जगण्यासाठी हजारो लोकांचे कुटुंबासह होणारे स्थलांतर ही आता केवळ राज्याची वा देशाची नव्हे तर जागतिक समस्या बनली आहे..
स्थलांतरितांमध्ये दुष्काळग्रस्त आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत आणि त्यामुळे आयुष्याला विटलेले जीवनग्रस्त आहेत. त्यांच्या त्या मोडून पडलेल्या आयुष्यांना जबाबदार आपणही आहोत. कारण आपण खऱ्या जबाबदारांना प्रश्न विचारायचेच विसरलो आहोत.
कधी पोटासाठी, कधी युद्धांमुळे माणसे पाठीवर बिढार घेऊन नव्या आबोदान्याच्या आणि आशियान्याच्या शोधात फिरतच राहिली, हा माणूस नावाच्या प्राण्याचा इतिहास आहे.. पण हेच त्याचे वर्तमानही असावे? आजही माणसाला असे जगण्याचे चार कोरके मिळावेत म्हणून आपली मुळे खुडून काढणे भाग पडावे? आजही माणसाला चार बादल्या पाण्यासाठी आपली पांढरी, आपली शेती मागे टाकून शहरांकडे तोंडे करावी लागावीत? ऋग्वेद काळ ते एकविसावे, फोर-जी आणि स्मार्टफोनचे शतक यांतला हा एवढाच धागा पक्का राहावा? आभाळाच्या कुशीत काळी माया दाटून येताच एसटीने, रेल्वेने गावपरतीला लागलेले दुष्काळग्रस्तांचे तांडे या अशा अनेक प्रश्नांचे जंजाळ उभे करीत आहेत. हे प्रश्नही त्या आंधळ्याच्या कथेतल्या हत्तीसारखे. पूर्णत: कोणाच्याही कवेत न येणारे. म्हणूनच त्यांची उत्तरेही अशीच. पाहता पाहता हाताच्या मुठीतून रेतीसारखी ओघळून जाणारी.
बहुधा म्हणूनच कोणी या प्रश्नांच्या नजरेला नजर भिडवीत नसावे. तसे नसते तर झाडांच्या पानांवर साठलेली उन्हाळधूळ पावसाच्या पहिल्या चार थेंबांत विरघळून जावी, त्याप्रमाणे दुष्काळ आणि दुष्काळग्रस्तांची चर्चाही मोसमी पावसाच्या अंदाजवार्तामध्ये अशी मागे पडली नसती. विदर्भ-मराठवाडय़ातून मुंबई-पुण्यातल्या उड्डाणपुलांखाली येऊन ब्रिजवासी झालेली ती माणसे. त्यातली काही गावांच्या ओढीने परत गेली. आपण मोठय़ा थाटात त्यांचे निरोपसमारंभ केले. माध्यमांतून ते झळकले. गल्लीचौकातल्या फलकांवरून आपल्या दातृत्वाचे सचित्र पवाडे गायले. याला कोणी स्वार्थातला परमार्थ म्हणेल. कोण्या पुढाऱ्याने तो साधला म्हणून काही पाप नाही केले. त्याला का म्हणून नावे ठेवायची? पण तरीही जी माणसे परतली त्याहून कितीतरी माणसे याच शहरांच्या सिमेंटी अजगरांनी गिळली त्याचे काय हा प्रश्न राहतोच. कालपरवापर्यंत आपल्या रानात, आपल्या वावरांत ताठ कण्याने राबणारी ती माणसे, आज शहरांतल्या कामगारनाक्यांवर गुडघ्यांत माना घालून बसलेली दिसतात. त्यांच्या विझलेल्या डोळ्यांना प्रतीक्षा असते ती कष्टाच्या खरेदीदारांची. त्या वाकलेल्या कण्यांचे आणि आसवांचे पाट सुकलेल्या डोळ्यांचे काय, हा सवाल बाकी राहतोच. त्यांच्याबद्दल कोणाच्या व्हॉट्सअॅपवरून संदेश फिरतात?
