– अभय टिळक

मराठी कलासमीक्षकांच्या प्रांतात एके काळी ‘कलेसाठी कला’ आणि ‘जीवनासाठी कला’ असे दोन पक्ष होते. साहित्याच्या संदर्भातही हाच प्रश्न अधूनमधून उपस्थित केला जातो. ‘अभिजात साहित्य’ कशाला म्हणायचे, त्यासाठी कोणते निकष लावायचे, असे याही चर्चेला नाना पैलू आहेत. साहित्यविषयक या अवघ्या ऊहापोहाला विनोबाजी मात्र वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात. ‘आजपर्यंत साहित्य ‘कसे’असावे याची चर्चा पुष्कळ झाली आहे. यापेक्षा साहित्य ‘कशाचे’ हा प्रश्न महत्त्वाचा आहे,’ असे विनोबाजींचे अर्थगर्भ विधान या संदर्भात मननीय ठरते. साहित्य व्यवहार हे व्यापक  सामाजिक व्यवहाराचे अभिन्न अंग होय. प्रचलित समाज व्यवहारात परिवर्तन घडवून आणण्याचे साहित्याच्या ठायी वसणारे सामथ्र्य कोणीच अमान्य करत नाही. साहजिकच परिवर्तनाचे साधन गणल्या जाणाऱ्या साहित्य व्यवहाराला कोणत्या मूल्यसंपदेचे अधिष्ठान लाभलेले आहे, हा पैलू विनोबाजींना  मोलाचा वाटतो. ‘साहित्य कशाचे?’ असा प्रश्न महत्त्वाचा मानणाऱ्या विनोबाजींचा कटाक्ष दिसतो तो कोणताही साहित्य व्यवहार कशा प्रकारचे मूल्यसंचित जपतो व प्रसृत करतो यावर. बारकाईने बघितले तर आपल्या ध्यानात येईल, की साहित्य व्यवहारासंदर्भात विनोबाजींनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाचा उगम दिसतो भागवत धर्मग्रंथाद्वारे प्रसृत झालेल्या साहित्य प्रवाहात. ‘साहित्यसोनियाचिया खाणी। उघडवीं देशियेचियां क्षोणीं । विवेकवल्लीची लावणी । हों देई संैघ’  ही ज्ञानेश्वरी च्या १२ व्या अध्यायातील ओवी त्या वास्तवाची साक्ष पुरवते. प्राकृताचे सामथ्र्य व मºहाटीचा अभिमान व्यक्त करण्यासाठी ज्ञानदेवांचे हे कथन उद्धृत केले जाते. कसदार देशी प्राकृत-भूमीमधून (क्षोणी म्हणजे भूमी ) सोन्यासारख्या साहित्याचा संभार मी निर्माण करीन, अशी ज्ञानदेवांची प्रतिज्ञा या ओवीच्या पूर्वार्धात येते. गंमत अशी की, मराठीचा जयजयकार घुमवण्याच्या नादात ओवीच्या आशयसंपन्न अशा उत्तरार्धाकडे आपले ध्यानच वळत नाही. देशी भाषेच्या सकस भूमीमध्ये मी केवळ विवेकरूपी वेलींचीच पुष्कळ लावणी करीन, हा ज्ञानदेवांचा निश्चय मुखर झालेला आहे ओवीच्या उत्तरार्धात. ‘पुष्कळ ’व ‘केवळ ’अशा दोन्ही अर्थच्छटा आहेत ‘सैंघ’ या शब्दाला. ‘साहित्य कशाचे ?’ या प्रश्नाचे उत्तर इथे गवसते. साहित्याने समाजमनरूपी भूमीत विवेकाचे पीक काढावे, हे भागवतधर्मी साहित्यव्यवहाराला अपेक्षित आहे आणि अभिप्रेतही! ‘विवेकाची ठरेल ओल। ऐसे की बोलावे बोल । आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे’ हे सोहिरोबानाथ अंबिये यांचे आर्जवोद्गार ज्ञानदेवांचेच हृदगत सांगतात! विवेकाचे संस्कार झालेल्या वाणीमधूनच सुसंवाद अंकुरत असल्याने त्याची वाढ रोखणारा विसंवाद ज्यांमुळे संभवतो,अशा साऱ्या घटकांची छाटणी करणे, हे साहित्य व्यवहाराचे एक उपयोजन आपसूकच सिद्ध होते. ‘पाखंडाचें दरकुटें । मोडीं वाग्वाद अव्हांटे । कुतर्काचीं दुष्टें । सावजें फेडीं।’  हे ते उपयोजन !

दूषित संवादाच्या दरीतून (दरकूट)धुमारणारे थोतांड (पाखांड), समाजमनाला वाममार्गाला (आव्हाट) नेणारा वितंडवाद (वाग्वाद) आणि कुतर्क या सावजांचे दक्षपणे निवारण घडवून आणणे, हे मग साहित्याचे प्रयोजन व प्रेरणा ठरते. आपल्याला हे मान्य आहे का?

agtilak@gmail.com