अभय टिळक agtilak@gmail.com
व्यक्तिगत जीवनाची सांगड सामाजिक जीवनाशी घालत व्यक्ती आणि समाज यांच्या ऐहिक तसेच पारलौकिक समृद्धीला पोषक ठरणाऱ्या जीवनदृष्टीचे भरणपोषण करणे, हा अद्वयबोधाच्या उपयोजनाचा आद्य हेतू होय. साहजिकच, या केंद्रवर्ती उद्दिष्टाच्या परिपूर्तीसाठी आवश्यक असणारे जीवनविषयक तत्त्वज्ञान ज्यांमुळे परिपुष्ट बनत राहील, अशीच उपासनापद्धती भागवत धर्मविचाराने अविरत जागवली व निरंतर जपली. ‘नामस्मरण’ हे भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या भक्तिदर्शनाचे जे प्रधान अंग; त्याचेही उपयोजन या परंपरेने याच भूमिकेद्वारे पुरस्कृत केलेले आहे. नामचिंतनाद्वारे मुक्ती हमखास मिळत असली तरी ते मुक्तिशोधन स्वरूपत:च खासगी अथवा व्यक्तिगत स्तरावरील ध्येय ठरते. व्यक्तिगत स्तरावर नामजपाद्वारे पारलौकिक मुक्तीची हमी मिळत राहिली तरी, इहलोकात सामाजिक जीवनव्यवहाराचा पोत बदलण्यास नामचिंतनाचे साधन कशा पद्धतीने उपयुक्त ठरू शकते, हा भागवत धर्मपरंपरेतील विभूतिमत्वांचा चिरंतन जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. इहलोकातील प्रचलित लोकव्यवहार निकोप बनण्यास कारणभूत ठरणाऱ्या सत्य, सद्वर्तन आणि समता या तीन जीवनमूल्यांचा परिपोष समाजजीवनामध्ये होण्याच्या दृष्टीने नामसाधनेचा अंगिकार व पुरस्कार करण्यात ज्ञानदेव, नाथराय आणि तुकोबा या तीन लोकोत्तरांचे अ-साधारणत्व प्रतीत होते. कां रामनामाच्या आवृत्तीं। वाचा धूतली स्मरणोक्तीं। ते असत्यामाजीं पुढती। कदा कल्पांती बुडेना हे नाथरायांचे सिद्धान्तन नामजपाच्या अपेक्षित व्यावहारिक निष्पत्तीकडे यच्चयावत नामधारकांचे लक्ष वेधून घेते. अखंड नामचिंतनाद्वारे जी वाचा निर्मळ बनलेली आहे तिला असत्याचा स्पर्श कदाकाळी होणार नाही अथवा होत नसतो, असे छातीठोकपणे प्रतिपादन करत नाथराय कमालीच्या खुबीने, नामसाधक म्हणवणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालतात. नामजपाची परिणती सत्याच्या प्रतिष्ठापनेमध्ये घडून येणे अपेक्षित आहे नाथांना. स्वहिताची चाड असेल तर प्रथम सर्व प्रकारच्या दंभाला, खोटारडेपणाला तिलांजली द्या, असे निकराचे आव्हान समाजमनाला करणारे तुकोबाराय तरी काय वेगळे सांगतात? तोंडाने खोटे बोलण्याचे तेवढे टाळले की सत्याचरण आपल्या हातून पुरेपूर घडले, असे नाथांच्या या कथनाचे आपण अतिसुलभीकरण करावे तर तेही दिशाभूल करणारेच शाबीत होईल. केवळ जें सत्यभाषण। तें निजसत्व नव्हे जाण असे स्पष्टपणे बजावत आपले कान नाथ टोचून ठेवतात ते त्याचसाठी. नामचिंतनाची फलश्रुती सत्यप्राप्तीमध्ये घडून येत अंतिमत: सत्योपासक साधक निष्पाप बनणे अपेक्षित आहे नाथांना. सत्यापरतें नाहीं तप। सत्यापरता नाहीं जप। सत्यें पाविजे सद्रूप। सत्यें निष्पाप साधक होती असे नाथराय जे आवर्जून बजावतात त्यांमागील इंगित हेच होय. सत्यसंपादनाद्वारे साधक निष्पाप बनतो असे नाथ म्हणतात तेव्हा ‘असत्य’ आणि पर्यायाने ‘पाप’ या संज्ञांचा त्यांना या संदर्भात अभिप्रेत असलेला अर्थ आहे ‘विषमता’ हा. वस्तु न देखतां सर्वसम। जें जें देखणें गा विषम। तेंचि असत्य अतिदुर्गम। सत्य तें ब्रह्म समसाम्य हे नाथांचे वचन नि:संदिग्ध सूचन घडवते त्याच वास्तवाचे. नामचिंतनाद्वारे सत्यप्राप्ती, सत्यप्राप्तीची परिणती निष्पापतेमध्ये आणि पापाच्या निराकरणाद्वारे समतेची अनुभूती अशी एकात एक गुंफलेली कार्यकारणशृंखला अभिप्रेत आहे नाथांना. असत्य, पाप आणि विषमता यांपायी केवळ व्यक्तिगतच नव्हे तर उभे सामाजिक जीवनही पार नासून जाते, हे तर पदोपदी अनुभवतो आपण. मोक्षप्राप्तीइतकेच नामजप हे अमोघ साधन होय या त्रिदोषांच्या निवारणाचे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Aug 2021 रोजी प्रकाशित
सत्य
नामजपाची परिणती सत्याच्या प्रतिष्ठापनेमध्ये घडून येणे अपेक्षित आहे नाथांना.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 16-08-2021 at 01:27 IST
मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta advaybodh article author abhay tilak the truth zws