आणि हा केवळ दुष्काळासारख्या आपत्तींनी स्थलांतर करावे लागलेल्या समूहांचाच सवाल नाही. असा आपल्या चुलींमध्ये पाणी ओतून गावमाती सोडण्याचा प्रसंग येतो तो केवळ अस्मानी संकटांनीच असेही नाही. लोकशाहीतही सुलतानी संकटे येतातच. कधी ती सामाजिक अन्यायाच्या रूपाने येतात, कधी अधिकांचे अधिक भले या न्यायाच्या गोषातून विकासाच्या नावाने येतात. बदलता देश पाहण्यासाठी आतुर झालेल्यांच्या ब्रँडेड गॉगलांतून हे रखरखीत वास्तवही सौम्य शीतल होऊन येते. त्यांच्या मेंदूला ते भीडतच नाही. म्हणून ते अस्तित्वातच नाही असे ज्यांना मानायचे त्यांनी ते खुशाल मानावे, पण मग शहरातल्या झोपडपट्टय़ा का वाढत चालल्या आहेत हा सवाल त्यांनी करू नये. शहरांतल्या या झोपडपट्टय़ा म्हणजे आपल्याच विकासविजयाची स्मारके आहेत. विकासाला कोणाचा विरोध असणार आहे? तो तर सगळ्यांनाच हवा. बिनसडकेच्या त्या खेडय़ातल्या अंधारालाही उजेडाची आस असतेच. आपल्याही मुठीत जग असावे टूजीचे हे त्यांचेही स्वप्न असतेच. पण त्या विकासापायी होणाऱ्या विस्थापनांचे काय? विस्थापितांच्या पुनर्वसनाचे काय? पुनर्वसन न झाल्याने होणाऱ्या स्थलांतराचे काय? प्रश्नांच्या या मॉलमध्ये उत्तरांची दुकाने नाहीत म्हणून फेसबुकच्या भिंतींवरून चर्चा कोण करणार? तशी चर्चा तर युद्धांमुळे होणाऱ्या स्थलांतराची अधिक व्हायला हवी. देव, देश आणि धर्मामुळे होणारी ही युद्धे आणि दहशतगर्द कारवाया. काश्मिरातले हिंदू पंडित तसेच सीरिया, इराण, अफगाणिस्तानमधले मुस्लीम, सारेच या दहशतीचे बळी. जीव वाचविण्यासाठी अन्य कुठे तरी जायचे, तेही जीव धोक्यात टाकून आणि तेथेही आपल्याला कोणी आश्रय देईल याची खात्री नाही. आपल्या अवकाशात बाहेरचा रानपक्षीही आला तरी दचकणारे, घाबरणारे, बिथरणारे आणि आक्रमक होणारे आपण. स्थलांतरितांना कोण सामावून घेणार आपल्या वस्त्यांमध्ये? तरीही कधी तरी एखाद्या आयलान कुर्दी नावाच्या चिमुरडय़ाचा मृतदेह तुर्कस्थानातल्या समुद्रकिनाऱ्यावर वाहात येऊन वाळूत पडतो. त्याची छायाचित्रे पाहून प्रेक्षकांचे हृदय द्रवते. काही दिवस जोरदार चर्चा होते आणि मग वेगाने आलेली उंच लाट किनाऱ्यावर धडकून फेसफेस होत विरून जावी तसे सारे शांत होते. स्मरणात राहतात ती आयलानसारख्यांची, दिल्ली-मुंबईतल्या उड्डाणपुलांखाली ओंडक्यांपुढे ओंडके मांडावेत तशा प्रकारे निजलेल्या शुष्क दुष्काळग्रस्तांची वर्तमानपत्री छायाचित्रे. भावना हेलावून टाकणारी. कधी कधी भावना भडकावणारी. अशा भडक्यांमध्ये विवेकाला, विचाराला स्थान नसते. ही विस्थापने, ही स्थलांतरे होतात कशाने, त्याला कोण असते जबाबदार, हे जाणून घेण्याची आसही नसते. तसे श्रम घेतले तर लक्षात येईल की कैरानातल्या त्या तथाकथित स्थलांतरितांच्या याद्यांपेक्षा किती तरी मोठय़ा याद्या या जगात