचा दाखलाच आहे. अष्टांगयोगातील ‘यम’ या पंचकृत्यात्मक पहिल्याच योगाचे एक महत्त्वाचे अंग असलेल्या ‘अहिंसा’ या तत्त्वाशी भागवत धर्माचा धागा हा असा जुळलेला आहे. ज्ञानदेवांपासून ते नाथांपर्यंत या परंपरेतील जवळपास सगळ्यांच विभूतींनी अहिंसेचा महिमा का वर्णिलेला असावा, याचा उलगडा आता व्हावा. भागवत धर्मविचार आणि नाथप्रणीत शांभवाद्वय यांचा समन्वय घडून आला तो ज्ञानदेवांच्या माध्यमातून. मुळात योगप्रधान असलेला नाथसंप्रदाय योग्याची सांगड घालतो तीदेखील अहिंसेच्या चरमसीमेशी. अहिंसा प्रतिष्ठायां तत्सन्निधौ वैरत्याग: हे पातंजल योगसूत्रातील अहिंसाविषयक सूत्र या संदर्भात कमालीचे मननीय होय. वैरभावना ही होय हिंसेची जन्मकूस. अहिंसेचे तत्त्व ज्याच्या अंतरात प्रतिष्ठित झालेले आहे अशा योग्याच्या सान्निध्यात येणाऱ्यांच्या चित्तातील वैर नाहीसे होते, असे कथन आहे योगर्षी पतंजलींचे या सूत्राद्वारे. तुका म्हणे चित्त जालिया निर्मळ। तरि च सकळ केलें होय अशा शब्दांत नेमके हेच सार सूचित करतात तुकोबाराय. तर, योगी पावन मनाचा । साहे अपराध जनाचा अशी ‘योगी’ या पदाची व्याख्या सिद्ध करणाऱ्या मुक्ताई अतिशय मार्मिक संकेत करतात योग्याच्या ठायी वसणाऱ्या वैरभावनेच्या समूळ अभावाकडेच.
