‘मिनला’ हा एक गोड शब्द होय जुन्या मराठीतील. ‘मिळणे’, ‘एकत्व पावणे’ हे होत ‘मिनला’ अथवा ‘मिनणे’चे अर्थ. नाथांनी त्यांच्या एका आरतीमध्ये मनोज्ञ वापर केलेला आहे या शब्दाचा. कोजागरी पौर्णिमेपासून देवळांमध्ये पहाटेच्या प्रहरी लगबग सुरू होते काकडारतीची. काकड्याच्या वारकरी सांप्रदायिक अभंगांची सांगता होते ती नाथरायांच्या आरतीने. ‘सहस्रा दीपें दीप कैसीं प्रकाशलीं प्रभा। उजळल्या दशदिशा गगना आलीसें शोभा’ असा आहे त्या आरतीचा प्रथम चरण. चिंधीच्या वळून केलेल्या वातीला म्हणतात ‘काकडा’. या काकड्याने देवाला ओवाळत काकडारतीची सेवा रुजू केली जाते. कार्तिकोत्सवाचा हा मोठा मधुर भाग. अश्विन पौर्णिमेपासूनच कार्तिकोत्सवाला प्रारंभ होतो. रामप्रहरी मंदिरामध्ये देवाला जागे करण्यासाठी आळवली जाते काकडारती. पुराणीचा एक संकेत आहे या परंपरेच्या मुळाशी. आषाढी एकादशीला क्षीरसागरातील शेषाच्या शय्येवर विश्रामासाठी निद्राधीन झालेले महाविष्णू कार्तिकातील एकादशीला जागे होतात, अशी आहे पुराणांतरीची धारणा. ‘देवशयनी एकादशी’ हे नामाभिधान आषाढातील महाएकादशीस प्राप्त झाले ते त्यामुळेच. कार्तिकातील शुद्ध एकादशीस देव जागे होत असल्यामुळेच त्या एकादशीस ‘प्रबोधिनी एकादशी’ संबोधतात. चातुर्मासादरम्यान गाढ निद्रेमध्ये विसावलेल्या भगवान विष्णूंना जागे करण्यासाठी जो उत्सव केला जातो त्याला म्हणतात ‘प्रबोधोत्सव’. भूपाळ्यांनी आळवून देवाला जागे करण्याचा सोहळा म्हणजेच काकडारती. काकडारतीच्या लौकिकातील उपचारसेवेला अद्वयाच्या प्रांतात विलक्षण आशयगर्भ असा आयाम प्रदान करतात नाथराय आणि तुकोबा. वळलेली चिंधी तुपामध्ये बुडवून तयार केलेल्या काकड्याचे रूपक तुकोबाराय वापरतात ज्ञानासाठी. भक्तिसाधनेची तेजाळ वात प्रज्वलित केली की तिच्यामधून प्रसवणारा बोधरूपी प्रकाश साधकाचे हृदयाकाश उजळून टाकतो असा मार्मिक दाखला देतात तुकोबाराय ‘भक्तिचिया पोटीं बोध कांकडा ज्योती। पंचप्राण जीवें भावें ओवाळूं आरती’ अशा उत्कट शब्दांत. भक्तीची परिणती विशुद्ध ज्ञानामध्ये घडून येते अथवा घडून येणे अपेक्षित आहे, हेच सुचवायचे आहे तुकोबांना इथे. ज्ञान हे भक्तीचे अपत्य होय, हा भाव इथे अनुस्यूत आहे. ‘भक्त’ आणि ‘ज्ञानी’ या दोन अवस्था परस्परांपेक्षा अणुमात्रही भिन्न नाहीत, असे ज्ञानदेव ‘म्हणौनि भक्तांमाजीं रावो। आणि ज्ञानियां तोचिं’ अशा भावगर्भ शैलीत जे आग्रहपूर्वक विदित करतात त्यांमागील इंगित हेच. भक्तिसाधनेद्वारे अंत:करणात प्रसवलेल्या बोधामुळे साधकाला लाभ घडतो अद्वयदृष्टीचा, असे सूचन आहे नाथांचे त्यांच्या आरतीमध्ये. ‘आरती करितां तेज प्रकाशलें नयनीं। तेणें तेजें मिनला एका एकीं जनार्दनीं’ हे नाथांचे त्या आरतीमधील अखेरचे चरण त्याच वास्तवाचे द्योतन घडविते. ज्याची आरती करावयाची ते तत्त्व आणि आरती करणारा साधक हे त्या एकमात्र परमतत्त्वाचेच दोन आविष्कार होत, या बोधाशी एकरूप होणे ही होय नाथांना अभिप्रेत असणारी काकडारतीची परिणती. अद्वयबोधाने दृष्टी मंडित झाली की, चराचरातील परतत्त्वाचे नित्यनूतन दर्शन घडोघडी होत राहते, ही तर शैवागमाची अंतर्खूण. ‘कोंदलेसें तेज प्रभा झालीसे एक। नित्य नवा आनंद वोवाळितां श्रीमुख’ हा नाथांचा अनुभव म्हणजे त्या अंतर्खुणेचे शब्दरूपच नव्हे काय!– अभय टिळक

agtilak@gmail.com