सत्ताकेंद्री मानसिकतेच्या बीसीसीआयने एका मर्यादेपलीकडे सहन केले नसतेच; पण विराट कोहली आजही उपलब्ध मनुष्यबळापैकी सर्वोत्तम कर्णधार ठरतो…
उत्तराधिकारी शोधण्यात या व्यवस्थेला रस नसल्यानेच, अद्यापही ती निश्चिंत दिसते…
विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडून आज शनिवारी एक आठवडा उलटेल, पण त्याचा उत्तराधिकारी शोधण्याची घाई नसल्याचा आभास निर्माण केला जात आहे. पुढील मालिका मायदेशी श्रीलंकेविरुद्ध असल्यामुळे तूर्त वेळ मारून नेली तरी चालण्यासारखे असल्याचे भासवले जात असले, तरी नेतृत्वाच्या तिजोरीत किमान कसोटी क्रिकेटच्या बाबतीत तरी खडखडाट असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. परंतु हे नेतृत्वदारिद्र्य वास्तव आहे की आभासी याचा शोध घेतला पाहिजे. विराटच्या बाबतीत त्याचा उत्तराधिकारी म्हणून जी नावे समोर येतात, त्यांच्याबाबतीत एखाद-दोन किंतु उपस्थित होतातच. रोहित शर्मा कसोटी क्रिकेटसाठी सदान् कदा जायबंदी असतो. अजिंक्य रहाणेचे संघातील स्थानच डळमळीत. के. एल. राहुलला स्थानिक क्रिकेटमध्येही कधी नेतृत्व जमलेले नाही. रविचंद्रन आश्विन प्रमाणाबाहेर फटकळ आणि जसप्रीत बुमरा तेज गोलंदाज पण कपिलदेव यांच्याप्रमाणे अष्टपैलू नाही. ही परिस्थिती विराट आणि त्याची पाठराखण करणारे रवी शास्त्री यांच्या चाणाक्ष बुद्धीने ताडली नसती तरच नवल. यातूनच त्यांचा कारभार एकीकडे यशस्वी पण तरीही बराचसा एककल्ली प्रकारात गणता येईल असाच होता. नेतृत्व करण्यासाठी आवश्यक स्वातंत्र्य, पैस आणि अवकाश विराटला २०१४पासून जितका लाभला, तितका तो फारच थोड्यांच्या नशिबी आला असेल. महान फलंदाज सचिन तेंडुलकरचाही कर्णधारपदासाठी अझरुद्दीनच्या साथीने संगीत खुर्चीचा खेळच सुरू होता, हा इतिहास फार जुना नाही. जनमत आणि व्यवस्थेचे पाठबळ एकाच वेळी मिळण्याचा विराटचा हा सुवर्णकाळ गेल्या काही महिन्यांमध्ये तडकाफडकी संपुष्टात कसा आला, हा संशोधनाचा विषय ठरतो. परंतु त्याकडे वळण्यापूर्वी आणि कसोटी क्रिकेटविश्वातील विद्यमान नेतृत्वदारिद्र्याच्या समस्येवर अधिक प्रकाश टाकण्यापूर्वी विराटने भारतीय क्रिकेटसाठी जे मिळवून दाखवले, त्याचा अनुल्लेख त्याच्यासाठी अन्याय्य ठरेल.
विराट कोेहली हा नि:संशय भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार. महेंद्र्सिंह धोनी (६० सामन्यांत २७ विजय) आणि सौरव गांगुली (४९ सामन्यांत २१ विजय) यांचा क्रमांक त्याच्या नंतरचा. घरच्या मैदानांवर विराट कोहलीने ११ मालिका जिंकल्या आणि एकही गमावली नाही वा बरोबरीत सोडवली नाही. ‘घरच्या पाटा खेळपट्ट्यांवर वाघ नि बाहेरच्या हिरव्या खेळपट्ट्यांवर बकरे’ असे भारतीय क्रिकेट संघाचे हेटाळणीपूरक वर्णन हा संघ खेळू लागल्यापासून जवळपास प्रत्येक दशकात केले जाई. गतशतकाच्या अखेरीस आणि नवीन शतकाच्या आरंभापासून क्रिकेटची सर्वांत मोठी बाजारपेठ असे भारतीय क्रिकेटचे स्वरूप बनू लागल्यानंतर त्या तुच्छतावर्णनाचा पोत थोडाफार बदलू लागला इतकेच. अशा अवमानजनक संभावनेविषयी पेटून उठलेला कर्णधार मात्र विराट हाच एकमेव. सौरव गांगुलीच्या आक्रमक आणि बिनतोड नेतृत्वगुणांविषयी नेहमीच बोलले जाते, परंतु त्याच्या नावावर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या आव्हानात्मक चतुष्कोणात दोनच विजय नोंदवले गेले हे जरा माहिती खणून काढल्यावर समजून येते. महेंद्र्सिंग धोनी, अनिल कुंबळे, राहुल द्रविड या इतर तीन कर्णधारांच्या स्वभावातच टोकाचा संघर्ष नव्हता. विराट कोहलीने सात वेळा त्या चार देशांमध्ये भारताच्या विजयी संघाचे नेतृत्व केले आणि हे करताना तो सर्वाधिक भारतीयच नव्हे, तर आशियाई कर्णधारही ठरला. गोऱ्यांच्या देशात कसोटी सामने जिंकण्यासाठी उच्च कोटीचा वेडेपणा स्वभावात असावा लागतो, ही विराट कोहलीची धारणा होती. त्याच्या संघाचा तो रिंगमास्तर होता. सहकाऱ्यांकडून त्याने उच्च दर्जाची कामगिरी