परंपरेचे डोळस अनुसरण करणाऱ्या विवेकी विभूती त्यांच्यापर्यंत वाहत आलेल्या प्रवाहाला कालानुरूप वळण देत परंपरेचा तो प्रवाह बदलत्या जीवनरहाटीशी सुसंगत बनवत असतानाच परिपुष्टही करत राहतात. ‘यम’ या अष्टांगयोगातील आद्य योगाच्या संदर्भात नाथरायांनी त्यांच्या ‘एकनाथी भागवता’मध्ये नेमके हेच केलेले दिसते. पतंजलींनी सत्य, अस्तेय, अपरिग्रह, अहिंसा आणि बह्मचर्य या पाच अंगांचा समावेश ‘यम’ या योगामध्ये केलेला आहे. नाथांनी त्यांत भर घातली आहे ती आणखी सात अंगांची. असंगता, लज्जा, आस्तिक्य, मौन, स्थिरता, क्षमा आणि अभय ही ती सात अंगे होत. केवळ एवढे करूनच नाथ थांबत नाहीत. तर, ‘यम’, ‘नियम’ आणि ‘आसन’ या, बहिर्योगाचे घटक गणल्या जाणाऱ्या तीन योगांगांचा संबंध व्यक्तीच्या केवळ जागृतावस्थेतील शारीर अस्तित्वाशीच काय तो असतो, ही सर्वसाधारण धारणाही नाथ कटाक्षाने खोडून काढतात. सत्य तें जाण पां ऐसें। ज्याचें मनवाचा असत्यदोषें। जागृतिस्वप्नसुषुप्तिवशें। स्पर्शलें नसे अणुमात्र। अशी ‘एकनाथी भागवता’च्या १९व्या अध्यायातील ओवी त्या वास्तवाचे स्पष्ट सूचन घडविते. जागेपणी पूर्ण भानावर असतानाच तेवढे सत्यभाषणाचे व्रत पाळावयाचे एवढेच पुरेसे नाही. ज्याच्या मन तसेच वाचेला स्वप्नामध्येही असत्याचा स्पर्श होत नाही तो खरा ‘सत्यव्रती’ म्हणावा, असे प्रतिपादन आहे नाथांचे. अंतर्बाह्य शुचित्व हा ठरतो सत्याचरणाचा गाभा. कोणत्याही प्रकारचे अनुचित वर्तन करण्याची प्रेरणा अस्तित्वाच्या त्या कोटीमध्ये साधकाच्या अंतर्मनात उगम पावण्याची शक्यता अणुमात्रही अंकुरत नाही. आपला रास्त अधिकार पोहोचत नाही अशी चीजवस्तू आपल्याला प्राप्त व्हावी, असा कुविचार सत्यान्वेषक उपासकाच्या मनबुद्धीमध्ये मग रुजावा तरी कसा? सत्यानंतर ‘अस्तेय’ हा ‘यम’ योगर्षी पतंजली नमूद करतात त्यांमागील कार्यकारणभाव नेमका हाच. ‘चोरी’ हा ‘स्तेयं’ या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ. त्याच्या विरुद्ध ‘अस्तेय’ म्हणजे ‘अचौर्य’. दुसऱ्याच्या नकळत, लबाडीने त्याची वस्तू लंपास करणे, हा झाला ‘चोरी’ या शब्दाचा व कृतीचा ढोबळ असा व्यवहारातील अर्थ. चोरीचे कृत्य प्रत्यक्षात शरीराच्या पातळीवर साकारत असले तरी लबाडीचा विचार उगम पावत असतो तो प्रथम चोराच्या मनात. नाथांचा रोख आहे तो नेमका तिथेच. हातें चोरी नाहीं करणें। परी परद्रव्याकारणें। मनीं अभिलाष नाहीं धरणें। अस्तेय लक्षण त्या नांव। हे त्यांचे उद्गार अधोरेखित करतात चौर्यविचाराचे मनोभूमीमध्ये घडून येणारे बीजांकुरण. अस्तेयाच्या संकल्पनेला चिकटलेले आहेत अनेकानेक सूक्ष्मातिसूक्ष्म पदर. समूहामध्ये अगर कुटुंबामध्ये नांदताना वाटपादरम्यान आपल्या वाट्याला येणाऱ्या कोणत्याही रास्त हिश्शापेक्षा अतिरिक्त हिश्शाची अपेक्षा धरणे अथवा त्यांवर हात मारणे, याचाही अंतर्भाव होतो चौर्यकर्मामध्येच. आपण स्वत: कष्ट न करता मिळवलेल्या धनावर डोळा ठेवणे अथवा दुसऱ्याने अर्जित केलेल्या पैशावर हात मारणे यालाच आजच्या परिभाषेत आपण म्हणतो ‘भ्रष्टाचार’. अन्यायोपार्जित धन। स्वप्नींही नातळे मन। हें ‘अचौर्या’चे लक्षण। तिसरा गुण उद्धवा। अशा शब्दांत खुद्द भगवान श्रीकृष्ण अस्तेयाची व्याख्या उद्धवांना विदित करतात, असा दाखला आहे नाथांचा त्यांच्या भागवतामध्ये. ही व्याख्या जपली असती आपण मनीमानसी तर वेळच ओढवली नसती नोटाबदलीसारखा अघोरी उपाय योजण्याची! – अभय टिळक
agtilak@gmail.com