आहेत. त्यांत दुष्काळग्रस्त आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत आणि त्यामुळे आयुष्याला विटलेले जीवनग्रस्त आहेत. त्यांच्या त्या मोडून पडलेल्या आयुष्यांना जबाबदार आपणही आहोत. कारण आपण खऱ्या जबाबदारांना प्रश्न विचारायचेच विसरलो आहोत. अल्झायमरांच्या सोसायटीत आपण केव्हाच दाखल झालो आहोत. येथे आठवून विचार करण्यापेक्षा पाहून भडकणे सोपे असते. आपण सहसा तेच करतो. कोणीतरी कैरानातला खासदार उठतो आणि स्थलांतरितांच्या याद्या जाहीर करतो. सांगतो, की या मुस्लिमांच्या दहशतीला कंटाळून गाव सोडलेल्या हिंदूंच्या याद्या. आपण त्यावर विश्वास ठेवतो. कारण आपल्याला नेहमीच समोर एखादा शत्रू हवा असतो. आपली सगळी दु:खे, वेदना, अवहेलना, न्यूनगंड यांसाठी त्याला जबाबदार धरले की बरे असते. भावनांचे स्वच्छ विरेचन करता येते. यात पुन्हा देव, देश आणि धर्माचे काम केल्याचेही पुण्य मिळते. म्हणूनच कैरानातील ज्या खासदार हुकूमसिंह यांनी हिंदू स्थलांतरितांच्या याद्या जाहीर केल्या, तेच आता हा धार्मिक नव्हे तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे सांगत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. हुकूमसिंह यांनी जाहीर केलेल्या याद्यांतील अनेक नावे चुकीची असली, अनेक नावांचे मालक आज या दुनियेतच नसले, अनेकांनी भलत्याच कारणासाठी कैराना सोडली असली, आणि हे सगळे माध्यमांतून लख्खपणे समोर आले असले, तरी स्थलांतरकथेवर विश्वास ठेवण्याकडेच अनेकांचा कल असतो. कारण यातून आपल्याला सात्त्विक संतापता येते. भाज्यांचे दर वाढले आहेत, डाळी महागल्या आहेत, साधा पाऊसही वेळेवर पडत नाही आणि साहेब पगारवाढ देत नाही अशा जगण्याला लाचारीचा दंश करणाऱ्या गोष्टी विसरून वेगळीच झिंग पांघरता येते. वस्तुत: कैरानात जे घडलेच नाही असे आता उघड होत आहे, ते घडलेच असे समजले, तरी तो केवळ निवडणुकीचा मुद्दा व्हावा? सामाजिक ध्रुवीकरण ही आजच्या अनेक नेत्यांच्या राजकारणाची गरज आहे. तो सामाजिक अपराधच. पण तोही काही आजच घडत आहे असे नव्हे. तऱ्हा वेगळी असेल, प्रकार वेगळे असतील पण ध्रुवीकरणाचे हे राजकारण पूर्वीही होत होते. किंबहुना पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिग्गज गायकांचे घराणे जेथून उगम पावले त्या कैरानातील त्या तथाकथित याद्या हे याच राजकारणाचे अपत्य आहे. समाजांमध्ये मनभेद निर्माण करण्यातून अशा घटना घडतात आणि त्या घटना घडतात म्हणून मनभेदांचे बुरूज पक्के होत जातात. मग चर्चा होते ती त्याचीच. धार्मिक तेढीची, त्याच्या राजकारणाची. वस्तुत: कोणालाही आपले गाव, आपले अंगण सोडणे भाग पडावे हे वाईटच. बोलले जावे ते त्याबद्दल. प्रश्न एवढाच आहे की स्थलांतरांच्या इतक्या वार्ता आल्यानंतरही त्या चच्रेसाठी आपली तयारी आहे का?