करवून घेतली, त्यांना पाठिंबा ही दिला. परंतु मैदानावर एखाद्याकडून चूक झाल्यानंतर संबंधित खेळाडूंची गर्भगळित नजर आधी विराटकडे वळायची. कप्तानाकडून कोणते संकेत मिळतात याची चिंता त्यांच्या डोळ्यांत दिसायची. विराटच्या मुद्रा हा तर स्वतंत्र संशोधनाचा विषय. जगात तो कुठल्याही मैदानावर खेळत असता, तरी कॅमेराप्रणालीतील एक यंत्र जणू त्यासाठीच नियोजित असल्यासारखे वाटायचे! परदेशी मैदानांवर सर्वाधिक कसोटी विजय विराटच्याच नेतृत्वाखाली नोंदवले गेले. ४०पैकी १६ सामने भारताने त्याच्या नेतृत्वाखाली परदेशी मैदानांवर जिंकले. श्रीलंका (२-१, २०१५), वेस्ट इंडिज (२-०, २०१६), श्रीलंका (३-०, २०१७), ऑस्ट्रेलिया (२-१, २०१८-१९), वेस्ट इंडिज (२-०, २०१९) यांतील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय अर्थात सर्वाधिक संस्मरणीय. पाकिस्तानात आतासे आपण खेळत नाही आणि श्रीलंका, वेस्ट इंडिज वगैरे ठिकाणचे विजय विराटच्या खिजगणतीत नाहीत. भारताला खिजवणाऱ्या मंडळींमध्ये प्रामुख्याने गोऱ्यांचा समावेश होता. तेव्हा गोऱ्यांच्या देशात जाऊन मर्दुमकी गाजवण्यास विराटचे प्राधान्य असायचे. या भावनेतूनच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये (सेना – एसईएनए) अधिकाधिक यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा जन्माला आली. या देशांमध्ये तो आजवरचा सर्वाधिक यशस्वी आशियाई कर्णधार ठरला. न्यूझीलंडमध्ये एक वेळा, इंग्लंडमध्ये एक वेळा आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दोन वेळा त्याच्या नेतृत्वाखालील संघाने मालिका गमावली. पण या देशांमध्ये सर्वाधिक सात कसोटी विजय त्याच्या नावावर आहेत. त्याच्या खालोखाल धोनी आणि मन्सुर अली खान पतौडी यांच्या संघांनी प्रत्येकी तीन सामने जिंकले. इतर आशियाई कर्णधारांमध्ये विराटनंतर खूप खाली जावेद मियाँदाद आणि वासिम अक्रम या पाकिस्तानी कर्णधारांचा (प्रत्येकी चार विजय) क्रमांक लागतो.
इतके सगळे कमावेपर्यंत विराट स्वत:च एक संस्थानिक बनला. भारतीय क्रिकेट आणि संस्थानिकांचे नाते तसे प्राचीन. पूर्वी संस्थानिक थेट कर्णधार म्हणूनच खेळायला उतरत, कारण तत्कालीन सत्ताधीश ब्रिटिशांशी त्यांची जवळीक हाच गुणवत्तेचा निकष असायचा. मग ब्रिटिश गेल्यानंतरही स्वातंत्र्योत्तर संस्थानिक काही काळ भारतीय क्रिकेटचे अधिपती होते, ते खालसा झाल्यानंतर ती उणीव आपल्याकडे राजकारणी आणि काही प्रमाणात उद्योगपती मंडळींनी भरून काढली. या अघोषित व्यवस्थेला कधीही स्वतंत्र विचारांचे शक्तिशाली आणि व्यक्तकर्कश कर्णधार मानवले नाहीत. सौरव गांगुलीला (त्याचा दर्जा बऱ्यापैकी घसरला होता तरी) अवमानित केले गेले. ती वेळ विराटवर कधीही येणार नाही असे वाटत असतानाच, भारतीय क्रिकेट जणू काही दशके मागे सरकले आणि विराटलाही राजीनाम्यासाठी भाग पाडले गेले. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकता, तर कदाचित या योजनेला काही प्रमाणात अल्पकालीन खीळ बसलीही असती. पण विराट नामक समांतर सत्ताकेंद्र सत्ताकेंद्री मानसिकतेच्या बीसीसीआयने कधीही एका मर्यादेपलीकडे सहन केले नसते, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले. विराट कोहली आजही उपलब्ध मनुष्यबळापैकी सर्वोत्तम कर्णधार ठरतो. पण केवळ संस्थानिक नव्हे तर तो एक संस्थाही बनत असेल, तर संस्थांची गय करणारी विद्यमान शासनव्यवस्था नाहीच हे त्याने ओळखायला हवे होते. या व्यवस्थेला उत्तराधिकारी शोधण्यात कधीही रस नव्हता. त्यामुळे तो सापडत नाही म्हणून क्रिकेटप्रेमी अस्वस्थ होत असले, तरी व्यवस्था र्निंश्चत आहे. जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही देशामध्ये समोर आहेच कोण, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेटवेड्या देशात दुसरा कसोटी कर्णधार सापडत नाही ही त्रुटी कदाचित व्यक्तिकेंद्री व्यवस्थेचा स्वाभाविक परिपाकच म्हणावा काय?